छंद, विरंगुळा की व्यसन?

 दुःख, थकवा, मानसिक त्रास या सगळ्या गोष्टी  आपल्या आयुष्यात असतातच.  भांडणं, कामाचं टेन्शन, पिंक स्लिप्स, हजारो गोष्टी असतात की ज्या मधे आपण कायम गुंतलेले असतो. कधी कधी असं वाटतं की ज्या प्रमाणे पैसे साठवता येतात तसेच जर सुटीचे दिवस , आनंदाचे क्षण साठवून ठेवता आले असते तर? शनिवार-रविवार तर कसा संपतो ते कळत पण नाही. शिंप्याकडे जाऊन कपडे आणणे, बॅंकाची कामं ,  घरातली कामं, भाजी, वगैरे  कामात अर्धा दिवस तर बुक होतो, मग उरलेला अर्धा दिवस  कसा संपून जातो ते समजत पण नाही. या सुटीच्या दिवसात थोडा वेळ तरी स्वतः साठी अंतर्मुख होण्यासाठी मिळावा असे वाटत असते- थोडा वेळ केवळ स्वतः साठी!

एखादा विकेंड  असा निघतो की ओंजळीतून जसे पाणी गळून जाते तसा संपून जातो. या जगात देवाने मानवाला जन्माला घातलंय ते सूड घेण्यासाठीच हे माझे स्पष्ट मत आहे. दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी घरी आल्यावर तरी पूर्वी ऑफिसच्या कामाचा काही त्रास नसायच, कारण तेंव्हा फक्त लॅंड लाइन फोन असायचा. कोणाचाही फोन आला, तरी घरी नाहीत, बाहेर फिरायला गेले आहेत , असे खोटे सांगता यायचे .  पण सेल फोन, इंटरनेट, ब्लॅक बेरी ने तर आपल्याला ’बॉंडेड लेबर” पेक्षा पण खालच्या पातळीवर आणून सोडलंय. घरी आल्यावर बायको मुलांसोबत जेवायला बसा, तेवढयात एखाद्या कस्टमरचा , बॉस चा फोन येतो आणि हातातला घास खाली ठेऊन आधी फोन घ्यावा लागतो. यावर एक उपाय केलाय , हल्ली मी सरळ फोन सायलेंट करून ठेवतो जेवताना 🙂 पण ते समाधान फक्त दहा मिनिटांपुरती असतं नाही का? तुम्हाला कामाच्या गराड्यातून एक क्षणही न मिळू देण्याची काळजी हे गॅजेट्स घेतात.

असे म्हणतात, की कामाचे विचार जर डॊक्यातून काढून टाकायचे असतील तर एखादा छंद हा आवश्यक आहे.  दररोजच्या कामातून वेळ काढून जर तु्म्हाला  एखादी  आवडीची गोष्ट केली तर  आयुष्य   कंटाळवाणे होत नाही.   छंद म्हणजे स्वतःच्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत घेतलेला इंटरेस्ट. जसे जर मी मेकॅनिकल इंजिनिअर असेन, आणि जर ब्लॉगिंग , लेखन या मधे इंटरेस्ट घेत असेन तर लेखन किंवा ब्लॉगिंग हा माझा छंद आहे. या छंदातून पैसे मिळवणे, वगैरे उद्देश नसतो, त्यामुळे इथे जे काही करतो ते केवळ स्वतःच्या मानसिक शांती करता. जेंव्हा मी ब्लॉग वर लिहितो तेंव्हा माझ्या मनात कामाविषयी एकही विचार नसतो.

