हुश्शार पुणेकर.. त्यांच अनुकरण करा मुंबईकरांनो..

हे असे दृष्य नेहेमीच दिसते. गणेश विसर्जन झाले की दुसऱ्या दिवशी आक्सा बिच वर जाऊन पहा… ( फोटो नेट वरून )

गणपती मुंबईचा आणि पुण्याचा. दर वर्षी प्रमाणे या वर्षी पण गणपती आला, आणि मला उगिच उदास वाटायला लागले.गणपती  उत्सव आपण गणपती आणून सिलेब्रेट करतो की गणपतीचे विडंबन करतो  हा प्रश्न मला नेहेमीच पडतो. नाही लक्षात येत? लोकमान्यांनी सार्वजनिक गणपतीचा उत्सव सुरु केला तो गिरगावातल्या ’केशवजी नाईक चाळीत” ! शंभराच्या वर वर्ष  परंपरा असलेला हा उत्सव आहे,   जरी उत्सवाचे स्वरूप जरी बदलले असले, तरीही त्याचे  महत्त्व   मात्र कमी झाले नाही. काही लोकांना पैशाचं महत्त्व , तर काही लोकांना सांस्कृतिक कार्यक्रमाचे, तर काही लोकांना उत्सवाचे- धमाल करता येईल याचे.

सार्वजनिक गणपती हा कशाचाही असू शकतो, कधी तुम्हाला तो एखाद्या मोटरसायकल बसलेला, कोकाकोलाच्या बाटल्यांचा, लाडूचा, सर्फ च्या पाकिटाचे  किंवा “मै भी अण्णा” ची टोपी घातलेला ! आपल्या गणपतीचं एक बरे आहे, कोणी कसलाही गणपती करा, कोणाच्याच भावना दुखावल्या जात नाहीत. कारण हा बाप्पा सर्वसमावेशक आहे.

वाईट वाटतं ना?? मला पण खूप वाईट वाटतं असं काही दिसलं की.. ( फोटो नेट वरून )

कोणे एके काळी घरटी एक रुपया, दोन रुपये किंवा यथाशक्ती वर्गणी गोळा करून त्या पैकी काही पैशांची एक लहानशी मूर्ती बसवली जायची. उरलेल्या पैशात देवाचा प्रसाद, आरती, वगैरे खर्च केले जायचे. उरलेले सगळे पैसे शेवटच्या दिवशी खर्च केले जायचे. पण हल्ली तसं नाही. गणपतीची वर्गणी मागायला मुलं आली, की वर्गणी मागताना जणू काही खंडणी मागतो आहोत असा आविर्भाव असतो. पावती आधी फाडली जाते, आणि हातात दिल्यावर त्यावर लिहीलेली रक्कम  निमुटपणे द्यावी लागते. ह्या गुंडा गर्दीला काही उपाय नाही. जर तुम्ही पैसे देण्यास नकार दिला, तर एखादा वर्गणी मागणारा, ” तुमची खाली ती सिल्व्हर कलरची कार आहे ना- तिच्यावर काळा स्प्रे मस्त दिसेल” असे म्हणाला, की तुम्ही निमुटपणे  पैसे काढून देता. तुमच्या आमच्या सारख्या मध्यमवर्गीयांची हजार दोन हजारावर सुटका होते, पण आमचा चौकातला दुकानदार म्हणाला, की  पन्नास हजार ते पाच लाख कितीही वर्गणी मागितली जाते, आणि एकदा मागितली की दिल्याशिवाय पर्याय नाही.    त्या परिसरातली १०० दुकानं जरी म्हटली ,तरी किती बरं रुपये जमा झाले असतील- तुम्हीच हिशोब करा.?

या सार्वजनिक उत्सवाचे दोन अंग आहेत, एक म्हणजे सामाजिक, आणि दुसरे म्हणजे धार्मिक. मी इथे धार्मिक अंगाबद्दल अजिबात काही लिहीणार नाही . दर वर्षी लालबागच्या राजाच्या दरबारात लाखो करोडॊ रुपयाचे सोन्याचे दागिने आणि इतर भेट वस्तू जमा होत असतात. त्याची मोजदाद करतांना आपण सोन्याने मढलेले मंडळाचे कार्यकर्ते पहातच असतो  🙂 ह्या गणपतीला नवसाला पावणारा म्हणून जास्त पैसे, दागिने दान केले जातात.

गणपती मुळात बसवला गेला तो सामाजिक एकात्मते साठी , पण लवकरच त्या मधे धार्मिक आणि आर्थिक इंटरेस्ट चे  प्रमाण इतके वाढले की त्या मधे लोकल गुंड लोकांचा सहभाग सुरु झाला, आणि हा उत्सव कसा हायजॅक केला गेला ते लोकांच्या लक्षातही आले नाही. खंडणीच्या स्वरूपात खूप पैसा जमा होतो, हे लक्षात आल्यावर काही मोठे प्रसिद्ध गुंड जसे छोटा राजन सारखे परळच्या गणपती बरोबर जोडले गेले. असे म्हणतात की आजचा प्रसिद्ध असलेला लालबागचा राजा हा एकेकाळी छोटा राजनचा गणपती होता. छोटा राजन घाक दपटशा दाखवून ह्या गणपतीच्या प्रतिष्ठापनासाठी  त्या भागात पैसे गोळा करायचा. पण हा गणपती आज धार्मिकतेच्या अंगाने विचार केला तर खूप महत्वाचा आहे.

