मुक्त विचार…

आजचे पोस्ट म्हणजे मुक्त विचार. एका विचाराच्या अनुषंगाने येणा्रे सगळे विचार इथे मांडतोय.

सावित्री बाई फुले.

आमच्या घरी एक नागपूरला असतांना एक बाई धुणे भांडी करायला यायची. तिचा नवरा सायकल रिक्षा चालवायचा. स्वतःची प्रॉपर्टी म्हंटलं तर रिक्षा आणि कार्पोरेशनच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेली एक झोपडी . पाच मुलींची आई असलेली ती बाई जेंव्हा यायची तेंव्हा तिच्या पाचही मुली वय वर्ष दोन ते ७ च्या दरम्यानच्या तिच्या मागे एखाद्या बदकाच्या मागे पिल्लं यावी तशा यायचा.अंगावर नवऱ्याने केलेल्या  मारहाणीचे डाग असले तरी ते अभिमानाने दाखवायची, म्हणायची, नवरा आहे हो, मारणारच, मुलगा होत नाही म्हणून- म्हणजे पाच वेळेस मुलगी झाली हा तिचा दोष , आणि हे तिलाही मान्य होतं! खरं तर मुलगा किंवा मुलगी होणं हे पुरुषावर   अवलंबुन असतं पण विचार कोण करतो? त्या साठी स्त्री ला दोषी समजणे ही पण  एक परंपराच आहे .  तिने एक दिवस येऊन सांगितले, की  पुन्हा दिवस गेले  आहेत, आणि तिने कामाला  येणे बंद केले.  वंशाला दिवा हवा होता त्याला.

वंशाला दिवा म्हणजे नेमकं काय असतं हो?  त्या रिक्षावाल्या कडे अशी कोणती मोठी प्रॉपर्टी होती? त्याला काय रिक्षासाठी वारस हवा होता की काय?  त्या माणसाची मुलासाठी होणारी जिवाची घालमेल पाहून खरंच नेहेमी आश्चर्य वाटायचं. गरीब असल्याने गर्भजल परिक्षा वगैरे काही केलेली नसल्याने प्रत्येक वेळी मुलाच्या अपेक्षेने चान्स घ्यायचा आणि नंतर मुलगी झाली, की तिची हेळसांड करून मारहाण करायचा.

पुरातन काळापासून हाच प्रकार सुरु आहे. केवळ अशिक्षित स्त्रीच्या च नव्हे तर चांगल्या शिकलेल्या लोकांच्या बाबतीतही हल्ली गर्भजल परीक्षा करून मुलगी असल्यास गर्भपात करण्याचे प्रमाण फार वाढले आहे.  लोकांना मुली का नको असाव्या? काय बरं कारण असेल? केवळ पूर्वापार चालत आलेले संस्कार?

दूर कशाला, एकदा नागपूरला आम्ही सगळे सासरी जमलो असतांना  जेंव्हा कोणीतरी त्यांच्या ओळखीचे पाहूणे आले होते. त्यांनी विचारलं, कोणाला किती मुलं आहेत? यावर सासूबाईंचे उत्तर मोठे मार्मिक होते, दोन्ही मुलांना एक मुलगा आणि एक मुलगी, पण मुलीला (म्हणजे सौ.ला) दोन्हीही मुलीच आहेत हो. या मधल्या ’मुलीच” ह्या शब्दावर अनावश्यक दिलेला जोर, आणि त्या मूळे एकदम हताशपणा डोकावत होता . त्यांचा तो बोलण्याचा सूर अजूनही लक्षात आहे माझ्या.

जगातल्या कुठल्याही सुखा पेक्षा अपत्य प्राप्तीचे सूख सगळ्यात मोठे आहे.अपत्य प्राप्तीचे सूख म्हणजे एक भावनिक गरज असते. स्त्रियांच्या बाबतीत तर ती खूपच आवश्यक असते, आणि पुरुषाच्या बाबतीत  तर मुलं होणं म्हणजे त्याच्या पुरुषत्वाचा विजय असतो . काही कारणाने जर या अपत्य सुखांपासून वंचित रहावे लागले तर होणारा मानसिक क्लेश हा असह्य असतो. एखाद्या अपत्य नसलेल्या दांपत्या कडे  पहाण्याचा समाजाचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. मंगल कार्यात एखाद्या  प्रसंगी ’तिला’ दिल्या जाणारी वेगळी वागणूक तर स्त्रियांच्या डोळ्यातून हमखास पाणी काढते.