कामात कंटाळा आला म्हणून तुमच्या ऑफिसमधले किती लोकं चहा प्यायला,  सिगरेट ओढायला, गुटखा खायला बाहेर पडतात?  तंबाखू, सिगरेट, गुटखा वगैरे गोष्टी एक विरंगुळा म्हणून सुरु होतात, आणि लवकरच अशी वेळ येते की त्या शिवाय अजिबात करमत नाही.विरंगुळ्याचे सवयीत रुपांतर होते . सवय कधी व्यसनाधीनतेमध्ये बदलले जाते हेच लक्षात येत नाही.  अर्थात इंटरनेट हे व्यसन काही सिगरेट, तम्बाखु, दारू इतके वाईट नाही. २० एक वर्षापूर्वी मी दिवसाला चार पाच पाकिटं सिगारेट ओढायचो, ते पण एक दिवस   बंद करुन टाकले. मला स्वतःलाच मी  व्यसनाधीन झालेले आवडत नाही.

कुठलाही छंद नसलेल्या माणसाचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन संकुचित होऊन जातो. रात्रंदिवस काम  आणि केवळ कामाचाच   विचार केल्याने आयुष्य  घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे  होते. अर्थात या मुळे कामाची प्रत वाढते असे नाही, तर विचारात एकसुरीपणा  आल्याने जीवनात फक्त कंटाळा शिल्लक रहातो. या कंटाळ्याला घालवण्यासाठी आणि जीवनातला आनंद पुन्हा शोधण्यासाठी  छंद हे सगळ्यात उत्कृष्ट साधन आहे. टिव्ही वर क्रिकेटची मॅच पहाणे, सिरियल पहाणे, वाचन करणे,मुलांबरोबर खेळणे, बायकोला स्वयंपाक घरात जाऊन मदत करणे, अशा अनेक गोष्टी विरंगुळा म्हणून केल्या जाऊ शकतात.

मानव म्हणजे एक सामाजिक प्राणी. समाजात रहायला त्याला आवडतं. एखादी लहानशी गोष्ट जरी केली तरी ती इतरांना दाखवावी, तिचं  लोकांनी कौतूक करावे अशी अपेक्षा असतेच. स्त्रियांच्या बाबतीत तर  मग ती एखादी लहानशी कलाकृती ,स्त्रियांच्या बाबतीत एम्ब्रॉयडरी, नवीन डिश, पुस्तक विकत घेणे, नवीन वस्तू घेणे  पण असू शकते. घरात, बायको नेहेमीच  स्वयंपाक करत असते. जेवायला बसल्यावर बरेचदा तर घरातली माणसं  छान झालंय बरं का, हे पण सांगायचेच पण कष्ट घेत नाहीत, पण  त्याच डिशचे फोटो जेंव्हा एखादी मुलगी फेसबुक वर टाकते तेंव्हा त्याला ’शेकडॊ लाइक” आणि ’कॉमेंट्स” मिळतात,आणि ती साहाजिकच फेसबुक शी जास्त जोडल्या जाते, तिला वाटायला लागतं, की नवऱ्यापेक्षा /घरच्या लोकांपेक्षा हे बाहेरचे लोकं जास्त बरे!. हे फेसबुक वरचे पोस्ट म्हणजे  मानसिक समाधान मिळवण्याचे केविलवाणे प्रयत्न.

रोजच्या कामाच्या व्यापात सोशल लाइफ तर एकदम नगण्य झालं आहे. एकदा घरी आल्यावर तुम्ही  शेजाऱ्या कडे जाऊन बसून गप्पा मारण्याचे दिवस संपले, कारण जरी तुम्ही त्याच्या घरी गेलात तरी तुमचे स्वागत होईलच याची खात्री नसते. मग विरंगुळा कुठला? तर टीव्ही! घरी आल्यावर टिव्ही समोर बसायचे आणि बायकोला आवडणारे कार्यक्रम पाहून झोपायला जायचे, हाच जीवन क्रम बहुसंख्य लोकांचा असतो. मी स्वतः टिव्ही पहायला आवडत नाही म्हणून फेसबुक वर जातो असे कारण स्वतःला सांगून मनाची समजूत काढायचो.

