परीक्षा पद्धती ?

काही बातम्या वाचल्यावर , दुसऱ्या दिवशी रद्दी मधे घडी करून  जातात तर काही रद्दी मधे गेल्यावर पण मनात घर करून बसतात-  पुण्याच्या एका मुलीने सीईटी   मधे कमी मार्क मिळाले म्हणून आत्महत्या केली- त्यातलीच ही एक.

दर वर्षी इंजिनिअरींगच्या बऱ्याच जागा रिकाम्या असतात, म्हणजे कितीही जरी कमी मार्क मिळाले असले तरीही त्या मुलीला कुठेतरी अ‍ॅडमिशन नक्की  मिळालीच असती, पण असे असतांनाही तिने आत्महत्या का बरं केली असेल? हा विचार जेंव्हा मनात आला, तेंव्हा आपल्या परीक्षा  पध्दतितला फोलपणा  जाणवला.

मुलांच्या १२वी च्या परीक्षा झाल्या की पालकांच्या डोक्यावरचे ओझे कमी होते. विद्यार्थ्याची दहावी आली की त्याच्या  सोबतच  घरच्या सगळ्यांचाच  अभ्यास सुरु असतो. पण खरा टेन्शनचा भाग सुरु होतो तो १२वी नंतर. सिईटी म्हणजे सगळ्या परीक्षांमध्ये महत्त्वाची, कारण चांगल्या कॉलेज मधे प्रवेश हवा असेल तर चांगले मार्क मिळवणे भाग असते, नाही तर पुढे आयुष्याला काही अर्थ नाही अशा प्रकारचे विचार घरोघरी ऐकू येतात.

एकदा परीक्षांचे निकाल लागले की खरंच कोणाचे निकाल लागले – म्हणजे विद्यार्थ्यांचे , त्यांच्या पालकांचे, क्लासेसचे, की त्यांच्या कॉलेजचे  हा प्रश्न पडतो. प्रत्येक मुलाच्या यशाचे श्रेय घेण्यासाठी हे सगळे लोकं  पुढे येत असतात.काही वर्षापूर्वीची लातूरची एक केस आठवते, तेंव्हा एका क्लासने पहिल्या आलेल्या मुलाने पास झाल्याबरोबर जी मुलाखत दिली  होती, त्या मधे आपल्या यशाचे श्रेय आपल्या वडिलांना दिले होते, पण नंतर जेंव्हा त्याचा एका क्लास तर्फे सत्कार करण्यात आला, तेंव्हा त्याने यशाचे श्रेय  क्लासला दिले,  या “श्रेय- बदला” मागचे अर्थकारण लक्षात येण्यात काही विशेष विचार  करावे लागणार नाही.

खरं सांगायचं तर  “यशवंत” विद्यार्थ्याच्या  यशाचं श्रेय घेण्यासाठी सगळेच पुढे येतात. आई- वडील ” आम्ही दोन वर्ष टीव्ही पाहिला नाही, केबल पण काढून टाकलं होतं , हे सांगून स्वतःचं विद्यार्थ्याच्या यशामध्ये कॉंट्रीब्युशन अधोरेखित करीत असतात, तर कॉलेज वाले, आमच्या कॉलेजने कसे एक्स्ट्रॉ विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले हे सांगत असतात, क्लासेस तर गुणवंत विद्यार्थ्यांचे फोटो जाहिराती मधे वापरत असतात, रस्त्याच्या नाक्या नाक्यावरचे बोर्ड्स पण याची साक्ष देतील.

ज्या मुलांना कमी मार्क मिळतात, त्यांच्या कोपऱ्यात जाऊन डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंकडे लक्ष देण्यासाठी कोणालाच वेळ नसतो. एखाद्या विद्यार्थ्याने खूप अभ्यास करूनही जर कमी गुणाच्या परीक्षेत कमी मिळालेल्या गुणांमुळे,  एखादा दीडशहाणा  कॉमेंट करतो, ” की तू कितीही जरी अभ्यास केला तरीही शेवटी रिझल्ट काऊंट्स! ” हे असे शब्द उच्चारताना त्या विद्यार्थ्याच्या वर्षभराच्या मेहेनतीचा आपण अपमान करतोय हे काही त्याच्या लक्षात येत नाही.