गणपती म्हणजे सगळ्यांचच लाडकं दैवत. पूर्वीच्या काळी ह्या उत्सवाच्या वेळेस सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, कॉलनी मधल्या मुलांचे नाच, गाणी ,खेळ,स्पर्धा, तरूण आणि प्रौढांसाठी मोठमोठ्या वक्त्यांची भाषणं अरेंज केली जायची. स्त्रियांसाठी एखादी  पाककला स्पर्धा, किंवा भजनी स्पर्धा पण असायच्या.  या मुळे मुलं, तरूण आणि मध्यमवयीन लोकं सगळे जण गणपतीची वाट पहात असायचे. तेंव्हा थॊडे  कमी पैसे जरी गोळा झाले तरी हे सगळे कार्यक्रम अगदी व्यवस्थित मॅनेज केले जायचे.(पण “गेले ते दिवस, पूर्वी असं नव्हतं” आणि असं म्हंटलं की आपण म्हातारे झालो की काय.. असे वाटायला लागते. )

लोकलच्या स्टेशन शेजारी एक गणपती बसतो. त्याचं स्टेज बांधणं सुरु होतं, मी सहजतिथे दोघांचं बोलणं ऐकलं, एक म्हणत होता, स्टेज खाली कमीत कमी पाच फुट उंच तरी जागा हवी म्हणजे पत्ते खेळायला व्यवस्थित पणे बसता येइल. वर गणपती, आणि स्टेजच्या खाली ( गणपतीच्या खाली ) पत्ते! कदाचित रात्री दारू वगैरे चा पण प्रोग्राम होत असावा – कोणास ठाऊक! गणपतीचे दहा दिवस तर मस्त पैकी उत्साहात जातात, पण शेवटच्या दिवशी जो धुमाकूळ असतो त्याबद्दल काही न बोलणे बरे.

बहुसंख्य मोठे गणपती हे समुद्रावर विसर्जन केले जातात. हे गणपती असतात प्लास्टर ऑफ पॅरिसचे, की जे पाण्यात सहजा सहजी  विरघळत नाही. विसर्जनाच्या वेळी जर भरती असेल, तर फारसं आत न नेता, हे गणपती किनाऱ्याच्या जवळच विसर्जन केले जातात. दुसऱ्या दिवशी मग जेंव्हा ओहोटी सुरु होते, तेंव्हा हेच तुटके गणपती उघडे पडतात. आमच्या आक्सा बिच वर तर हात तुटलेले, सोंड तुटलेले, आडवे पडलेले असे शेकडॊ  गणपती समुद्राच्या पात्रात पडलेले दिसतात. कार्पोरेशन चक्क डोझर आणून मग कधी तरी सगळी सफाई करते. या मोठ्या गणपतींची ही दैना खरंच पहावत नाही. गणपती हा मातीचाच असला पाहिजे याबद्दल जर नियम बनवला तरी बराच फायदा होईल- पण हे करणार कोण??. गणपतीला रंगवण्यासाठी वापरण्यात येणारे रंग हे लेड  ( शिसं )युक्त असतात, आणि इतके किलॊ लेड ( शिसं) समुद्राच्या पाण्यात मिसळल्यावर पर्यावरणाचे काय होत असेल याची कल्पना करा.

पर्यावरणा बद्दल कोणाला काही घेणं नसतं.  पहिली गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या ( १८ फुट उंच) वगैरे मूर्तीची गरजच नाही- फार तर ४ फुटाचा गणपती पुरेसा असतो. आणि जरी समजा तुम्ही १८ फुटी मुर्ती तयार करवली,तरी  ठीक आहे, पण  तिच्या बाबतीत  पुण्याची पद्धत वापरायला काही हरकत नाही. पुण्याचा गणेशोत्सव अजूनही वाखाणण्यासारखा आहे. प्रत्येक गोष्ट शिस्तीत सुरु असते. मिरवणूक असो की विसर्जन. पुण्याला मोठ्या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही.  दगडू शेठ हलवायाची, सारसबाग, शनिवारवाडा, वगैरे अनेक मोठमोठ्या गणेश मूर्ती कित्येक वर्ष जुन्या आहेत. दरवर्षी त्याच मूर्तीला पेंट करून पुन्हा बसवले जाते, आणि पूजा झाल्यानंतर लहान मूर्तीचे विसर्जन केले जाते. पुणेकरांचे अनुकरण जर मुंबईकर करतील, तर त्यांच्या आवडत्या गणेशाच्या विडंबन झालेले त्यांना पहावे लागणार नाही.

नुकताच मी अहमदाबादला गेलो होतो, तेंव्हा तिथे पण भाजपा सरकारने साबरमती वर गणपती विसर्जनास मनाई केलेली आहे असे समजले. कांकरीया तलाव , जो एकेकाळी अहमदाबादचे गटार म्हणून ओळखला जायचा , त्याच तलावात गणॆश विसर्जन केले जायचे. आज त्याच तलावाचे केलेले सौंदर्यीकरण पाहिल्यावर आपण आश्चर्यचकित होतो. जर हे गुजराथ मधे नरेंद्र मोदीला शक्य आहे, तर महाराष्ट्रात का बरं नाही?  गेले कित्येक वर्ष मनात असलेला सल आज इथे लिहून काढलाय ..

शेवटी पुन्हा एकदा म्हणतो, पुणेकरांचे  अनुकरण मुंबईकरांनी या उत्सवाच्या बाबत करायला काही हरकत नाही, म्हणजे या आवडत्या देवाची विटंबना टळेल.. कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नाही, पण जर दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सण and tagged , , , . Bookmark the permalink.

61 Responses to हुश्शार पुणेकर.. त्यांच अनुकरण करा मुंबईकरांनो..

 1. काका… खरंच मनातलं बोललात… गणेश विसार्जानाबाबतीत सगळ्यांनीच पुण्याचे अनुकरण करण्याची गरज आहे… मी जेव्हा पहिलेंदा पुण्याचे गणेश विसर्जन पाहिले त्यावेळी मला थोडे पटले नाही.. कारण गणेश विसर्जन हे व्हायलाच हवे असे मला वाटायचे.. पण खरंच ते अनुकरणीय आहे.. आपल्या बाप्पाची विटंबना आपण नाही सहन करू शकत.. पण ही गोष्ट सगळ्यांना पटवून देणे थोडे अवघड आहे.. पण अशक्य नाहीये… 🙂 .. एकदम योग्य मुद्दा मांडलात आपण..