फार पूर्वीच्या काळी स्त्री ला कायम कोणावर तरी अवलंबून रहावे लागायचे. ब्राह्मण समाजात तर विधवा स्त्रीचे आयुष्य अगदी खूप वाईट असायचे. पुनर्विवाह करण्याची परवानगी नाही, केशवपन, आणि नंतर लाल आलवण नेसून आयुष्यभर काबाड कष्ट करायचे. त्या स्त्रीवर इतके मानसिक अत्याचार केले जायचे, की तिला ब्राह्मण समाजात जन्म घेतल्याचा पश्चाताप होत असेल का हा प्रश्न नक्कीच पडतो. इतर समाजात पुनर्विवाह चालायचा, पण ब्राह्मण समाजात स्त्रियांची परिस्थिती फार वेगळी होती. पती निधनानंतर नात्यातल्या जवळच्याच कुठल्यातरी पुरुषाबरोबर शारिरीक  संबंध येऊन दिवस गेले तर  , तर तिलाच वाईट चालीची म्हणून मारून टाकले जायचे.  सावित्रीबाई फुल्यांनी   ब्राह्मण  स्त्रियांसाठी इतकं मोठं कार्य करून ठेवलं आहे , की आजच्या स्त्रियांनी पण त्यांचे आभार मानायलाच हवे.

राजकीय नेत्यांनी पोलिटिकल गेन साठी  सावित्री बाईं सारख्या दृष्ट्या समाज सुधारक स्त्रीला पण   जातीच्या दावणीला बांधलेले आहे, आमच्या जातीतल्या म्हणून त्यांचे आम्ही आदर करणार, अशी मनोवृत्ती पण दिसून येते. म्हणूनच सावित्री बाई फुले  फक्त “एका” समाजाच्या झाल्या आहेत. त्यांच्यावर हक्क फक्त आपलाच आहे अशी विधाने राजकीय हेतूने केली जातात. आजच्या समाजाला त्यांनी  ’ त्या काळी” काय काम केलेले आहे याबद्दल अजिबात काही माहिती नाही.

ब्राह्मण समाजात सावरकर जितक्या आत्मियतेने वाचले जातात तेवढे सावित्री बाईंच्या बद्दल का बरं वाचलं जात नाही?  कदाचित  काही  ब्राह्मण द्वेष्टा संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांकडून    सावित्रीबाई आमच्या , म्हणून सारखे  त्यांच्या फोटोच्या आड दडून  ब्राह्मण  द्वेषाचे  विचार     मुद्दाम   पसरवले जातात , त्या मूळे हा फोटो दिसला की त्याच्या खाली ब्राह्मण समाजाला शिव्या घातल्या असतील असे वाटते, कदाचित म्हणून वाचावेसे  वाटले  नसतील का?  समाजाचं मन फार हळवं असतं, असं सारखं कुठेतरी काही तरी लिहिलेले वाचून आपले विचार बनवत असतं.   सावित्री बाईंना ’त्यांच्या कडून  ” आजही सपत्न वागणूक दिलेली दिसते, कारण त्यांनी जे काम केलं, त्याचा फायदा ब्राह्मण समाजाला जास्त झाला हे तर नसेल?.   सहज मनात आलं म्हणून लिहितोय,  सावित्री बाईंचा फोटो जर आज ब्राह्मण स्त्रियां समोर ठेवला तर किती स्त्रिया त्यांना ओळखू शकतील?? जर सावित्रीबाई नसत्या  तर ’लाल आलवणातल्या ’ ब्राह्मण स्त्रियांना त्यातून बाहेर पडायला कित्येक वर्ष लागली असती. असो विषयांतर होतंय.

सावित्री बाईंच्या बद्ल विकीपिडीया वर हे असे लिहून ठेवलेले आहे.

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढी परंपरांनाही त्यांनी आळा घातला. लहानपणीच लग्न झालेल्या अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. पतीच्या निधनानंतर एकतर त्यांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन केले जाई. त्यांना कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.

समाजातील इतर जाती मधल्या स्त्रियांची   परिस्थिती, ब्राह्मण स्त्रियांच्या  इतकी वाईट नसली, तरीही  फारशी चांगली नव्हती.  क्षत्रीय समाजात तर लढवय्या हवा, म्हणून मुलाच्या जन्माला मुलीपेक्षा जास्त महत्व   होते. आज लढाया संपल्या पण मानसिकता तशीच आहे अजूनही.