वाल्या कोळ्य़ाची गोष्ट आज पुन्हा आठवते आहे. यशामधे सगळॆच भागीदार असतात, पण अपयशा मधे कोणीच नसतो. ज्या विद्यार्थ्याला खूप मेहेनत करूनही चांगले मार्क मिळू शकले नाहीत, त्याच्या वेदना समजून घ्यायला कोणीच तयार नसतो. अगदी जवळच्या नात्यातले लोकं पण वेळॊवेळी काहीतरी विचित्र कॉमेंट्स करून अपमान करण्याचा चान्स सोडत नाहीत.अशाच एखाद्या घटनेचे पडसाद म्हणजे पेपरमधे वाचलेल्या आत्महत्येच्या बातम्या.

मी लहान असतांना  लोकांच्या घरात भिंतीवर ग्रॅज्युएशनचे फोटो ( हातामधे डीग्री घेतलेले) लावण्याची पद्धत होती. काही लोकं तर डिग्री पण फ्रेम करून लावायचे घरामधे.  तेंव्हा ग्रॅज्युएशनला  किंमत होती.  आज बेसिक बीए, बिएस्सी, बिकॉम, बिई, एमबीबीएस  ह्या डिग्र्यांना कोणीच विचारत नाही. तुम्हाला कुठलं तरी स्पेशलायझेशन करावंच लागतं. शाळा कॉलेजेस मधे जे शिकवलं जातं, त्याचा आपल्या रोजच्या जीवनात किंवा तुम्ही करता त्या नोकरी मधे किती उपयोग आहे – हा प्रश्न मला नेहेमीच पडतो.

या परीक्षांचा पण एक खेळ असतो. नुकतेच मुंबई विद्यापीठाच्या इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्गाचे पेपर्स फुटल्याने, पुन्हा परीक्षा घेण्याची नामुश्की   विद्यापीठावर आली. परीक्षा हा एक मुद्दा! आणि पेपर तपासणे हा ?? या वर्षीच्या पिएचडी च्या एंट्रन्स टेस्टचा निकाल मुंबई विद्यापीठाने अजूनही लावलेला नाही. असो. विषयांतर होतंय.

पेपर तपासणे हा एक प्रकारचा खेळ खंडॊबा आहे. पेपर तपासतांना त्या शिक्षकाचा मुड कसा आहे यावर मार्कं अवलंबून असतात. हे वाक्य मी पूर्ण विचार करून लिहिले आहे. नुकतीच माझ्या मुलीने १२वी ची परीक्षा दिली.१२वी च्या    ८० मार्कांच्या पेपर १+२  मधे १६ मार्कांचे प्रश्न हे  ऑब्जेक्टीव्ह स्वरूपाचे तर उरलेले ६४ मार्कांचे प्रश्न हे दिर्घउत्तरांच्या स्वरूपातले असतात. म्हणजेच केवळ १६ मार्कां बद्दल विद्यार्थी चॅलेंज करू शकतो, पण मग  उरलेले मार्कांचं काय?.

पेपर तपासणारे पण हजारो परीक्षक असतात. त्यांची पण समज , मतभिन्नता ही असतेच. एखाद्या विषया बद्दलचा पर्सनल दृष्टीकोन पण वेगवेगळा असतोच.  एखादी उत्तर पत्रिका झेरॉक्स करून दहा वेगवेगळ्या प्राध्यापकांना तपासायला दिली, तर प्रत्येकाने दिलेले गुण हे सारखेच असतील का? अर्थात नाही, कारण गुण देतांना प्रत्येक प्राध्यापकाची समज, म्हणजे त्याला उत्तर किती समजले आहे हे आणि त्याचा मुड यावर अवलंबून असतात असे माझे मत आहे. एखाद्या प्रश्नाला जर एका प्राध्यापकाने १० पैकी ७ गुण दिले असतील, तर दुसऱ्याने कदाचित ४ किंवा तिसऱ्याने ५ पण दिले असण्याची शक्यता आहे.

म्हणूनच म्हणतो की परीक्षा म्हणजे एक नशीबाचा भाग आहे. तुम्ही किती अभ्यास केला, कसा पेपर सोडवला या पेक्षा तुमच्या पेपर तपासणाऱ्या परीक्षकांचा मूड कसा होता यावर ते जास्त अवलंबून आहे. मग हे असं असतांना विद्यार्थ्यांना पास नापास करण्याचा अधिकार कोणाला कसा असू शकतो?