  • निनाद,
   थोडा संकोच वाटत होता हा लेख पब्लिश करतांना, पण कोणी तरी बोलायलाच हवं या विषयावर.. म्हणून धारिष्ट्य केलं. धन्यवाद.

   • पंत,

    लेख अप्रतिम आहे. अतिशय उत्तम विचार मांडले आहेत. पूर्णपणे सहमत. शेअर केला आहे. शुभेच्छा.

    • धन्यवाद पंत. दर वर्षी गणेश विसर्जनानंतर समुद्रावर जाणे नकोसे होते. आक्सा बिच तर फारच वाईट अवस्थे मधे असतो.

 2. पुणेकर मोठी मूर्ती विसर्जित करत नाहीत कारण तेथील नदीचे पात्र तेवढे खोल नाहीये. २० फुटाची मूर्ती आणि अशा अनेक मूर्त्या तेथील पात्रात विसर्जित होणार नाहीत. पुण्याच्या ह्या limitations आहेत, म्हणूनच मोठ्या मूर्त्या तशाच ठेवतात आणि लहान मूर्त्या विसर्जित करतात.

  • विनय,
   दगडूशेठ हलवाई ची मूर्ती फार तर पाच सहा फुटाची असेल. हा मोठ्या आणि उंच मुर्त्यांचा सोस फक्त मुंबई मधेच दिसतो. मुंबईला पण पाणी नसतंच समुद्रकिनाऱ्यावर, मग मुर्ती झोपवून विसर्जन करतात . दोन गोष्टी महत्त्वाच्या, एक मूर्तीची उंची लिमिट करणे, किंवा लहान मूर्ती विसर्जन करणे.मला वाटतं की मुळा मुठे मधे दहा एक फुट पाणी तर नक्की असेल्च..

 3. sagar says:

  kaka.,
  kharach manatla bolalaat. halli pratyek choukaat ek ganapati ahet….aani ho ajun ek sangavese vatate mandalaat ganapati anni speaker var “Daaru ki bottle” gaan. He faar vichitra vatat aikun he sagl. Tilakkani sarv ekatr yaavet mhanun ha ustav suru kelaat aani aaj sarv separate mandal thatun vegle zalet sarv

 4. अतिशय सुंदर, समयोचित लेख. अभिनंदन पंत.

 5. ruchira2702 says:

  खरय काका, मुर्तीची उंची कमी केली तर ह्यांची श्रद्धा कमी होते का कळत नाही मला.. का उगाच अट्टाहास विटंबनेचा?

 6. Dinesh Pawar says:

  kharaech …..khup dukh vatate ase pic pahun….

 7. aruna says:

  100% correct. and i agree with you entirely. for your information, many Puneites now immerse the idol in specially prepared tanks. some do it at home in a bucket and pour the ater in their gardens!

  • अरुणा
   धन्यवाद. मुंबईला पण कृत्रिम तलाव बनवले जातात, पण त्या मधे पण मुर्त्य़ांचे पिओपी मुळे विघटन होत नाही. मी स्वतः पाहिले आहे ही गोष्ट!

 8. Tanvi says:

  अगदी मनातले मुद्दे मांडलेत महेंद्रजी…. उत्तम पोस्ट!!

 9. gouri0512 says:

  काका, आमच्याकडे गणपतीमध्ये अजूनही स्पर्धा असतात सोसायटीमध्ये. नाटक बसवतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात.
  बाकी सार्वजनिक गणपती बघून उत्सावापेक्षा विटंबनाच जास्त जाणवते.

  • गौरी
   ते दिवस खरंच गेले. आमच्या लहानपणी गणपती उत्सव अगदी अंगात यायचा. 🙂 मस्त दिवस होते ते!

 10. गिरीष गोखले says:

  आपण हिंदू मुर्तीपुजेवर विश्वास ठेवणारे आहोत. आपण मंत्रोच्चार करून मुर्तीची प्राणप्रतिस्थापना करतो. एकदा उत्तरपुजा झाली की त्या मुर्तीत प्राण राहत नाही. तेव्हा विसर्जन केलेल्या मुर्ती म्हणजेच माती. तुम्ही पंचमहाभूतांपैकी पाण्यात मुर्तीच विसर्जन केल्यानंतर त्या मुर्तीची विटंबना कशी काय होऊ शकते? ख्रिश्चन धर्मियांनी या विसर्जित मुर्तींबद्दल ईमेलच्या माध्यमातून उगीचच कळ काढली आहे आणि आमचे काही ‘पुरोगामी’ म्हणविणारे आणि स्वतःच्या धर्मशास्त्रांना दारूत बुडविणारे विसर्जित मुर्तींची विटंबना होते असा गैरसमज धरून बसले आहेत.

  पुण्यात समुद्र नाही म्हणून झक मारून मोठ्या मुर्तींच विसर्जन होत नाही त्यात शहाणपण ते काय? पूर्वीच्या काळी पुण्यातील लोक (ब्राह्मण तरी) चातुर्मासासाठी मुंबईत येत असत. याचं कारण माहित आहे का? याचा अभ्यास का कोणी करत नाही? असो.

  मुंबईत नव्हे तर सर्वत्रच सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे एक धंदा झाला आहे. मात्र हि गोष्ट इतरही स्थानिक उत्सवांच्या बाबतीत होते आहे. उदाहरणार्थ – नवरात्री (गरबा, दांडिया) ,दुर्गापूजा उत्सव वगैरे. हि स्थिती बदलण्यासाठी समाज परिवर्तन होणे आवश्यक आहे मात्र समाज ‘करीना आणि कतरिना’ यांना पाहण्यात आणि ‘बिग बॉस’ पाहण्यात मग्न आहे. असो. एकंदर आगरकर, लोकहितवादी वगैरेंचे म्हणणे योग्य होते. समाज प्रबोधन न होता स्वातंत्र्य मिळाले आणि आता जो तो आपल्या मनाचा राजा आहे.