सोशल लाइफची  ही तहान भागवण्यासाठी   ट्विटर, फेसबुक, वापरतात, आणि आपली ही मानसिक गरज पूर्ण करून घेतात.जर तुमचा फेस बुकचा वापर लिमिटेड असेल तर फेस बुक सारखे सोशल लाइफ साठी साधन नाही. पण जर त्यातच तुम्ही गुंतून पडलात तर …………………?

फेसबुक वर मी पण गेले बरेच दिवस होतो.विरंगुळा म्हणून , छंद म्हणून सुरु झालेले फेसबुक कधी व्यसनात बदलले गेले हेच समजले नाही.एक स्टेटस पोस्ट केले, की पुन्हा उद्या काय पोस्ट करायचं याची मनातल्या मनात तयारी करणे सुरु व्हायचे.तिन दिवसापूर्वी लक्षात आलं, की आपण फारच जास्त आहारी जातोय ह्या फेस बुक च्या- दिवसाचे चोविस तास फेसबुक वरच्या व्हर्च्युअल आयुष्यात गुंतून रहातोय. अर्थात फेसबुक वरच्या व्हर्च्युअल आयुष्यातही काही खरे मित्र आहेतच, पण त्यांच्याशी मैत्री ही फेसबुक नाही म्हणून तुटणार नाही याची खात्री आहे.  मित्रांशी गप्पा मारणे, पोस्ट्स पहाणे या मधे तास अन तास निघून जायचे. रात्री उशाशी चार्जिंगला लावलेला मोबाईल  डोक्याशीच असायचा, त्यामुळे एखादा अपडेट आला की ताबडतोब ब्लॅक बेरी वर दिसायचं, आणि आपसूकच हात मोबाइल कडे जायचा.फेसबुक इतकं जास्त जिवनाचं अंग झालं होतं की, रात्री दोन वाजता पाणी प्यायला जरी उठलो, तरीही आधी फोन वर   कोणाचे अपडेट्स आहेत का हे चेक करायचो. सकाळी उठल्यावर देवाला हात जोडण्यापूर्वी आधी फेसबुक अशी परिस्थिती झाली होती. ह्या सगळ्या प्रकारामुळे घरच्या लोकांशी संवाद पण कमीच झाला होता.

सिनेमाला  , ड्राइव्ह करतांना,समुद्रावर , ट्रेन मधे, ऑफिस मधे , कुठेही जरी असलो तरी फेसबुकवर जाऊन काही तरी करण्याचा चाळा सुरु असायचा.एकदा  डॉक्टर कडे मुलींना घेऊन गेलो असता, डॉक्टर काही तरी सांगत होते, तेवढ्यात सेल फोन वर फेसबुक इंडीकेशन दिसले,  आणि मी हातातल्या मोबाईलवर फेसबुक  उघडले. सौ. ने कोपराने धक्का दिला, तेंव्हा वास्तवाची जाणीव झाली आणि भानावर आलो. अगदी हाच क्षण होता, की फेसबुकचे व्यसन लागले आहे हे लक्षात आले.

फेसबुक मोबाईल वर पण असल्याने  २४तास ७ दिवस फेसबुक वर असायचो. माझ्या जीवनातली प्रत्येक घटना फेसबुक वर टाकली जायची. टूर ला गेलो, कुठे जेवायला गेलो, की टाक स्टेटस.. मग कोणी लाइक केलं का ? ते पहा. कोणी कॉमेंट केली का? तिकडे लक्षं.  एखाद्या हॉटेल मधे छान डीश मिळाली, की सेल फोन ने फोटो काढून करा पोस्ट फेसबुक वर.. फेसबुक शिवाय जीवन नीरस झाल्यासारखे वाटायचे. माझ्या प्रत्येक कृतीला कोणी तरी आवडलं, छान वाटलं अशी पावती दिल्याशिवाय माझं वागणं , योग्य आहे हे मला पटायचं नाही. माझे आयुष्य, माझी कृती, माझे वागणे हे योग्य आहे हे फेसबुक वर अधोरेखित होणे गरजेचे वाटत होते.

