घंटा…

फायर ब्रिगेड ट्रक वर अशी घंटा असायची

एखादी गोष्ट कधी तरी खूप आवडते  आणि कधी एकदम नकोशी होते. प्रत्येकाच्याच आठवणीत एक महत्त्वाचं स्थान असलेली ही वस्तू आहे- ती म्हणजे घंटा! आमच्या शाळेत एक पितळेचा गोल तुकडा  तारेने टांगलेला असायचा. शाळा सुरु व्हायची वेळ  झाली, की  महादेव शिपाई  त्या  पितळेच्या गोल तुकड्यावर   अडकवून ठेवलेली हातोडी सोडवून घंटा वाजवायचा.  शाळा सुरु होतांना वाजणारी घंटा  अंगावर काटा उभा करायची, कारण जर उशीर झाला तर हेडमास्तर हातात रुळ घेऊन समोरच्या दरवाजात   उभे असायचे. उशीर झालेल्या मुलांना  हातावर फटके द्यायला!  हीच घंटा जेंव्हा   शाळा सुटल्यावर वाजायची  तेंव्हा मात्र हिचा आवाज खूप कर्ण मधुर वाटायचा.एकाच घंटेच्या आवाजाचे किती प्रकारचे अर्थ निघू शकतात नाही का? शाळेत   ८ वी मधे असतांना एक  बदली शिक्षिका आल्या  होत्या , त्यांचा पिरियड संपण्याची घंटा वाजू नये असे वाटायचे. 🙂   आणि नावडत्या शिक्षकाचा पिरियड सुरु झाला, की कधी पिरियड संपल्याची घंटा वाजते इकडे लक्ष असायचं.

या घंटे मुळे आयुष्यातला खूप मजेचा वेळ ( म्हणजे झोपेचा)  🙂  वाया गेला आहे.   शाळेत  असतांना उद्यापासून रोज सकाळी अभ्यासाला उठायचं म्हणून  आई  अलार्म क्लॉक ( जे मेकॅनिकल चावी चे असायचे त्याला) अलार्मची चावी फिरवून अलार्म सेट  करून ठेवायची.  सकाळी चार वाजता तो अलार्मच्या घंटीचा आवाज ऐकून  घरातले सगळे जरी खडबडून  उठले तरीही मला मात्र जाग यायची नाही, आणि मग पाठी वर चार धपाटे खाऊनच उठणे व्हायचे. समजा एखाद्या वेळेस जाग आली  तरी पण  डोक्याखालची उशी कनावर  दाबून झोपायचा प्रयत्न करायचो.. तेंव्हापासून अलार्म क्लॉक मला न आवडणारी वस्तू म्हणून जी डोक्यात बसली, ती आजपर्यंत! अजूनही सकाळची फ्लाईट असली की ह्या अलार्म क्लॉकची  आवाज ऐकू आला की नको ते गावाला जाणं असं वाटायला लागतं. हल्ली मोबाइल मधे किंवा फोन वर  अलार्मची सोय आल्या पासून अलार्म क्लॉक ही वस्तू इतिहास जमा झालेली आहे- पण माझ्या आयुष्यातली एक खूप महत्त्वाची वस्तू म्हणून लक्षात राहील माझ्या.

लहानपणी मला नेहेमी फायरब्रिगेड चा ट्रक ड्रायव्हर व्हायची इच्छा  होती.  फायरब्रिगेड च्या ट्रक वर  पण  अगदी मागच्या भागात एक मोठी चकचकीत पितळी घंटा असायची. तिच्या लंबकाला बांधलेली  एक दोरी ड्रायव्हरच्या मागे उघड्या जागेवर उभ्या असलेल्या फायर मॅन च्या हाती असायची.  कुठे आग लागली कंडक्टर प्रमाणे  दोरी ओढून घंटा वाजवत ,तो फायर ट्रक  जायचा.  ते पाहिलं की  ही बेल वाजवायला मिळावे म्हणून   तरी आपण फायरब्रिगेड मधे मोठं झाल्यावर काम करायलाच हवं, असं वाटायचं. हल्ली ती घंटा जाऊन तिच्या जागी सायरन आलाय, पण त्या घंटेची मजा सायरन मधे नाही.