  • गिरीष
   ब्लॉग वर स्वागत. मी सामान्य माणूस मला स्वतःची तुलना त्या श्रेष्ठ लोकांशी करायची नाही. पण मला काय वाटतं ते इथे मी लिहितो.

   समजा एखाद्या माणसाला आपल्या आईच्या फोटो वर थुंक, किंवा पायाखाली तुडव असे सांगितले तर तो तसे करेल का? नाही.. कारण त्या फोटो मधे जरी जीव नसला तरी भावना निगडीत असतात. तसेच माझे मत भग्न मुर्तीच्या बाबत आहे. जरी मूर्ती विसर्जित केलेली असली तरी ते भग्न रुप दिसले की नको हा उत्सव असे वाटू लागते, किंवा मातीच्या लहान मूर्ती का बरं वापरत नाहीत हा प्रश्न पडतो..असो.. तुमच्या मताचाही आदर आहे.

   पण जाता जाता अजून एक गोष्ट सांगाविशी वाटते, की गणेश मूर्ती ही मातीची असावी असा संकेत आहे, पण ती प्लास्टर ऑफ पॅरिसची असल्याने ती पजे साठी योग्य ठरत नाही , आणि तसेच पाण्य़ातही विरघळत नाही. जर मुर्ती मातीची असली तर हा प्रश्न आलाच नसता. आणि दूसरी गोष्ट इतकी मोठी म्हणजे १८-२० फुटी मूती बनवण्याचे काही एक कारण नाही, पुजे साठी २-३ फुट उंच मुर्ती असली तरी चालू शकते. . असो..

   • गिरीष गोखले says:

    “ख्रिश्चन धर्मियांनी या विसर्जित मुर्तींबद्दल ईमेलच्या माध्यमातून उगीचच कळ काढली आहे आणि आमचे काही ‘पुरोगामी’ म्हणविणारे आणि स्वतःच्या धर्मशास्त्रांना दारूत बुडविणारे विसर्जित मुर्तींची विटंबना होते असा गैरसमज धरून बसले आहेत.” – महेंद्र – हे तुम्ही वाचलं आहे का? याबद्दल आणखी माहिती हवी असल्यास विश्व हिंदू परिषदेकडे संपर्क साधा.

    शास्त्रात सांगितल्याप्रमाणे उत्तरपूजा झाल्यानंतर मूर्तीचं शक्यतो वाहत्या पाण्यात विसर्जन करावं. एकदा विसर्जन झालं की ती मुर्ती नव्हे. “देवतेचे किंवा मूर्तीचे विटंबन होते आहे” हा गैरसमज ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी रुजविला आहे. याबाबत आणखी माहिती हवी असल्यास विश्व हिंदू परिषदेशी संपर्क करा. खेड्यातून तर मुर्तींच विसर्जन वर्षानुवर्षे चक्क विहिरीत केलं जातं आहे. मुळात त्या विसर्जन केलेल्या मूर्तींची छायाचित्रे काढलीच का? तसे करण्यापासून आपण हिंदू कोणाला अडवत का नाही? पुरोगामी म्हणवून घेणे ठीक आहे मात्र आधी शास्त्र काय आहे ते समजून घेतले पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मुंबईत किती तरी लोकांना वांद्र्याच्या खाडीत/नाल्यात श्रीफळ किंवा तत्सम वस्तूंचे विसर्जन चालत्या रेल्वेतून करताना तुम्ही दररोज पाहू शकता.

    ईथे थोतांड करायला आणि अर्धवट-पुरोगामी बनून समाज प्रबोधन करायला सगळे तयार आहेत मात्र शास्त्र काय आहे ते समजून घ्यायला कोणी तयार नाही. इतकेच जर पुरोगामी आहात तर मग मुर्तीपुजेलाच विरोध करा.

    तुम्ही सत्यनारायणव्रताला गणपतीपूजनासाठी सुपारी ठेवता. पुढे त्या सुपरिच काय होतं याचा कधी विचार केलं आहे का?

    पुरोगामित्व म्हणजे मुर्तीपूजेला विरोध! पुरोगामित्व म्हणजे नास्तिकता! एकतर पूर्णपणे पुरोगामी व्हा नाहीतर निदान शास्त्र पाळा आणि धर्म टिकवा. एकीकडे आम्ही चंद्रावर जातो आणि दुसरीकडे ग्रहांची आम्हाला भीती याला काहीही अर्थ नाही. चंद्रावर जाणे, तिथे पाय ठेवणे म्हणजे मग चंद्राचा अपमान नाही का? म्हणजे मग शांत करायला हवी.

    पुरोगामी जरूर व्हा मात्र जर इतरधर्मीय चुकीच्या समजुती पसरवून तुमचा धर्म बुडवू पाहत असतील तर ते होऊ देऊ नका.

    हिंदूंच्या देशात हिंदुना सगळ्याच गोष्टींवर बंदी. १) महाआरती करायची नाही २) गणपतीच्या वेळी ११ नंतर सांस्कृतिक कार्यक्रम करायचे नाहीत ३) आता मूर्तींची उंची कमी करणारा नियम लवकरच निघेल. थोडक्यात काय हिंदुनी सगळीकडे मुग गिळून गप्प बसायचं.

    हिंदुनो आधी स्वतःचा धर्म किंवा शास्त्र काय सांगत ते समजून घ्या. उगीच एकाने गळा काढला म्हणून विसर्जित मूर्तींची विटंबना होतो म्हणून भोकाट पसरू नका.