फेसबुक वरच्या काही व्यक्ती खरंच खूप विचार करायला लावतात. एका मैत्रिणीने फेसबुक वर एका डायरेक्टरच्या मृत्युची पोस्ट टाकली होती, आणि त्याला५३ लोकांनी लाइक केलेले दिसले. एका पत्रकाराला मारहाण झाल्याची पोस्ट पण इतर २८ पत्रकारांनी लाइक केलेली दिसली. एखादा विनोद सांगितला, तर त्यावर विनोद न समजता सिरियसली घेऊन कॉमेंट करणारे ,तसेच स्वतःच्या हनिमुनला गेल्यावर एकमेकांसोबत दिवस घालवण्यापेक्षा फेसबुक वर स्टेटस अपडेट्स, फोटो पोस्ट करणारे पण लोकं इथेच भेटले ,  आणि जाणवलं, की  हे जग वेगळं आहे, किती दिवस या जगात रमायचं?    सरळ फेसबुक अकाउंट डिअ‍ॅक्टीव्हेट केला- नेहेमी साठी नाही, पण काही दिवसासाठी . पुन्हा काही महिन्यानंतर वाटलं, तर पुन्हा फेसबुक सुरु करीन, पण तूर्तास तरी दूरच बरा असे वाटते.

आचार्य रजनिशांनी व्यसनाची केलेली व्याख्या खूप सुंदर आहे, ते म्हणतात, ” ज्या गोष्टी शिवाय तुमचे रहाणे सहज शक्य व्हायला हवे, पण ते होत नसेल , तर तुम्हाला त्या गोष्टीचे व्यसन आहे असे समजा.  आता या वाक्यावरून अजूनही दोन पानं लिहिली जाऊ शकतात, पण मी आता थांबवतो इथेच.

याच विषयावर एक पोस्ट फार पूर्वी लिहिले होतेइंटरनेटचे गुलाम नावाचे पोस्ट होते ते.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कम्प्युटर रिलेटेड and tagged , , , . Bookmark the permalink.

53 Responses to छंद, विरंगुळा की व्यसन?

 1. SnehaL says:

  कधी कधी असं वाटतं की ज्या प्रमाणे पैसे साठवता येतात तसेच जर सुटीचे दिवस , आनंदाचे क्षण साठवून ठेवता आले असते तर?

  खरच अस करता आले असते तर ???? 😦 😦

 2. shashank md says:

  Really FB is modern avtar of addiction.
  Thanks for very informative content.

  • शशांक
   प्रलोभनं तर खूप असतात, फक्त त्या पैकी किती प्रलोभनांच्या जाळ्यात आपण अडकायचं ते आपल्या हाती असते. :)धन्यवाद.