परीक्षेतले यश -अपयश हे विद्यार्थ्याच्या नशिबावर अवलंबून आहे. अभ्यासावर ५० टक्के- उरलेले ५० टक्के नशीब…..!   हे असं असतांना विद्यार्थ्याच्या आयुष्याशी खेळणारी सध्याची परीक्षा पद्धती ही केवळ सामुदायिक फसवणूक आहे  की जी कोण कोणाची करतोय यावर एक मत होऊ शकत नाही, म्हणूनच तर  ही कालबाह्य परीक्षा पद्धती अजूनही भारतात बिनबोभाट पणे सुरु आहे. ह्या परीक्षा पद्धतीला उत्तर हे शोधायलाच हवं नाही तर अशा किती आत्महत्या येणाऱ्या काही वर्षात पहायला मिळतील याची खात्री देता येत नाही.

मुलीच्या इंजिनिअरींगच्या प्रवेशाच्या संदर्भात UMIT  मुंबई ची  एक  साईट पहातांना ग्रेडेशन वापरलेले दिसली आणि सहज विचार आला की हीच पद्धत इतरत्रही का वापरली जाऊ शकणार नाही?

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in परिक्षा.. and tagged , , , , . Bookmark the permalink.

30 Responses to परीक्षा पद्धती ?

 1. ग्रेडेशनची पद्धत फार फायद्याची ठरू शकते. कित्येक विद्यार्थ्यांचे नशीब एक-एक मार्काने बदलते आणि या गोष्टीचे त्यांना टेन्शन सुद्धा येणे साहजिक आहे.
  या विषयाशी साधर्म्य असणारी एक पोस्ट लिहित आहे. लवकरच प्रकाशित करेन.

  • ्सागर
   फार सेन्सेटिव्ह विषय आहे हा. अजूनही बरेच कंगोरे आहेत या विषयाला, जागे अभावी लेख आटोपता घेतला. नक्की लिही.

 2. dattatarya says:

  अति उत्तम

 3. DB DESAI says:

  It is a well known fact that current system of examination has many flaws but unless and untill it is changed the students have to concentrate and study and try to secure maximum marks. They should not underutilise their capabilities just out of frustration because it will not lead you to anywhere. There is nobody out there to help you because you are dissatisfied with the system like the student who got less marks even after giving all out efforts throughout the year. Everyone wishes to have a better system but for that many social, political changes have to happen and if one wants to be a part of this change then he has to move up on the ladder and the road goes through the way provided by the current system. It is the duty of the seniors in the society to look after this aspect and take care about future of our children but the students have to concentrate on the studies and use the system to their maximum benefit while understanding the pitfalls and helping other to find out the solutions.

  • श्री देसाई ,
   या सिस्टीमला बदलणं सोपं नाही. पण काही इन्स्टीट्युट्स जसे उषा मित्तल इन्स्टीट्य़ुट ऑफ इंजिनिअरींग ग्रेडेशन सिस्टीम वापरतात. सरकारतर्फे पण एक समिती नेमण्यात आली आहे, जी शिक्षण पद्धतीचा विकास करण्याचे (?) काम करते आहे – असं म्हणतात. पण आजपर्यंत तरी काही इम्प्रुव्हमेंट दिसत नाही.

 4. Guru says:

  कारकून बनवायची सिस्टीम आहे काका ही, मॅकॉले ची देणगी अजुन काय……

  • गुरु
   मॅकॉले बद्दल आमच्या एन्साय्क्लोपेडीयाचे म्हणणे एकदम वेगळे आहे. त्या काळी रेल्वे इंजिन बघून घाबरणाऱ्या समाजाला इंग्रजी शिकवण्याचा विडा उचलला होता,आणि शिक्षण पद्धती डेव्हलप केली होती.