    • गिरीष,
     नाही मी तुम्ही म्हणता तो इमेल पाहिलेला नाही . प्रत्येकाचेच विचार एकसारखे असू शकत नाहीत. कुठलीही एकदम टॊकाची भुमीका घेणे मला मान्य नाही. जास्त काही लिहित नाही, कारण मला जे लिहायचं आहे ते वर लिहिले आहे. मूळ मुद्दा पिओपी चे गणपती, १८-२० फुटी मूर्ती त्या बद्दल तुम्हाला जर काहीच वाटत नसेल तर ठिक आहे, तो तुमचा प्रश्न आहे. ्मी न लिहिलेलेल मुद्दे माझ्या तोंडी घालून तुम्ही स्वतःच याचे खंडन केलेले आहे. असो.
     प्रतिक्रियेसाठी आभार.

    • Raghu says:

     @Girish Gokhale
     Sagalikade mug gilun basanare tumachya amachya sarakhech lok ahet.. Koni wirodh karat nahi.. Sahan karanyachi sagalyana saway zali ahe.. Ekhadyane lihanya mage kay bhavana kay ahet he na samjun gheta tumhi faqt purogamitva war mothe bhasahn dile ahe.. Uttarpuja zali ki pran nighun jato pan bhavana tashyach rahatat.. Hindu dharmat manus gela tari aapan tyala tyachya ichchit thikani janya sathi madat karto tithe pan purogamitwa mandanar ka tumhi..
     Tumachya mahiti sathi sangato “Satyanarayan” hi kuthalya shastrat sangitaleli puja
     nahi. ti kartana normal ganpatichi puja hote ani mag katha sangitali jate..
     Tumhi sudha gharat Ganpatichi murtich basawat asal naa? tumhi kuthalehi shubh karya kartana muhurta baghata ki nahi? Koni itar dharmiyani kal kadhanya peksha aapan jar aapala dharma nit samjun ghetala ani tyamagachi bhawana tar ya saglaynacha surekh mel shradhesobat karta yeyil..
     @Kaka
     Khupach chhan lekh..

     • गिरीष गोखले says:

      महाशय रघु – आधी मराठी लिहिताना इंग्रजी लिपीचा वापर केल्याबद्दल तुमचा त्रिवार निषेध!

      आता मुद्याकडे वळतो – १) सत्यनारायण व्रत शास्त्रात येत नाही? मग कुठे येत? २) “मी पुरोगामी नाही” तर एक कट्टरवादी आहे. तुम्ही अभिप्राय नीट वाचलेला नाही. ३) देवाच्या विसर्जित मुर्तीची आणि मेलेल्या माणसाच्या पार्थिवाची तुलना धर्मशास्त्रात बसत नाही. तो “अश्लीलपणा” आहे. मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी शास्त्रात “गरुड पुराण” आहे. त्यात जे सांगितले आहे ते न करता “फोटोंची पूजा करणे आणि तत्सम प्रकार” हि एक आधुनिक कृती आहे.

      अहो, लिहिणाऱ्याची भावना पोहोचली नसती तर इथे कशाला अभिप्राय दिला असता? मुळात हि भावना आता का निर्माण झाली? २० वर्षांपूर्वी का नव्हती? मुंबईत सुमारे ३५ वर्षे पीओपी च्या १५-२० फुटाच्या मूर्ती समुद्रात विसर्जित केल्या जात आहेत. हमी/माहिती हवी असल्यास ‘खातूंकडे’ जा. आता “खातू” कोण ते विचारू नका.

      मूळ मुद्दा असा आहे की या विसर्जित मुर्तींच्या विटंबनेचा मुद्दा आला कुठून? यासाठी आधी या विषयावर भाष्य करताना माहिती मिळवा. उगीच ईमेल वाचून किंवा वृत्तपत्र वाचून बरळू नका.

      माझे वडील एक उत्तम मुर्तीकारही आहेत आणि त्यांनी नेहमीच फक्त ‘शाडूच्या (मातीच्या)’ मूर्ती बनविल्या. त्यांचा पीओपीच्या वापरला नेहमीच विरोध होता. त्यांनीही ४-५ फुट उंच मूर्ती करून दिल्या आहेत मात्र मातीच्या असल्याने त्या हळूहळू विरघळतात , लगेच नाही. अगदी मातीच्या मुर्तीही जर नीट खोल समुद्रात नेऊन सोडल्या नाहीत तर पुन्हा किनाऱ्यावर येतात.

      “इथे माहिती कोणालाच नसते मात्र उगीच गळे काढायचे.”

      आज-काल “ईको फ्रेंडली” मुर्ती मिळतात. उत्तम पर्याय म्हणजे “समाज प्रबोधन”. नुसती मुर्तीचो उंची कमी करणे हा उपाय नाही. मुर्ती “ईको फ्रेंडली” असावी मग ती किहिती उंच का असेना. तसेच सरकारने या मोठ्या मूर्तींचे विसर्जन खोल समुद्रात करण्यासाठी मोठ्या फेरी बोटी/जहाजांची व्यवस्था केली पाहिजे.

 11. pkphadnis says:

  पुण्याचे अनुकरण करा? विसर्जनाची मिरवणूक दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत चालू ठेवायची? चांगली कल्पना आहे!

  • काका ,
   माझा मुद्दा विसर्जनाबाबत आहे, म्हणजे लहान मुर्ती विसर्जीत करून प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती तशीच ठेवायची दुसऱ्या वर्षासाठी..