उन्हाळ्यात अमरावतीला रात्री घरासमोरून एक कुल्फीवाला जायचा. ही कुल्फी म्हणजे माझा जीव की प्राण! खूप आवडायची मला ती.  एका हातगाडीवर मटका कुल्फी चा माठ आणि वर बांधलेली एक घंटा असायची. त्या घंटेच्या  आवाजाची तर आम्ही दररोज रात्री वाट पहायचो. दोन कुल्फी वाले होते, एक भोंगा  हॉर्न वाजवायचा, आणि दुसरा हा घंटी वाला. हा  घंटीवाला माझा  फेवरेट.  हा घंटीचा आवाज ऐकला की मी पंचवीस पैसे दे म्हणून घरी मागे लागायचो, आणि एकदा पैसे हातात पडले की दुसऱ्याच क्षणी   त्या कुल्फीवाल्याकडे धाव घ्यायचॊ.

नाटक सुरु होण्यापूर्वी, मोगऱ्याच्या गजऱ्यांचा आणि पर्फ्युम्स च्या सुवासाच्या पार्श्वभूमीवर  स्टेज वरून तीन वेळा  हातात पितळी घंटा  घेऊन एक माणूस वाजवत जायचा.  तिथे त्या सुगंधी पार्श्वभूमीवर तिचा आवाज पण खूप छान वाटायचा. हल्ली मात्र त्या घंटेची जागा इलेक्ट्रीक बेल ने घेतलेली आहे. काही गोष्टी कधी बदलू नये असे मला वाटते, त्यातलीच ही एक.

पूर्वी रेल्वे स्टेशन वर गाडी येण्यापूर्वी  सूचना देण्यासाठी घंटा वाजवली जायची , ती घंटा ऐकली  की सगळे सरसावून नीट सामान सेट करून गाडी मधे चढण्यास तयार रहायचे, ती पण  हल्ली बंद केल्या गेली आहे, आणि त्या ऐवजी  अनाउन्समेंट केली जाते, पण घंटेची आठवण काही पुसल्या जात नाही. कदाचित पुढच्या पिढीला अशी काही पद्धत होती हे माहिती पण रहाणार नाही.

जेंव्हा मला माझी पहिली सायकल मिळाली, ( ७वी मधे ) तेंव्हा सायकल घेतांना त्याला कुठली घंटी बसवायची ह्याचंच स्वप्न रंजन मी करत होतो. त्या काळी दोन प्रकारच्या घंट्या होत्या, एक म्हणजे फक्त एकदाच टिण्ण वाजणारी, आणि दुसरी म्हणजे तिला आत स्प्रिंग असायचं आणि स्प्रिंग अनवाईंड होऊन घड्याळाच्या अलार्म सारखा आवाज यायचा ती . मला दुसरी घंटी लावायची होती सायकलला.  सायकल घेतल्यावर सायकल घेण्याच्या आनंदा पेक्षा घंटी वाजवायला मिळणार , अगदी हवी तेवढी! हा आनंद काही वेगळाच होता.

मी लहान असतांना माझ्या आजोळी  जायचो, तेंव्हा घरी असलेल्या गाई म्हशी चरायला नेण्यासाठी सकाळी गुराखी यायचा, तो जेंव्हा सगळ्या जनावरांना घेऊन जायचा तेंव्हा प्रत्येक गाईच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज वेगवेगळा असायचा. त्या घंटे मधे लंबक जो असतो, तो लाकडी असायचा आणि म्हणूनच त्या मुळे होणारा घंटा नाद पण  अगदी वेगळाच  असायचा. शाहरुख च्या एका सिनेमात जी घंटा तो आणतो, त्याच प्रकारची घंटा असायची ती. गाईंच्या गळ्यातल्या घंटांचा लयबद्ध आवाज हा संध्याकाळी गाई घरी आल्या की सकाळ पेक्षा नक्कीच  वेगळा वाटायचा. एकच घंटा पण आवाजात इतका फरक कसा काय वाटू शकतो?