अनादी काला पासून सगळ्या धर्मांत लग्न हे संभोग सुखासाठी नाही तर वंश वृद्धी साठी करायचे अशी शिकवण  असायची.  प्रत्येकाला (हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन) ७-८ अपत्य तरी असायचीच.मुलं जन्माला तुम्ही घालता  ते केवळ परमेश्वराची इच्छा. तुम्ही तुमचे काम करा, संगोपना बद्दल पण  हे स्त्रीचेच काम आहे, असे प्रत्येकच धर्मात तिच्या मनावर ठसवले जाते. मुलं जर दोघांचीही आहेत, तर संगोपन केवळ स्त्रीने का करायचे हा प्रश्न  कधीच कसा   कोणाला  पडलेला नाही.?मुलींच्या संगोपना कडे नीट लक्ष दिले नाही की , मग   त्यापैकी काही मुली कुठल्या तरी आजाराने मृत्यूमुखी पडायच्या. घरामधे मुलीचा जन्म म्हणजे “एक जबाबदारी”  अशी मनोवृत्ती वाढण्याचे कारण म्हणजे मुलींचे समाजात सुरक्षित नसलेले स्थान.

युद्धासाठी, शेती मधे काम करण्यासाठी, पुरुषांची गरज ही असायची, म्हणून प्रत्येक घरात जास्तित जास्त मुलं झालेली बरी अशी भावना लोकांच्या मनात रहायची . मुलगा झाला म्हणजे घरात कामासाठी दोन हात वाढले, तलवार ढाल घेऊन घराचे संरक्षण करण्यास दोन हात वाढले, अशी मानसिकता त्या काळात होती, म्हणून एखाद्या स्त्री च्या पोटी मुलगा झाला की जास्त आनंद सिलेब्रेट केला जायचा. मुलींची हेळसांड करण, मेली तर बरी, म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करणं, असे प्रकार तर आजही पहायला मिळतात. कुठल्याही युद्धाच्या प्रसंगी सर्वप्रथम जेता हा त्या जिंकलेल्या भागातल्या स्त्रियांनाच आपल्या वासनेचे शिकार बनवतो.   स्त्रियांची सामाजिक असुरक्षितता आणि  योनीशूचितेच्या  व्हिक्टोरियन काळातल्या  कल्पना हे कारण पण असेल मुलींच्या जन्माला रोखण्याचे.

हल्ली बराच बदल झालाय वरच्या परिस्थिती मधे असे तुम्हाला वाटत असेल तर ते पूर्ण पणे चूक आहे. स्त्रिया सुशिक्षित झाल्यामुळे पुरुषांच्या बरोबरीने पैसे कमावतात,  पण स्त्री मधे  मातृत्त्वाची भावना, म्हणजेच आई होण्याची तीव्र इच्छा  एकदा वाढीस लागली की मग ती नोकरी सोडण्यासाठी पण तयार होते.  नोकरी सोडल्यावर साहजिकच घरातले इनकम कमी होतं, पण तो त्याग करायला पण स्त्रीया तयार असतात.  दोघांचेही मुल असले, तरीही रात्री बेरात्री मुलं रडल्यास , रात्रभर जागून त्याला कडेवर घेऊन फिरवणे, नॅपी बदलणे, स्वच्छ करणे वगैरे ही कामं सगळी स्त्री ची असतात. पुरुषांना कधी बाळाची नॅपी बदलून बाळाची शी  स्वच्छ करतांना पाहिलंय का? पुरुष फक्त मुलाला तो हसरा असतांनाच कडेवर घेऊन खेळतो, पण एकदा मुलं रडू लागलं, की” अगं,ह्याला   बघ बरं का रडतोय तो” म्हणून सरळ बायकोकडे देतो.   असो, याचे कारण म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या विचारांमधे असावे. सहज गम्मत म्हणून विचार आला ’  आनुवंशिक विचार म्हणायचं का याला”?

प्रत्येकालाच  आपण वृद्ध झाल्यावर मरणार,आणि मग आपल्या पश्चात आपल्या मागे  काय रहणार याची (विनाकारण) काळजी वाटत असते. या शाश्वत जगात, आपल्या अशाश्वत आयुष्याची  कुठल्या ना कुठल्या स्वरूपात   निशाणी   सोडून जायची इच्छा असते.  काही लोकं, या अशा मानसिकते  मधला फोल पणा समजून , मुलींना पण मुलांच्या इतकंच प्रेमाने वाढवतात, मोठं करतात ,शिकवतात हे जरी खरे असले, तरी बहुसंख्य लोकं  मात्र पूर्वापार चालत आलेली  संकल्पनांची जोखडं मानेवर  अभिमानाने  वागवत “वंशाच्या दिव्या”  साठी   पुन्हा पुन्हा प्रयत्न करत रहातात.