 12. Manish says:

  महेंद्राजी
  समाजात निर्माण झालेल्या दोन gatat apan मध्यमवर्गीय मरतो. पापाचा घडा भरू द्या कि. आपल्याकडून विटंबना होऊ द्यायची नाही बाकी सब झूट
  मनीष

 13. मस्त लेख नेहमीप्रमाणे काका ! लोकांनी लेखातून पुणेकर-मुंबईकर शोधण्यापेक्षा त्यातली तळमळ जाणून घ्यावी!
  काका आमच्या घराण्याच्या गणेशोत्सवाला २७५ वर्षांचा इतिहास आहे,इ.स १७३२ चा शम्भूपुत्र शाहू महाराजांच्या काळातील पहिला उल्लेख आहे, त्याकाळी प्रतीकात्मक विसर्जन व्हायचे, म्हणजे नदीच्या घाटावर मातीचा (चिखल करून) गणपती करून त्याची पूजा करून पुन्हा पाण्यात सोडला जायचा.याने प्रदूषण तर होतच नव्हते उलट ती मुर्तीही लगेच विलीन होऊन जायची.अश्याच इतिहासाची पुनुरावृत्ती करण्याची गरज आहे त्यासाठी
  लोकांसोबत मंडळांचा हि सहभाग महत्वाचा आहे. इको फ्रेंडली काळात गणपती पण इको फ्रेंडली नकोत का ?

  • मालोजीराव
   धन्यवाद, माझं म्हणणं समजून घेतल्याबद्दल.
   मला फक्त पाण्यात विरघळणारी मुर्ती वापरावी, आणि तिचा आकार लहान असावा एवढीच अपेक्षा आहे. 🙂 जर पिओपी विरोधी कायदा केला तरच काही होऊ शकेल, नाही तर दर वर्षी प्रमाणे या वर्षी पण भग्न मुर्ती पहाणे नशिबी आहे आपल्या.
   तुमचा ब्लॉग पाहिला.. अप्रतीम आहे. धन्यवाद.

  • गिरीष गोखले says:

   आपला अभिप्राय उत्तम आहे. वाचून आनंद झाला.

   आज-काल “ईको फ्रेंडली” मुर्ती मिळतात. उत्तम पर्याय म्हणजे “समाज प्रबोधन”. नुसती मुर्तीचो उंची कमी करणे हा उपाय नाही. मुर्ती “ईको फ्रेंडली” असावी मग ती किहिती उंच का असेना. तसेच सरकारने या मोठ्या मूर्तींचे विसर्जन खोल समुद्रात करण्यासाठी मोठ्या फेरी बोटी/जहाजांची व्यवस्था केली पाहिजे.

 14. मिलिंद : says:

  लेख खरंतर विचार करायला लावणारा आहे. सोबत टाकलेले फोटो बघून मन उदास झालं. देवावरच हे कसलं प्रेम ? असा प्रश्न पडला .
  खरंतर आता एक गाव एक गणपती सारख्या सरकारी schemes ची अंमलबजावणी करण्याची नितांत गरज आहे.
  पुण्याबद्दल जे लिहिलं आहेत ते विसर्जना पर्यंत ठीक आहे पण बाकी सगळा मामला मुंबई च्या पावलावर पाऊल ठेऊन आहे हे नक्की. तीच ‘ शुभेच्छुक’ पोरं, तेच नेते , तेच त्यांचे दागिने घालून फोटो (गणपती लाजेल इतके दागिने भक्तांच्या अंगावर असतात) , मिरवणुका मध्ये तशीच बेभान होऊन नाचणारी तरुणाई , आणि मुळा – मुठेला पूर येईल इतकी दारू (गेल्या एका वर्षात पुणे महानगर पालिकेला फक्त दारू मधून इतका OCTROI मिळाला आहे कि ते बाकीच्या वस्तूंवर OCTROI CANCEL पण करू शकतील ) .
  समाजात होते असलेल्या एकंदर अध:पटना बद्दल मी आज लिहिणार नाहीये पण अजून २ उपक्रम मला खूप स्तुत्य वाटले जे मी इथे नमूद करू इच्छितो.
  पुण्यातल्या काही शाळात जुलै मध्ये मातीपासून गणपती बनवायचे workshops घेतले जातात. शाळेतली मुलं आणि त्यांची मन संस्कारक्षम असतात त्यांना घरी गणपती कसा आणि का बनवायचा हे सांगितलं जातं. गणपती बनवण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात . स्पर्धा- बक्षीस आलं कि मुलं जोमाने कामाला लागतात. मग हि मुलं घरी पण एक छोटासा मातीचा गणपती बसवतात आणि महत्वाचा म्हणजे आई वडील तो गणपती देवघरात ठेवून त्याची प्रतिष्ठापना करतात.
  बऱ्याच घरात हल्ली चांदीची मूर्ती आणायची पद्धत सुरु झालीये. घरच्या कुंडीतली बागेतली माती घेऊन मूर्ती करायची . ती आणि चांदीची मूर्ती दोन्हीची पूजा. पण विसर्जन मातीच्या गणपतीचं. चांदीचा गणपती बाप्पा दिसा-या दिवशी परत त्याच्या कपाटात. हेय निदान सुशिक्षित समाजाने जरी सुरु केलं तरी चालणारे. अगदी १०० % नाही पण निदान १०-२० % तरी मदत होईल ना???
  पण मला ती workshops ची idea मुंबई ने घ्यावी असं वाटतं. बाकी पुण्याकडून शिकण्यासारखं सध्यातरी इतकंच आहे.

 15. anaghan says:

  मी आता माझ्या परीने ह्या सर्व प्रकाराविरुद्ध ‘प्रोटेस्ट’ – निषेध नोंदवण्यास सुरवात केली आहे.
  ज्या ज्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांकडे PoPचे गणपती आहेत त्यांना मी फोन करून कळून टाकले आहे की तुमच्याकडे PoPचे गणपती आणले असल्याकारणाने मी तुमच्याकडे येऊ शकत नाही.
  ह्यातून त्यांच्या भावना दुखावत असतील तर मला वाटतं चांगलंच आहे….त्यामुळे तरी त्याचे गांभीर्य कळेल.