नाशिकच्या नारोशंकर देवळात  १८ व्या शतकाच्या मध्यंतरी बसवलेली एक घंटा आहे, ती घंटा गोदावरीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर  वाढली, की आपोआप वाजेल अशी व्यवस्था केल्या गेलेली होती. धोक्याची घंटा म्हणूनच हिचा उपयोग केल्या जायचा.

घंटेचं आयुष्यातलं स्थान खूप मोठं आहे . घंटा म्हणजे केवळ धोक्याच्या वेळेस वाजवली जाते असे नाही, तर आनंदाच्या क्षणी पण तेवढ्याच उत्साहाने  वाजवली जाते. दूर कशाला, आपल्या  देवाला पण  घंटा वाजवूनच  उठवल्यावर मग   पूजा करता येते, किंबहुना घंटे शिवाय पूजा पुर्ण होतच नाही. म्हणून घंटेचं महत्त्व आयुष्यभर रहातं. कितीही विसरायचं म्हटलं, तरी विसरली न जाणारी ती घंटा..

जाता जाता, कालच एक मित्राचा फोन आला होता,  म्हणतो, संध्याकाळी भेटतो का? कुठेतरी ’बसू’ या थोडा वेळ. ” मी  त्याला विचारले की ” तुझी बायको माहेरी गेली का? तर म्हणतो, ” घंटा , जाते ती माहेरी”… मी जोरात हसलो, आणि ठरवलं की एक पोस्ट नक्की होऊ शकतं या घंटा विषयावर. त्याच्या त्या एका शब्दात सगळं जे काही मनात होतं ते बाहेर पडलं.जरी जूनी पितळी घंटा संपली विस्मृती मधे गेली , तरी ही वाक्प्रचारांसाठी  वापरली जाणारी    ” घंटा ” मात्र कधीच विसरली जाणार  नाही हे बाकी नक्की!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , . Bookmark the permalink.

21 Responses to घंटा…

 1. SADANAND BENDRE says:

  मस्त . दोन चित्र झटकन डोळ्यासमोर आली . खार वेस्टला असलेलं “घंटा हनुमान मंदिर” जिथे नवस फेडणाऱ्या लोकांनी टांगलेल्या लहान मोठ्या आकाराच्या हजारो घंटा आहेत . आणि दुसरा बोरीवली वेस्टचा “घंटा पानवाला”. हा पुरभैया प्रचंड लोकप्रिय आहे . याच्याही दुकानात वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकारच्या शेकडो घंटा आहेत. हा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा आहे . याची खासियत म्हणजे प्रत्येक पण गिर्हाईकाच्या हातात देण्यापूर्वी तो त्याच्या डोक्यावरची भली मोठी पितळी घंटा वाजवतो आणि एखादा नजराणा दिल्याच्या नजाकतीने पान पेश करतो .

  • सदानंद
   प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.मला स्वतःला ही पोस्ट केल्यावर डिलिट करायची खूप इच्छा होत होती, पण तेवढ्यात तुमची कॉमेंट पाहिली आणि पोस्ट असू दिली.बोरीवली वेस्टचा घंटा पानवाला एकदा भेट द्यायलाच हवी..

 2. गुरु says:

  नावडत्या शिक्षकाचा पिरियड सुरु झाला, की कधी पिरियड संपल्याची घंटा वाजते इकडे लक्ष असायचं.