काही कर्तृत्ववान लोकं  जसे स्वामी विवेकानंद, विदा सावरकर,  सावित्रीबाई फुले वगैरे मात्र या मनोवृत्तीवर ओव्हर राईड करून  आपल्या मृत्यु नंतर आपली छाप आपण केलेल्या  कामाने सोडून जातात,  आणि उरलेले ……….??  

हा लेख थोडा भरकटला आहे याची मला पूर्ण कल्पना आहे, पण तरीही मी हा पोस्ट करतोय.स्त्री भ्रूण हत्या हा विषय घेऊन लिहीणे सुरु केले होते, पण लिहित असतांना  लेखाच्या अनुषंगाने बरेच बरेच  विषय मनात जसे जसे येत गेले ते तसेच लिहत गेलो. मन चक्क भरकटू दिलं जसे हवे तसे पब्लिश तर करतोय, पण …. डिलिट करावा  का? हा विचार मनात ठेऊन..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in सामाजिक and tagged , , . Bookmark the permalink.

35 Responses to मुक्त विचार…

 1. साधना परांजपे says:

  तुमचे बोलणे खरे आहे की सावित्री बाईंचे कर्तुत्व ब्राह्मण स्त्रियांनी नाकारता कामा नये,त्याच बरोबर हे पण खरे आहे की इतरांनी पंडित रमाबाई, सावरकर, आनंदीबाई जोशी,महर्षी कर्वे यांचे कर्तुत्व नाकारू नये,या लोकांना स्त्रीमुक्ती म्हटले की फक्त सावित्रीबाईच काय त्या आठवतात, असे का? तुम्ही फक्त एका बाजूने म्हटलेत,दुसरी बाजू पण मांडायलाच हवी. सावरकरांचे अथक प्रयत्न (जात्युछेदनाचे) या इतर लोकांना का न दिसावेत? महर्षी कर्वे आणि शेकडो ब्राह्मणांनी केलेले कार्य या इतर लोकांच्या का नजरेत येत नाही?

  • साधना
   ब्लॉग वर स्वागत. विषय घेतला होता भ्रूण हत्या, पण त्या अनुषंगाने जे काही मनात येत गेले ते लिहीत गेलो. ’स्त्री मुक्ती वाद’ वगैरे पण अपेक्षित नव्हता लिहितांना. ’मुलीच्या’ जन्माला नाकारण्याची कारणं शोधतांना सावित्रीबाई नजरेसमोर आल्या. पंडीता रमाबाई पण त्याच काळातल्या. सावित्रीबाईंच्या सोबत पंडीता रमाबाईंनी पण बरेच काम केले. इथे ब्राह्मण- विरुद्ध इतर हा वाद अपेक्षित नव्हता. तो काळ, जेंव्हा ब्राह्मण स्त्रियांची विधवा झाल्यानंतरची सामाजिक अवहेलना होत होती, तेंव्हा सावित्री बाईस्वतः पुढे आल्या होत्या, आणि जर त्या नसत्या आल्या तर स्त्रियांना आलवणातून बाहेर पडायला अजून बरीच वर्ष लागली असती. म्हणून त्यांचे नाव आठवले.
   प्रतिक्रियेसाठी आभार.

  • darshana deshpande says:

   agadi barobar aahe.sadhana madamche.
   karan pratyek veli yana bramnachyach virodhat jave vatate ……….karana yana mahit asate ki aapan bramhanana kitihi bollo tari te aaplyavar palat var karnar nahit mhanun.
   karana aamhla yasathi velch nasto

   • सध्या काही कारणामुळे नेट वर नाही, त्यामुळे प्रतिक्रियेचे उत्तर देण्यास उशीर होतोय. प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.

 2. Piyu says:

  स्त्रीभ्रूण हत्‍या

  स्त्रीभ्रूण हत्‍या मुलगा व्‍हावा अशी इच्‍छा बाळगण्‍यामुळे मुलींची हेतूपुरस्‍सर करण्‍यात येणारी हत्‍या. असे प्रकार त्‍या भागांमध्‍ये होतात जेथे मुलीपेक्षा मुलाच्‍या जन्‍मास जास्त महत्त्व दिले जाते.

  स्त्रीभ्रूण हत्‍येविषयी सत्ये
  संयुक्त राष्ट्र बाल कोषाच्‍या (यूनिसेफ) एका अलिकडील अहवालाप्रमाणे वर्गीकरणात्‍मक लिंगभेदाचा परिणाम म्‍हणून भारतीय लोकसंख्‍येतून 50 लाख मुली व स्त्रिया कमी झाल्‍या आहेत.
  जगातील अनेक देशांमध्‍ये, दर 100 पुरुषांमागे सुमारे 105 मुली आहेत.
  भारतात दर 100 पुरुषांवर 93 पेक्षाही कमी मुली आहेत.
  संयुक्त राष्ट्रांच्‍या अंदाजाप्रमाणे भारतात दररोज 2000 बेकायदेशीर स्त्रीभ्रूण हत्‍या होतात.