 3. Tanvi says:

  >>>अर्थात फेसबुक वरच्या व्हर्च्युअल आयुष्यातही काही खरे मित्र आहेतच, पण त्यांच्याशी मैत्री ही फेसबुक नाही म्हणून तुटणार नाही याची खात्री आहे. …. अगदी अगदी !!
  पुर्ण पोस्टही पुर्णत: सहमत !!
  माझ्याही फ्रेंडलिस्टमधली काही डोकी अगदी नको वाटत असली तरी उगा वाईटपणा नको म्हणुन ठेवलेली आहेत… अश्या वेळी तर सगळं फोल वाटतं मग… मध्यंतरात फेबूवर झालेला गदारोळ तर अतिशय वाईट अनूभव होता!!
  अर्थात त्यापलीकडेही तुम्ही म्हणता तसं या सोशल साईटसनेच अनेक जीवाभावाचे मित्र मैत्रीणीही दिल्या आहेत,त्यांच्यासाठीच किंवा त्यांच्यामूळेच अकाउंट ’चालतेय ’ .
  बाकि या व्यसनाबद्दल ,
  आमच्याकडे मोबाईलवरून कोणिही नेट ऍक्सेस करत नाही… एक अलिखित नियम आहे जसा !! अमितने तर कधीचेच फेसबुक अकाउंट डिलीटलेय त्यामूळे तसं बंधन आहेच माझ्याही फेबू वापरावर !! त्याच्या ब्लॅकबेरीचा तो वापर करत नाही असा लोकांनी केलेला आरोप तो कोणी कौतूक केल्यासारखा मिरवतो 🙂 .. त्याच्याच शब्दात सांगायचं तर ’मी जाळ्यात (नेट) अडकायला तयार नाही 🙂 ’
  माझं स्वत:च एक मत की जोवर आपण काही पोस्ट करत नाही तोवर हे व्यसन आटोक्यात ठेवणं अधिक सोप्पं… अर्थात हे माझं मत आहे (मी स्वत: बऱ्यापैकी पोस्ट्स टाकत असले तरी 🙂 ) .

  बाकि तुम्ही सध्या दुर आहात फेबूपासून, हरकत नाही… आपलं गप्पिष्ट मंडळ असे फेबूवर वगैरे अवलंबून नाहीचे तसेही….त्यामूळे निर्णयाचे स्वागत 🙂

 4. gouri0512 says:

  या संपूर्ण पोस्टशी सहमत!
  मोबाईलवरून फेसबुक ऍक्सेस करायचं नाही असा माझाही नियम आहे. आणि आठवड्याचा कोटाही ठरवून ठेवलाय जास्तीत जास्त किती वेळ तिथे घालवायचं याचा. बाकी तन्वी म्हणते तसं गप्पा मारायला फेबुच हवं असं काही नाही!

  • गौरी
   एक्झॅक्टली याच गोष्टीची आवश्यकता आहे . सेल्फ कंट्रोल करता यायला हवा, मोबाईल वर इंटरनेट असतेच, तेंव्हा फेसबुक बंद करणे थोडे जड जाते, सारखं असं वाटतं की प्रोव्हिजन आहे, तर का वापरू नये?.

 5. Ashvini says:

  आज काल प्रवास आणि ऑफिस इतका वेळखाऊ प्रकार आहे.. नातेवाईक आणि इतर कशासाठी वेळ म्हणजे अगदी कर्मकठीण झालाय…
  फेसबुक हा आप्तेष्टांना भेटायचा एक छान कट्टा वाटतो मला…जगभर पसरलेल्या भाऊ बहिणी च्या आयुष्यात काय चाललाय ते चटकन कळत..
  अर्थात कुठल्याही गोष्टींचा अतिरेक वाईटच … पण आमचे आई बाबा फेसबुक दिसलं कि आरडा ओरडी ला सुरुवात करतात…
  तसाही जाणवलं कि वाचन कमी होतंय सो ब्लॉग्स आणि इ-बुक धुंडाळायला सुरु केले….तरीही आरडा ओरडा कायम आहे…:) 🙂 🙂
  घरातल्या माणसांशी बोलायचं सोडून काय किटी किटी करतेस असले डायलॉग कानी पडतात ….:)

  • अश्विनी,
   ब्लॉग वर स्वागत.
   फेसबुक वाईट आहे असे मला म्हणायचे नाही, केवळ त्याचे व्यसनात रुपांतर होऊ नये एवढेच. बरेचदा आपल्याला व्यसन लागले आहे हेच लक्षात येत नाही, पण एकदा समजल्यावर त्यापासून मुक्ती मिळवणयचा प्रयत्न करायलाच हवा ना?

 6. मला सध्या WassAppचे व्यसन लागले आहे म्हणायला हरकत नाही कारण हल्ली वेळ मिळेल तसा चॅटिंग करीत असतो. तुम्ही म्हणालात तसे मध्यरात्री, पहाटे पॉपअप दिसला की चॅट सुरू आणि मग बोलणे कधी वाढत जाते कळत देखील नाही.