  • आपल्या हाताने मातीचे बनवायला आवडेल मला. पण आमचा गणपती नागपूरला असतो. 🙂

   • anaghan says:

    आणि तो कसला असतो ?

    • आमच्या घरी पूजे साठी पोकळ गणपती चालत नाही, मातीचा भरीव लागतो .

     • anaghan says:

      सुंदर. 🙂
      मला वाटतं आपले पूर्वज विचारी होते. आपण मात्र आपली अक्कल विकून टाकली आहे.

      • खरं आहे.. मातीची भरीव मुर्तीच फक्त पूजेला चालते 🙂

       • गिरीष गोखले says:

        अहो, मातीची मुर्तीही पूर्ण भरीव नसते तीही आतून पोकळ असते. तसे न केल्यास त्या मूर्तीचं वजन खूप होईल आणि मुळात माती खाली बसते आणि आकार नीट घेणार नाही. मुर्ती सुखाण्यासाठी किमान अर्धा महिना लागेल जर मुर्ती भरीव असेल.

        • गिरीष
         आमच्या घरी तीर्थरूपांच्या म्हणण्याप्रमाणे शास्त्रानुसार केवळ मातीची भरीव मुर्ती फक्त पूजेला चालते ( आमच्या घरी शास्त्र असे मह्णते नावाची दोन पुस्तकं आहेत त्यात दिलेलं आहे ते. ). भरीव मुर्ती करतांना त्या मधे गवत मिसळले जाते , ज्यामुळे मूर्तीला सुकतांना भेगा पडत नाहीत.

 16. अमोघ says:

  थोडी टोकाची भूमिका वाटेल, पण माझ्या मते आता सार्वजनिक गणेशोत्सव बंद करण्याची वेळ आलेली आहे. अशा प्रकारच्या गणेशोत्सवाला धर्मशास्त्राचा काडीचा आधार नाही हे धर्मशास्त्र धर्मशास्त्र करत बसणार्यांच्याही लक्षात येत नाही. (मुळात गणपतीलाच किती आधार आहे हे शोधायला गेलं तर प्रतिगाम्यांची पंचाईत होईल. पण ते असो….येथे तो विषय नाही). टिळकांचा उद्देश केव्हाच मागे पडलाय. सार्वजनिक गणेशोत्सव हे केवळ काळ्या उद्योगांचे अड्डेच झालेले आहेत. भक्तिभावाने दर्शनाला जाणार्या नागरिकांनाही प्रचंड त्रासच सहन करावा लागतो. मोठ्या प्रमाणावर चोऱ्यामाऱ्या गर्दीत होत असतात. शिवाय मंडप उभारणीसाठी रस्त्यांवरच खड्डे खणणं, रस्ते अडवणं, त्यामुळे ट्रँफिकचा बोजवारा, आजारी, वृदध, अपंग ह्यांचे हाल…..खूप झालं हे आता.

  हा लेख मात्र खूप आवडला काका….:)

  • अमोघ
   सहमत आहे. धार्मीक उत्सवाला सामाजिक स्वरूप दिल्या जाऊ नये असे न्यायमुर्ती रानड्यांचे मत होते असे नुकतेच मटा मधे वाचले. आणि आज त्यावेळी त्यांनी केलेले ते विधान पटते. 🙂

  • anuvina says:

   मी पण हाच विचार करत होतो. का असतात हे सार्वजनिक गणेशोत्सव? काय फलश्रुती आहे त्यांची? कारण त्या पाठची सामान्य जनतेची भूमिकाच बदललेली आहे.

   • सार्वजनिक उत्सव धार्मिकते कडे झुकलाय. लाल बाग च्या राजाचे दागिने, भेटी पाहिल्या की हे जाणवते.

 17. चांगला लेख आहे. आम्ही ‘आरंभ फाउंडेशन’तर्फे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना भेटून या सर्व गोष्टींची चर्चा करतो आहोत. गेल्या आठवड्यात, सांगलीतल्या एका मंडळाच्या कार्यकर्त्यांना भेटलो. मंडळाचं पंचविसावं वर्ष असल्यानं मोठ्ठी मूर्ती ठरवलीय, अर्थातच प्लास्टर ऑफ पॅरीसची. विसर्जनानंतर ही मूर्ती विरघळणार नाही, उलट तिचे तुकडे-तुकडे होतील, याबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. नऊ दिवस ज्या गजाननाची मनोभावे पूजा करायची, त्याच्या अशा विटंबनेला आपण जबाबदार ठरायचं का, यावर कार्यकर्त्यांनी विचार केला. यंदाची मूर्ती बदलता येणार नाही, पण पुढच्या वर्षीपासून नक्की शाडूची मूर्ती आणू, असं मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितलं. “मूर्ती मोठ्ठी असलीच पाहिजे असं नाही, श्रद्धा मोठी असली म्हणजे झालं,” असं शेवटी अध्यक्ष म्हणाले. मंगलमूर्ती मोरया!

  • मंदार,
   ब्लॉग वर स्वागत. असेच जनजागरण जर होत राहिले तर पिओपी चा वापर नक्कीच कमी होऊ शकतो. स्तुत्य उपक्रम, त्याबद्दल तुमचे करावे तितके कौतूक थोडेच होईल.