  अदृष्‍य धोके
  भारतातील वाढत जाणा-या स्त्रीभ्रूण हत्‍येमुळे समाजात स्त्रियांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे लैंगिक हिंसा आणि बालशोषणाबरोबरच एकच पत्नी अनेकांमध्ये वाटून घेण्याची प्रथा सुरू होण्‍याबाबत अमेरिकेने धोक्याचा इशारा दिला आहे. ह्यामुळे सामाजिक मूल्यांचा –हास होईल आणि संकटपूर्ण परिस्थिति निर्माण येईल.

  कारणे
  तथापि, हा स्‍त्री-विरोधी पूर्वाग्रह आता फक्‍त गरीब कुटुंबांपर्यंतच सीमित नाही. बहुतेक भेदभाव सांस्कृतिक मान्यता आणि सामाजिक मानदंडांमुळे बळावतो. ह्या कुप्रथा बंद करण्‍यासाठी स्‍वत:लाच आव्‍हान द्यावे लागणार आहे.
  भारतातील स्‍त्री-नापसंतीच्‍या प्रथेसाठी सामाजिक-आर्थिक कारणांना जबाबदार ठरविले जाऊ शकते. भारतातील अध्ययनात भारतामधील स्‍त्री-नापसंतीचे तीन कारक संकेत मिळाले आहेत, ज्‍यामध्‍ये आर्थिक उपयोगिता, सामाजिक-सांस्‍कृतिक उपयोगिता आणि धार्मिक समारंभांचा समावेश आहे.

  आर्थिक उपयोगितेचा घटक म्‍हणून अध्‍ययनांनी दर्शविले आहे की मुलीपेक्षा मुलगा हा घरच्‍या शेतीची देखभाल, कुटुंबाचे भरण-पोषण, वृध्‍दापकाळी आई-वडिलांचा सांभाळ करतो.
  लग्‍न झाल्‍यावर, मुलगा कुटुंबाची संपत्ति म्‍हणून एक सून आणतो जी घरकामांत मदत करते आणि हुंड्याच्‍या स्‍वरूपात आर्थिक संपन्‍नतादेखील आणते, तर मुली लग्‍न झाल्‍यानंतर निघून जातात आणि हुंड्याच्‍या स्‍वरूपात एक आर्थिक दंड उकळतात.
  स्‍त्री-नापसंतीचा सामाजिक-आर्थिक घटक असा की, चीनप्रमाणेच, भारतातील कुटुंबांत पितृसत्ताक व्यवस्थेनुसार कौटुंबिक रेषेच्‍या निरंतरतेसाठी कमीत कमी एक पुत्र असणे आवश्‍यक आहे आणि पुत्र कुटुंबाची प्रतिष्‍ठा वाढवितात.
  स्‍त्री-नापसंतीचा अंतिम घटक म्‍हणजे काही धार्मिक कार्ये फक्‍त मुलेच करू शकतात, हिंदू संस्‍कृतिप्रमाणे, जो जनादेश पाळतो आणि त्‍यांच्‍या स्वर्गीय आई-वडिलांच्‍या चितेस अग्नि देऊन त्‍यांच्‍या आत्‍म्‍यास मोक्ष मिळवून देण्‍यात मदत करतात.

  सरकारतर्फे पुढाकाराची पाऊले

  ह्या सामाजिक कुप्रथेचा अंत करण्‍यासाठी, आणि समाजातील लोकांचा दृष्टिकोन बदलण्‍यासाठी सरकारने ह्या बाबत पुढाकार घेत पुष्‍कळ पावले उचलली आहेत. पुष्‍कळसे कायदे, अधिनियम आणि योजनांचा आरंभ करण्‍यात आला आहे, जसे:

  हुंडा विरोधी कायदे – हुंडा निषेध अधिनियम 1961
  लिंग परीक्षण विरोधी कायदे – PCPNDT अधिनियम
  कन्‍या शिक्षण प्रोत्साहन कायदे
  स्‍त्री अधिकार/हक्‍क अनुमोदन कायदे
  कन्‍येसाठी संपत्तीमध्‍ये समान अधिकार अनुमोदन कायदे

  (Source: http://www.indg.in/social-sector/social-awareness/stop-female-infanticide/93894d92494d93094092d94d930942923-93992494d200d92f93e/view?set_language=mr)

  • पियू
   बरीच माहिती दिलीस. भारता मधे एक कायदा पास झाला, की त्यातून बाहेर पडणयाच्या पंचविस पळवाटा तयार होतात, त्यामूळॆ कायद्याने काहीच केले जाऊ शकत नाही, मग तो कसाब सारखा अतीरेकी असला तरीही, किंवा राजीव गांधीचा मारेकरी असला तरीही.
   या साठी समाज जागृतीची जास्त गरज आहे. समाजात अवेअरनेस निर्माण झाला तरच हे शक्य होईल. धन्यवाद.