   • Guru says:

    एक गाणे होते जुने आमचे बाबा सांगतात “साहेबाचा पो-या मोठा अकली रे बिन बैलाची गाडी त्यो ढकली रे म्हणुन” रेल्वे ला समर्पित होते ते, काका मॅकॉले ने फ़ार म्हणजे अपरिमित नुकसान केले आहे आपल्या देशाचे अन पर्यायाने समाजाचे, लिहितो आहे, झाले की सविस्तर वाचायला देतोच, एकच मुद्दा सांगतो त्या पद्धती मुळे भारतीय समाजात लब्धप्रतिष्ठा वाढली आहे, श्रमाला किंमत उरलेली नाही. अमेरीकेत एखादा मल्टाईमिल्यनेर एखाद्या कन्स्ट्रक्शन वर्कर सोबत बसुन सहज बर्गर खाऊ शकतो, अन आपण??? चुकुन एखादा निम्न आर्थिक स्तरातला माणुस मॅक्डोनल्ड्स मधे दिसला तर आजकल साला कोई भी बर्गर खाता यार असे डीस्गस्टींगली म्हणत के.एफ़.सी जवळ करतो. ह्यात त्या माणसा सारख्या निम्न आर्थिक स्तरातल्या माणसा सोबत बसायची एक घृणा असते, अन सीन अजुन कॉंप्लिकेटेड करायला काही आधुनिक मॅकॉलेची मेंढरे त्यात जात-धर्म-पंथ-भाषा इत्यादी व्हेरीएबल्स सुद्धा जोडतात, रिझल्ट मॅकॉलेच्या$^#^&#$&^#$#^# 😀 😀 😀

 5. आमच्या एक प्राध्यापिका भिडे म्याडम नेहमीच म्हणायच्या … ‘If you really want to assess students viva’s is the only option you have. But since we run short of time, we go for papers, which can never be an accurate solution.’

 6. anuvina says:

  आपल्या इथे बरेच अभ्यासक्रम आहेत आणि प्रत्येकाच्या तऱ्हा वेगवेगळया. आता या सगळ्या सावळ्या गोंधळातून ज्ञानार्जन किती होते हाच मोठा प्रश्न आहे. सगळ्या विद्यापीठांनी एकत्र येऊन पूर्ण भारतभर एकच अभ्यासक्रम राबविल्यास हा गोंधळ कमी होवू शकतो.

  • सगळ्या भारतात एकच अभ्यासक्रम सुरु केला तरीही परीक्षा पद्धती बदलल्या शिवाय काही पर्याय नाही. जर अशीच गुणांकनाची पद्धत सुरु राहिली तर काही फारसा फरक पडेल असे मला तरी वाटत नाही.

 7. Ketaki says:

  खरंय काका तुमचं. नुसत्या बेसिक डिग्र्यांवर काही भागत नाही आजकाल. माझ्या वेळेला १२ वी नंतर सीईटी नव्हती (नशीबवान होते असे वाटतंय आत्ताची परिस्थिती पाहता) पण माझ्या भावाच्या वेळी त्याचे प्रयत्न पाहिलेत मी. सरकारी मेडिकल कॉलेज ला प्रवेश मिळवणं आणि ते पण ओपन मधून, महा कठीण प्रकरण. तशीच परिस्थिती एम.डी. च्या प्रवेश परीक्षेच्या वेळी किंबहुना अजून वाईटच. पहिल्या प्रयत्नात प्रवेश मिळाला नसल्यामुळे दुसऱ्या वेळी परत तीच तयारी करणे आणि तरीही अनिश्चितता असणे म्हणजे काय ते अगदी पुरेपूर पाहिलं मी त्याच्या बाबतीत.(प्रवेश मिळाला हे नशीबच).
  “आमच्या वेळी बरं होतं ” असा एक टिपिकल डायलॉग मारायची इच्छा होते आहे. ( पु.लं. च्या मते पुणेकराला हे मत प्रदर्शित करायला वयाची अट नसते)

  <<"पेपर तपासतांना त्या शिक्षकाचा मुड कसा आहे यावर मार्कं अवलंबून असतात."
  अगदी खरं आहे. माझ्या १० वी च्या वेळी अशी एक बातमी कानावर आली होती की आसपासच्या कुठल्यातरी शाळेचे मराठीचे पेपर देवरुख की कुठेतरी गेले होते तपासायला. आणि त्या तपासणाऱ्याचं आणि त्याच्या बायकोचं भांडण झालं म्हणे. त्या भांडणात त्या बाईने सगळा गठ्ठा जाळून टाकला. आणि त्या भाग्यवान मुलांना ६०-७० असे काहीतरी मार्क्स मिळाले. 😀

  • केतकी
   ह्याच सगळ्या प्रकारातून तीन वर्षापूर्वी गेलो होतो . मोठी मुलगी यंदा बीई ला आहे. 🙂
   पुन्हा एकदा त्याच सगळ्या टेन्शन मधून जावं लागतंय- म्हणून पुन्हा एकदा परीक्षा पद्धती बद्दलचे विचार डोके वर काढू लागले.