  मी नववीत असताना गणिताच्या लेक्चर ला नेहमी वर्गाबाहेर उभा असायचा हे पक्के असायचे, गणिते सोडवली तरी जोशी मॅडमच्या खुन्नस खाऊन पार्श्यालिटी करायला इलाजच नव्हता, रोज नेमक्या त्याच वेळी हेडमिस्ट्रेस पण आमच्याच वर्गासमोरुन जाणार, एकदा असाच फ़ार कातावलो गणिताच्याजागी “फ़ेव्हरेटीझम” चे धडे घेऊन पकलो अन तेव्हा लक्षात आले “घंटा” तर आपल्याच वर्गाच्या समोर आहे ,साळसुदपणे घंटेखाली उभा होतो, अन डोके तड्कले!!!…. मी १५ मिनीट्स आधीच घंटा वाजवली !!! दोनच टोल!!!…. कुठल्याच टिचर ला समजेना काय झालंय अन सवयी प्रमाणे ते आपापल्या वर्गातनं बाहेर पडले इकडे स्टाफ़रुम मधले मास्तर निवांत असे “निर्नायकी” वर्ग असल्यावर आम्ही पाचच मिनिटांत मॉनिटर अन घासु पब्लिक च्या डोळ्याला पाणी येईपर्यंत दंगा पार्टी केली!!!!…. पण जेव्हा माझे नाव कळले तेव्हा नंतर एक आठवडा बेंचवर बुड टेकता येत नव्हते धड… 😀 😀 😀

  • गुरु
   तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. 🙂 आता मी तुला पाहिलेलं आहे म्हणून अधिकारवाणीने लिहू शकतो .घरी कम्प्लेंट गेली की नाही??

   • गुरु says:

    अभी क्या बोलने का काका!!!!!!…. आमचा एक मित्र आमच्या बाबांची सही करण्यात पटाईत होता म्हणुन निभवलंय़!!!!!…… अन तसेही त्यांना जोशी मॅम किती पार्शल आहेत हे माहित होते म्हणा पण रिस्क कोणी घ्या!!!!!…. तो सह्या मारणारा मित्र आज ऑर्थोपेडीक सर्जन आहे 😀 😀 😀 :D….. नशीब घरी पत्रं बाय पोस्ट नाय पाठवलंन…. काय बोलणार काळ आला होता पण वेळ आली नव्हती 😀

 3. Preeti says:

  वा फारच छान! या सगळ्या आठवणीतल्या घंटा, पण काही ठिकाणी नाटकाला अजूनही तशीच घंटा वाजवली जाते बरं का.

 4. Rajeev says:

  या घंटे मुळे आयुष्यातला खूप मजेचा वेळ ( म्हणजे झोपेचा) वाया गेला आहे. ?????????????????????????????????????????????????
  or
  या घंटे मुळे आयुष्यातला खूप वेळ मजेचा गेला आहे.!!!!!!!!!!!!!!!!!!

 5. samc says:

  शाहरुख खानचा चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (अजून कुठला असणार?)

 6. suhas adhav says:

  sundar post aahe …… saglach masta paiki cover jhala
  me shalet aastana amhala “kumar bharti ” madhye ek dhada hota “jevha ghanta vajte”
  junya athvani tajya jhalya 🙂
  pan shevti je lihilat te agdi famous aahe ha “ghanta” 😛

 7. aruna says:

  घरच्या पूजेतली घंटा विसरलात. घरातले देवाचे अस्तित्व आणि सगळे काही आलबेल असल्याची भावना! त्याला तोड नाही.

 8. स्प्रिंग अनवाईंडवाली सायकलची घंटा आठवली. जुन्या सायकलला असायची.
  रच्याक, शेवटचे वाक्य एक नंबर…

 9. आल्हाद alias Alhad says:

  घंटा ह्या शब्दाला नाही ह्या अर्थाची छटा कधीपासून आणि कशी आली ह्याचा खरंतर शोध घ्यायला हवा. घंटा हा शब्द टोकाचा नकार व्यक्त करतो. घंटा, जाते ती माहेरी चा अर्थ ती मुळीच माहेरी जाणार नाही/अशक्य आहे. असा होतो!
  बाकी अतीप्रसंग होतोच होतोय त्या कमेंटमुळे.

 10. madhuri says:

  zakas, majaa aali vaachayla, baalpaniche divas aathavle, aataachya mulaana ti maja kuthe

 11. anuvina says:

  टण टण टण टण टण टण टण ….

 12. महेश कुलकर्णी says:

  जुन्या गोष्टीना आपण उजाळा दिला त्याबदल धन्यवाद

 13. Prakash says:

  Ha block thoda phar prabodhankar thakre yachy lekhashi judto

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s