 3. SURAJ MOHITE says:

  सर मी तुमचा प्रत्येक वाचतो फार छान लिहिता तुम्ही . सर, योनीशूचिता म्हणजे काय ? मी सिरीअसली विचारतो आहे . मी गुगल वरही सर्च केले पण नाही योग्य उत्तर सापडलं.

  • सुरज
   आज भारतात ज्या पद्धतीने विवाह बाह्य संबंध ठेवणे चुकीचे समजले जाते , तशीच काहीशी परिस्थिती व्हिक्टोरिअन काळात होती , आणि विवाहापूर्वी सेक्सुअल संबंध न ठेवणे, शुचिर्भूत रहाणे, यासाठी योनिशूचिता हा शब्द वापरला जायचा.

 4. aruna says:

  you are right, social awareness is more important. कायदे अस्तित्वात असतातच, पण त्यांची कोणीही दखल घेत नाही, किंवा त्यांच्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले जाते.
  तुम्ही म्हणता त्याप्रमाणे समाज सुधारक नेतेत्या त्या जातवल्यांनी highjack करून ठेवले आहेत. जणूकाही त्या नेत्यांनी फक्त त्यांच्या जातीपुरत्याच सुधारणा केल्या!
  अनेक सामाजिक समस्यांबद्दल समाजाची दृष्टी बदलणे गरजेचे आहे.

  • अरुणा
   सावित्रीबाई फुलयांच चरित्र वाचतांना खरंच अंगावर काटा येतो . इतक्या कठीण परिस्थितीमधे पण त्यांनी आपले काम बंद केले नाही . अंगावर लोक विष्ठा, शेण फेकायचे…:( आणि इतर त्रास तर होताच..

 5. dattatray jadhav says:

  सावित्रिबाइनि आणि म. ज्योतीराव फुलेंनी त्या काळात केलेले कार्य किती महाकठीण होते याची आजच्या समाजाला कल्पना येणार नाही.आणि त्यांचे सुरु केलेले शिक्षण दानाचे कार्य आजही अर्धवटच आहे असे म्हणावे लागते. आजही बराच समाज शिक्षण ,ज्ञान या गोष्टीपासून खूप दूर आहे हे खेदाने मान्य करावे लागते.त्यांच्या नावावर चूल चालवणार्यांना आजही त्यांची आठवण फक्त त्यांच्या जयंतीलाच येते.

  • दत्तात्रेय,
   महापुरुषांच्या बाबतीतही त्यांचे गुणगान करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर ६३ वर्षानंतरही जात आडवी येते, याचे खरे वाईट वाटते. त्याकाळात सावित्रीबाईंनी आणि म.ज्योतिराव फुल्यांनी केलेल्या कामाची कदर आज केली जात नाही, कारण जात आडवी येते.
   स्वातंत्र्यानंतर आपण हेच मिळवलं का?

 6. suhas adhav says:

  sagla agdi khara aahe …. samajat aaplyala vata ki sushikshit jhalyane he praman kami hoel
  pan nehmich hot nahi na aasa ….garaj aahe ti vicharik krantichi…ani vicharat parivartan he manapasun hava 🙂
  kon mhanta muli aaplya aai-babancha aadhar hoshakat nahit …shevti ek diwas tila loka kade javach lagta….
  bara hach jar muda aasel tar tyavar ek solution pan aahe ki…
  if we expect that our wife should take care of our parents and keep them always happy
  then its our moral duty to treat her parents similarly….both side should be treated equally 🙂
  mag ha muda rahtoch kuthe ki aaushyacha shevti pahnar kon aaplyala….
  Je tiche aai-vadil te tumche pan aai-vadil ….
  hi samaj jar pratek purushat aasel tar ha prashna mitlach na ki mulgi aaplya aushacha aadhar hou shakte ka nahi??
  even if we follow this much ,स्त्री भ्रूण हत्या cha complete nahi pan thoda taripraman kami hoel
  aashi kitek udahar na aahet jevha mulane sath nahi dili pan shevti mulgich sambhalat aahe aai-babana
  needan aasha udahrnatun tari sudhrayla hava sankuchit vichar-sarni chya lokani 🙂

  • सुहास
   अगदी खरं आहे. पण हल्ली मुलांनी आपलं करावं असं कुठल्याही आईवडीलांना वाटत नाही. कारण स्वतःच्या नोकरीच्या काळातच ते स्वतःची म्हातारपणची व्यवस्था करून ठेवतात. फायनान्शिअली स्टेबल असल्याने फक्त आजारपणात मानसिक सपोर्ट त्यांना हवा असतो. शेवटी मुलगा काय किंवा मुलगी काय, लग्नानतर कशा वागतील ते कोणीच सांगू शकत नाही.