 8. Piyu says:

  छान लेख..

  आम्हाला शाळेत असतांना इतिहास शिकवणारे एक खूप चांगले आणि देशभक्त सर होते.. ते स्वत:च खुपदा आमच्याशी ओपनली आपली परीक्षापद्धती कशी चुकीची आहे यावर बोलायचे. त्यांनी आम्हाला सांगितले कि आपली परीक्षा पद्धती हि मॅकॉलेने बनवली आहे. त्याने जेव्हा इथली शिक्षण पद्धती तयार केली तेव्हा “पंचम जॉर्ज” याला पत्र लिहून कळवले कि “मी इथली शिक्षण पद्धती अशी बनवली आहे कि इथे विद्यार्थी शिक्षण घेऊनसुद्धा समर्थ बनणार नाहीत.. एवढेच नव्हे तर त्यांना त्यांच्याच देशाविषयी कधीच अभिमान सुद्धा निर्माण होणार नाही.. काळजी नसावी”.

  त्यांनी सांगितलेली हि गोष्ट एक टक्का जरी खरी असेल तर मग अवघड आहे.. नाही का??

  • पियू

   मॅकॉलेने जेंव्हा शिक्षण पद्धती बनवली, तेंव्हाचा भारत वेगळा होता. असो, माझा फारसा अभ्यास नाही त्याबद्दल, पण केवळ संस्कार, धर्म, व संस्कृतीच्या बंधनात अडकलेल्या समाजाला शिकवणे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती, पण त्याने हे शक्य करून दाखवले.
   मॅकमिलन ला नेटीव्हांना इंग्रजी शिकवणे मान्य नव्हते असे म्हंटले जाते.

 9. अजय. says:

  आजचा हा लेख माझ्या क्षेत्राबद्दल असल्यामुळे बराच वेळ घालवत अतिशय सावकाश वाचला. आजची परिक्षा पद्धतच नाही तर माझ्या मते आजची शिक्षण पद्धतीच चुकिची असल्याचे माझे मत आहे. आज तुम्ही कितीही शिकलात तरी व्यवहार ज्ञान येईलच याची शाश्वती नाही व हातात डिग्री असली तरिही त्या विषया बद्दल “सखोल माहिती” किंवा “साधारण माहिती” असेलच असेही नाही. होय मी या शिक्षकी व्यवसायात चांगले २४ वर्षे घालवल्यावर हे लिहीत आहे.
  माझे असे निरीक्षण आहे कि आजचा विद्यार्थी फक्त “Syllabus” बघुनच अभ्यास करतो. त्यापलिकडे काही सांगण्याचा प्रयत्न शिक्षकाला त्रासदायक ठरतो. आज विद्यार्थी वाचतच नाही असे माझे दुसरे निरीक्षण.
  याशिवाय एका शिक्षकाला किती व कोणते काम द्यायचे याला काही मर्यादा असाव्या कि नाही ? खानेसुमारी पासुन निवडणुकिची कामे व या दरम्यान शाळेत येणार्‍या वेगवेगळे निरिक्षक व समित्या यांना पण कोण आवरणार ? हे सर्व करुन शिक्षकांनी परिक्षेचे पेपर्स उत्तमरित्या कसे तपासावेत ?
  आजचा शिक्षक पोटभरु व विद्यार्थी मार्कांचे भूकेले झाले आहेत व सर्व पालकांना आपले पाल्य “Engineer” किंवा “Doctor” च व्हावे असे वाटते. CET त कितीही गुण मिळालेत तरिही विद्यार्थी अभियंता होऊ शकतो, कारण इंजिनियरीगच्या जागाच इतक्या वाढवण्यात आल्या आहेत ! त्यामुळे इंजिनियर व्हायचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होण्यात कोणतिही अडचण नाही.