 18. Prathamesh says:

  ekdum barobar lihilay kaka sagala…… 😀
  .
  Thanks,
  ek Punekar… 😀

 19. अहो.. काका…. सार्वजनिक काय.. घरच्या गणपतींची ही तीच गत आहे हल्ली… मला आत्तापर्यंत वाटत होतं कि निदान घरच्या गणपतींच्या बाबतीत तरी.. सर्व श्डोप्चार पाळले जातात म्हणून….
  “पण, यंदा गावी गेलेलो तेव्हा एका पाहुण्यांकडे गणपती निमित्त जाणं झालं. गावची आणि मुंबईची सर्व पुरुषमंडळी.. संध्याकाळी.. त्याच.. घरातल्या गणपतीच्या समोर जुगाराचा डाव मांडून बसले… Height म्हणजे.. पत्त्यांचा संच.. गणपतीच्या पुढ्यात ठेवलेला.. आणि खेळायला बसताना गणपतीच्या पाया पडून.. पत्त्यांचा संच उचलतात… बरं एवढंच नाही तर पत्त्यांसोबत.. दारू.. चेतनाकाड्या वैगरे… सुग्रास अगदी…..मांसाहारी चकणा तेवढा नाही काय तर म्हणे.. घरात गणपती आहेत…!!”
  आपल्याला काय करायचंय आपण या घरात पाहुणे आहोत.. पाहुण्यांसारखं राहायचं म्हटलं आणि गप्पा बसलो… डाव (धिंगाणा) चांगला रात्रभर चाललेला… आणि त्यात कहर म्हणजे.. रात्री एक – सव्वा एक वाजता (जशी पोटात गेलेली दारू बोलायला लागली…) तसं मंडळीना भजन करायची हौस आली… सर्व टाळ मृदुंग वैगरे घेऊन बसले… मग मात्र मस्तकाची शीर तडकली आणि मी तोंड उघडलं… तर मंडळी मलाच.. तत्वज्ञान शिकवू लागली… काय तर म्हणे…” मन चंगा तो Quarter में गंगा….” x-(
  ती मखरात बसलेली.. गणपतीची… मूर्ती या असल्या लोकांसमोर खरंच खूप केवीलवाणी वाटत होती मला…… 😦
  “…… अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा… तू घाल पोटी…..” असं म्हणून अजून किती अपराध करणार आहोत आपण…?????

 20. अक्षता says:

  लहानपणी गणपतीचं पोट एवढं मोठं का? असं विचारल्यावर घरच्या थोरा-मोठ्यांनी अशी समजूत काढलेली कि, तो विघ्नहर्ता आपल्या भाक्त्यांच्या सर्व चुका, अपराध आपल्या पोटात सामावून घेतो म्हणून तो लंबोदर आहे. पण आता त्याच्या त्या मोठ्या पोटाची चिंता वाटू लागली आहे, त्याच्या भक्तांचे असे किती अपराध तो पोटात घेणार आहे???

 21. महेश कुलकर्णी says:

  मस्त लेख अप्रतिम,सुंदर माडणीकेली

 22. amol says:

  agdi samarpak lekh ahe

 23. pranita says:

  khar ahe ha lekh khupch bhavala….. apalya avadatya ganpati bappala as pahavat nahi… sagalyani ya vishayacha vichar jarur karava

 24. सारंग बर्डे says:

  श्री माननीय महेंद्र, विषयाची मांडणी चांगली केलेली आहे.देवाच्या नावावर धाक तर काय , सगळी कडेच दाखवतात. पुणे असो वा मुंबई. By the way माननीय श्री गिरीश गोखले, चर्चे चा मूळ विषय निसर्गाचे प्रदूषण on account of Pb (Lead) and POP (CaSO4) आणि ऊर्जे चा अपव्यव (wastage) हा आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे शास्त्राबद्दल , पण शास्त्राच्या ग्रंथाचे (पुस्तकाचे) “writers and editors” पण आपण (Human being) च आहोत. त्यामुळे त्यात किती “manipulations” आहेत हे आपल्याला पण ठाऊक नाहीये. पण मला तुमच knowledge आवडलं .

 25. sarangbarde says:

  श्री माननीय महेंद्र कुलकर्णी देवाच्या नावावर धाक तर काय , सगळी कडेच दाखवतात. पुणे असो वा मुंबई. श्री माननीय गोखले, blog चा मूळ मुद्दा “Pollution by colorants (containing lead metal) and POP (CaSO4) ” हा आहे. शास्त्र हे कितपत ‘manipulated’ झालेला आहे, ह्याची तेवढी कल्पना नाही, पण ह, लोक मूर्तिपूजा थांबवणार नाहीत, हे नक्की. शाडूच्या मूर्ती वापरून pollution कमी करणे हा श्री माननीय महेंद्र कुलकर्णी ह्यांचा प्रयत्न दिसतो, त्यावर विचार करा.

  • सारंग
   ब्लॉग वर स्वागत. मी लिहितांनाच आधी सांगितले होते की मला धार्मिक बाजूबद्दल लिहायचे नाही म्हणून.कारण मूळ मुद्दा तो नव्हताच.. प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.

 26. श्वेता says:

  खरच, मूळ मुद्दा discussion मधे बाजूलाच राहिला.. मूर्ति विसर्जन साठी मुंबई महापालिकेने कडक नियम करायला हवे.. डॉ. शुभा राऊळ मुंबईच्या महापौर असताना, eco-friendly गणपती साठी अनेक उपक्रम राबवले गेले होते .. latest scene मला माहीत नाही.. आयआयटी मुंबईचे प्राध्यापक श्याम आसोलेकर ह्यांनी मूर्ति विसर्जन च्या concept वर खूप संशोधन केले आहे. I had his research papers.. cant find them now.. पण गूगल वर शोधल तेव्हा मिळून सार्‍याजणी मधला एक लेख सापडला त्यांचा.. here is the url.. I hope it works.. http://www.miloonsaryajani.com/node/459
  सर, आता 4-5 दिवसांनी चक्कर टाकते ब्लॉग वर 😛 see you then 🙂

  • श्वेता
   बरेचदा असे होते, मला लिहायचं असतं एखाद्या गोष्टीबद्दल , पण नेमक्या शब्दात न मांडता आल्याने थोडे वेगळेच वळण मिळते, आणि कॉमेंट्स पण त्या अनुषंगाने येतात. पण चालायचंच.. काय वाटेल ते लिहितो, म्हंटल्यावर असे होणारच !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s