 7. योनिलिंग ह्या शब्दातील पहिले आणि चौथे अक्षर घेऊन एकत्र केले असता योग दिसतो. आणि ख्रिस्ती बांधव येशूच्या प्रतिमेसमोर निलिंग करून म्हणजे गुडघे टेकून प्रणाम करतात ह्यात काही संबंध वाटतो का…
  प्रश्न वैचारिक आहे… उत्तराच्या अपेक्षेविना…

  • aruna says:

   माझ्या माहितीप्रमाणे ख्रिस्ती बांधव गुडघे टेकून बसतात तेव्हा ताठ बसतात. वाकत किंवा झुकून बसत नाहीत, की वज्रासनातही बसत नाहीत. यामधे आदर दाखवणे व समर्पणाचा भाव आहेच, पण मला वाटते, एक प्रकारचे nonagression दाखवण्याचा प्रयत्न आहे. ही प्रथा सुरू झाली ते दिवस कोणावरही विश्वास ठेवण्यचे नव्हते.

  • rajeev says:

   छान.. पण हा शःब्दच्छल आहे..

 8. anuvina says:

  मस्तच झालाय लेख नेहेमी प्रमाणे…. तुमच्या दृष्टीने विषयांतर झाले असले तरी तुमच्या प्रभुत्वामुळे तसे वाटत नाही. जातीयवाद वगैरे म्हणाल तर तो राजकारण्यांमुळेच टिकून आहे. आज आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथे जाती पेक्षा शाकाहारी का मांसाहारी किंवा घेणारा की न घेणारा हेच प्रश्न जास्त असतात. आत्ता कुठल्याही गोष्टीला (अनुकरणाला) आधुनिक म्हटले जाते पण टिळक, फुले, कर्वे सावरकर, आंबेडकर या सारख्या प्रभृतींच्या काळात त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन कसें काय कार्य केले असेल ते केवळ इतिहासच जाणे. एका बाजूला जातीयवाद, गरिबी, इंग्रज, अशिक्षितता आणि साथीचे रोग (जुन्या चित्रपटात पाहिले आहे प्लेग ने गावे च्या गावे निर्मनुष्य व्हायची) या सर्व गोष्टींतून समाज प्रबोधनाची वाट म्हणजे पायाखाली निखारे आणि मानेवर तलवार अशीच असणार.
  आपल्याला हे सगळे आयते मिळाले आहे म्हणून किंमत नाही याचेच दुःख वाटते.
  अवांतर: मला देखील एक गोड मुलगी (सध्या वय वर्षे ८) आहे. तिच्या जन्मापासून तिच्या संदर्भातील सगळी कामे मी आवडीने करायचो आणि आज देखील करतो (अभ्यास घेणे सोडून 😉 ). तान्ह्या आर्याला फडक्यात घट्ट बांधणे हे तर आवडीचे काम. आजही ती जेंव्हा म्हणते आई तू नको बाबा करून दे तेंव्हा काय वाटतं ते शब्दात सांगता येणार नाही.

  • धन्यवाद,
   या वेळी लेख लिहितांना अगदी जे काही मनात येईल ते ज्या सिक्वेन्सने सुचेल त्या सिक्वेन्स मधे लिहीत सूटलो. एकदा विचार आला होता, की जर कोणी काही म्हणालं, तर सरळ डीलिट करून टाकु. पण ओव्हरऑल रिस्पॉन्स बरा आहे, म्हणून ठेवतोय लेख.
   >>>आज आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथे जाती पेक्षा शाकाहारी का मांसाहारी किंवा घेणारा की न घेणारा हेच प्रश्न जास्त असतात>> अगदी बरोबर..

 9. . says:

  मुक्त विचार अनेकांना मुक्त करणारे आहेत. काहीच न करता राहण्यापेक्षा बोलूनही परिस्थितीमध्ये फरक आणण्याची सध्या वेळ आहे.

  मुक्तपणे पोस्ट पोस्टायला माझ्या शुभेच्छा.