  • अजय
   धन्यवाद.. तुमचे म्हणणे अगदी शंभरटक्के योग्य आहे. शिकतांना सिलॅबसच्या बाहेरचं काही वाचायचा पण कंटाळा येतो मुलांना. कसंही करून केटी लागली नाही की झालं.. हा विचार मनात असतो. म्हणूनच मला वर्षभर चालणारे प्रोजेक्ट्स आणि त्यानुसार मिळालेली वर्षभर मिळालेल्या ग्रेड्स आणि त्यातून काढलेले अ‍ॅव्हरेज ग्ग्रेडेशन सिस्टीम जास्त योग्य वाटते. बि.टेक. ज्या ठिकाणी आहे, (ऑटोनोमस इन्स्टीट्य़ूट्स ) मधे सहज राबवता येऊ शकते ही सिस्टीम.
   पण १२वीच्या परीक्षांचे काही तरी करायलाच हवे… !

 10. परखड आणि सुंदर विषय..
  मला भावलेली ओळ: ज्या मुलांना कमी मार्क मिळतात, त्यांच्या कोपऱ्यात जाऊन डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंकडे लक्ष देण्यासाठी कोणालाच वेळ नसतो.

 11. snehal says:

  Ha nehamicha vishay aahe, dar varshi June, July madhil ha charchecha vishay houn banto, 20-30 lakh rupaye sahaj donationchya nava khali ghetle jatat. Khuthehi kunala janiv nahi ki tyat badal nahi. Ha bhopla kadhi futnar kunas thauk.

  • स्नेहल
   कधी तरी तर यावर काही अ‍ॅक्शन घेतली जाईलच. डोनेशन देण्याची पात्रता नाही म्हणून मेडीकलची सिईटी देऊ न देणारे माझ्यासारखे पालक आहेतच!

 12. yogseh says:

  अगदी बरोबर…. परीक्षेचे गुण हे पेपर मध्ये काय लिहिले आहे त्या पेक्षा पेपर तपासणाऱ्या च्या मूड वर आहे….. आमच्या मराठवाडा विद्यापीठ मध्ये तर एक वाक्य प्रचलित होते. आम्हाला परीक्षा पास होण्यासाठी ५० पैकी २० गुण मिळविणे क्रमप्राप्त होते. तेव्हा कमीत कमी २० पाने तरी लिहावे महणजे पेपर तपासनीस ने प्रती पान १ गुण जरी दिला तरी २० गुण घेऊन विद्यार्थी परीक्षा पास होतो. तपासणीसास पूर्ण पान वाचण्यासाठी वेळ हि नसतो आणि इच्छा हि नसते त्यामुळे प्रती पान १ गुण हे ठरलेले…….. 😉
  आणि डिग्री व डिग्रीचे छायाचित्र भिंतीवर लावणे हा प्रकार अजून हि पहावयास मिळतो …….

 13. ninad says:

  आज पण दहावीच्या निकालाची पत्रिका हातात देतांना शाळेतील बाई ( माझ्यावर लई खुन्नस ) छद्मी पणे म्हणाल्या ,, आर्टला जा
  जणू काही आता तुझे काही होणे नाही,
  विज्ञान शाखेत बारावी नंतर हे प्रवेश परीक्षा आणि रेट रेस सुरु झाली
  बारावी साठी हा क्लास आणि मग ह्या नोट्स
  मग सुमडीत कोणाला त्याकाळी माहित नसलेले हॉटेल मेनेजमेंट केले आणि काही कळायच्या आत शिकण्याच्या निमित्ताने अनिवासी झालो.
  शेवटी पैसा काय …. सुद्धा मिळवते इति
  बबडू
  शेवटी कश्यासाठी तर पोटासाठी हेच तत्व पाळायचे असेल तर निदान स्वतःच्या आवडीचे शेत्र तरी निवडा
  जे तुमच्या स्वभावाला ,प्रकृतीला ,प्रवृत्तीला झेपेन,
  मग आयुष्याची उमेदीची २० ते ३० वर्ष त्या शेत्रात स्वतःला झोकून दिले तरी शेवटी हाती अजून काही नाही लागले तरी स्वतःच्या मनासारखे केल्याचे समाधान लाभेल.
  काकांची हि पोस्ट वाचली.
  आणि माझ्या त्याकाळी घेतलेल्या निर्णयाचा मला आज आनंद होत आहे.
  आयुष्यात शर्यतीला, स्पर्धेला घाबरत नाय आपण.
  पण
  ती सुरु करण्या आधी एक प्रश्न स्वतःला जरूर विचारतो.
  इज इट वर्थ ?

  • निनाद

   खरं आहे.. इंजिनिअरींग ला नाही गेलं तर आयुष्य वाया गेलं असं नेहेमीच म्हणतात.. पण तू ते खोटं करून दाखवलं. 🙂

 14. Sarojkumar Bhosle says:

  लेख खूप आवडला. आपल्या परीक्षा पद्धतीमध्येच नाही तर एकूणच शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक दोष आहेत. परीक्षेपुरता विचार करायचा झाला तर तुम्ही म्हणता तसं कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळणार हे त्या विद्यार्थ्यापेक्षा परीक्षाकावर अवलंबून असतं. सध्याच्या परीक्षा पद्धतीत मार्क्स हे विद्यार्थ्याच्या performanceचे निदर्शक आहेत यावर माझा मुळीच विश्वास नाही. म्हणजे एखाद्याने परीक्षेच्या काही वेळापूर्वी वाचलेल्या भागावरच प्रश्न आले तर त्याला नक्कीच त्यात चांगले गुण मिळणार. परीक्षा ही एकदाच न होता distributed असायला हवी असं मला वाटतं. मी स्वतः IIT मद्रास मध्ये MS करतोय. उदाहरणादाखल इथली परीक्षा पद्धती सांगतो. इथे प्रत्येक विषयाचे प्राध्यापक त्या त्या विषयासाठी असलेली ग्रेडिंग स्कीम ठरवतात आणि continuous evaluation असतं. एका विषयाचे १०० टक्के गुण वेगवेगळ्या evaluation components मध्ये divide केलेले असतात. end semester exam ला फक्त ३० ते ४० टक्केच weightage असतं. बाकी ६० ते ७० टक्के weightage हे assignments, projects, quizes, practical, presentation यांना असतं. म्हणजे एकाच विषयामध्ये हे सगळे evaluation components नसतात. विषयानुसार कोणते components असणार ते ठरतं. आणि हे components पूर्ण सेमिस्टर मध्ये distribute झालेले असतात. त्यामुळे सेमिस्टरच्या शेवटी एकदम परीक्षेचं ओझं नाही पडत विद्यार्थ्यांवर. तर ही किंवा यासारखी परीक्षा पद्धती शाळांमध्ये आणि इतरत्रही लागू करायला काहीच हरकत नाही.

  • सरोजकुमार
   ब्लॉग वर स्वागत. माझी धाकटी मुलगी बिटेक फर्स्ट इयर ला आहे, तिला पण ह्याच पद्धतीने शिकवले जाते. ग्रेडेशनची पद्धत आहे. मोठ्या मुलीने बिई केले, तेंव्हा तिला थोडा वेगळा अभ्यासक्रम होता. सेमिस्टर एक्झाम्स व्हायच्या.. परिक्षा पद्धती मधे बदल खरंच आवश्यक आहे असे मलाही वाटते.केवळ कारकुन बनवणारी ही पद्धती आता बदलायलाच हवी.

 15. माधव says:

  परीक्षा पद्धती कशी आहे यावर मतं मांडली आहेत. आता थोडी चर्चा कशी असायला हवी आजच्या परिस्थितीत यावरही करायला हरकत नाही. आपण खुपवेळा प्रतिक्रिया देत राहतो. अनुभव सांगतो पण पर्याय काय असायला हवा ते सांगत नाही.
  फक्त परीक्षा पद्धतीच बदलायला हवी की एकूणच शिक्षणपद्धती बदलायला हवी, नेमके कसे व्हायला हवे याबाबत विचार, स्वप्नरंजन व्हायला हरकत नाही. त्यातून काही गोष्टी स्पष्ट होऊ लागतील, काही सोडून द्याव्या लागतील.

  आपण, आपल्या भोवतालचे कशाला महत्व देतात, प्रगती कशाला म्हणतात, यशस्वी कोणाला म्हणतात, आदर्श कोणाचे ठेवले जातात हे बघत प्रत्येकजण उद्दिष्ट ठेवून प्रयत्न करत राहतो. ही उद्दिष्ट्येच चूकीची आहेत का? प्रगतीची, यशाची व्याख्याच बदलणे आवश्यक आहे का हे तपासायला हवे असे वाटते.

  • माधव
   पर्याय काय असावा हे सांगण्यासाठी आवश्यक असणारे एक्स्पर्टाईज आपल्याकडे नसल्याने त्यावर काही टिप्पणी करू शकत नाही. तरी पण ग्रेडेशनची पद्धत जास्त योग्य वाटते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s