  • धन्यवाद..
   इतर काही करणं जरी आपल्या हाती नसलं, तरी आपले विचार स्पष्टपणे माडणॆ तरी शक्य आहे.

 10. Manish says:

  महेंद्र नमस्कार,
  मी बऱ्याच दिवसांनी तुम्हाला उत्तर देतोय. samajat असेही मानस आहेत कि ज्यांना आजच्या स्त्रीभ्रूण हत्येचा काळात मुलगी हवी आहे. parantu काही गोष्टीमुळे ते शक्य होत नाही. त्यांचा कोणीच विचार करीत नाही.
  Manish

  • मनिष
   असे लोकं असतात, पण फार कमी. एक मुलगा झाल्यावर मुलगी हवी असे म्हणतात, पण पहिली मुलगी कोणालाच नको असते, याचं कारण तेच.. वर लेखात दिलेले. 😦

 11. gouri0512 says:

  सावित्रीबाईंनी, जोतिबा फुल्यांनी केलेलं काम असो, आगरकरांचं, वा महर्षी कर्व्यांचं … मला वाटत नाही त्यांनी ‘ब्राह्मण स्त्रियांसाठी / ब्राह्मणेतरांसाठी असा विचार करून ते केलं असेल. दुर्दैवाने त्यांच्या अनुयायांनी त्यांना एकेका जातीत बांधून टाकलंय. आपण या सगळ्यांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो म्हणून किती भाग्यवान आहोत, हे महाराष्ट्राबाहेर पडलं की जाणवतं!
  आईने लहान गावात स्त्रीरोगतज्ञ म्हणून अनेक वर्षं काम केलंय – त्यामुळे ‘वंशाचा दिवा’ मिळण्यासाठी लोक काय काय करतात याच्या आणि स्त्रियांच्या छळाच्या अंगावर काटा आणणार्‍या सत्यकथा तिच्याकडून ऐकायला मिळाल्यात. 😦

  • गौरी,
   सावित्रीबाईंनी जेंव्हा ब्राह्मण स्त्रियांचे आणि त्यांच्या अनौरस संततीचे होणारे हाल पाहिले, तेंव्हाच हे कार्य सुरु केले. अर्थात, सुरुवाती जरी या मुळे झाली असली, तरीही इतरही जातीचे लोकं याचा लाभ घेण्यास तयार नव्हते असा उल्लेख आढळतो.

 12. laxman putra says:

  आंतरजालात आल्यावर तुमच्या ब्लॉगवर आवर्जून येतो. प्रत्येक लेख वाचनीय असतो. मुक्तविचार भरकटलेले नसून थोडे विस्कटलेले आहेत. म्हणूनच एखाद्या सुंदर व्यक्तिमत्वाला जसे विस्कटलेले केस शोभून दिसतात तसे हे शब्द लेखातील विचारांना शोभिवंत करतात.

 13. मस्त लेख महेंद्रकाका !
  हा प्रश्न मनोवृत्तीचा आहे,जो पर्यंत विचार बदलत नाहीत तोपर्यंत माणूस बदलत नाही आणि हा आपला इतिहासच आहे. माणसाने हा प्रश्न माणसापुरताच मर्यादित नाही ठेवला. गावाकडे हा प्रश्न आणखी बिकट आहे घरात मुलगी झालेली नको असते का तर वंशाचा दिवा मुलगाच हवा,
  खोपट्यात बकरीला पाठ (शेळी) झालेली नको असते बोकड झाला असता तर बर झालं असतं कारण ४-५ महिन्यात मोठं झालं कि विकून ४-४५००
  हजार तरी येतील, गोठ्यात झालेलं वासरू गाय नको बैल हवा कारण बैलजोडी चा रेट सध्या २-३ लाख चालूये.

  • मालोजीराव
   धन्यवाद.. विषयाची व्याप्ती फार मोठी आहे, यावर अजूनही बरंच लिहिलं जाऊ शकतं. 🙂

 14. Bhakti says:

  नमस्कार काका,
  मुलगा व्हावा ही इच्छा आणि त्या साठी कोणत्याही थराला जाण हे फक्त भारतात आहे असं नाही. माझी delivery ज्या रूम मध्ये झाली तिथेच स्वतःच्या बाईकोला admit करायला जीवाचा आटापिटा आणि त्या करिता भांडण करणारा एक महाभाग अमेरिकन ज्यू मी बघितलाय. आणि कारण काय तर मला मुलगा झाला म्हणजे ती रूम lucky . असे एक न अनेक अनुभव बघीतल्येत. अक्खी गोष्ट लिहू शकेन.
  भक्ती

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s