  • सिद्धार्थ
   कुठलेही व्यसन वाईटच.. सध्या एकटाच आहेस तो पर्यंत ठिक आहे, नंतर मात्र कंट्रोल करावे लागेल.

 7. ओंकार says:

  अगदी सहमत
  मित्रांबरोबर फिरत असताना मधेच अनेक लोक फे बु वर स्टेटस टाकत बसतात त्यांची कीव येते . प्रत्यक्ष आनंद अनुभवण्यापेक्षा आभासी जगाकडे लोक का पळतात हे समजत नाही . लोकांना कोणती गोष्ट फे बु वर टाकावी/ कोणत्या गोष्टीला लाईक करावे हेसुद्धा कळत नाही असे माझे मत आहे .
  फे बु म्हणजे कूलनेस . मोठी फ्रेंड लिस्ट , भरपूर स्टेटस , हॉटेल मधले फोटो , भटकंतीचे फोटो या गोष्टी जितक्या जास्त तितके तुम्ही जास्त कूल असा १ प्रवाह लोकांमध्ये दिसून येतो .
  हॉटेल मध्ये गेल्यावर सगळे पदार्थ येईपर्यंत मला कडकडून भूक लागलेली असते आणि जेवणावर ताव मारण्याऐवजी फे बु किडे त्याचे विविध बाजूनी ,विविध settings वापरून फोटो काढत बसतात (कधी कधी वाटतं की त्यांनाच खावं पण मी शाकाहारी असल्याने वाचतात माझ्या हातून 😀 )

  १ का मित्राचे स्टेटस होते :
  घोंघावणारा वारा ,
  निरभ्र आकाश ,
  चंद्राचा शीतल प्रकाश
  रात्री १२ वाजता राजगड ची मजा काही औरच

  आता ही व्यक्ती खरच निसर्गाचा आस्वाद घेत आहे का फे बु वर स्टेटस टाकून तिकडे डोळे लावून बसली आहे 😛
  हे कळायला काही मार्ग नाही .

  • ओंकार
   अगदी बरोबर निरिक्षण आहे. मी जेंव्हा खाण्य़ाचे फोटो काढतो जेंव्हा आधी ठरवले असते की यावर लिहायचे आहे,
   असं म्हणतात, की साईट सिईंगला जातांना कॅमेरा बरोबर नेऊ नका, नाही तर तुम्ही सारखे त्यातच गुंतून बसाल. 🙂

 8. Abhay Mudholkar says:

  तुम्ही लिहिलेला लेख खूप छान आहे. खरं तर FACEBOOK सारख्या खोट्या गोष्टींची गरज का भासते हे मला अजून तरी कळलेले नाही. मी अजूनही FACEBOOK वर register झालेलो नाही. कारण अशा गोष्टींच्या आहाराला आपण कधी बळी पडतो हे आपल्याला सुद्धा काळात नाही. दुसरे असे कि मला जितके मित्र आणि नातेवाईक आहेत ते जर मी नीट सांभाळू शकलो तर FACEBOOK मधील भासमान (virtual) मित्रांची गरज पडत नाही. असो. तुमच लेख वाचून जर बर्याच वाचकांचे FACEBOOK वरील जाने कमी झाले तर तुमच्या लेखच हा खूप मोठा फायदा आहे असेच समजावे लागेल. असो
  नेहेमी प्रमाणे लेख आवडला.

  • अभय,
   तुमच्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे एकटेपणा. आजकालच्या जगात कोणालाच दुसऱ्यासाठी वेळ नसतो. प्रत्येक जण आपापल्याच कोषात गुंतलेला असतो, आणि हेच कारण आहे, की कोणीतरी ऐकतंय ना आपलं?? मग ठिक आहे, चला फेसबुक वर अशी मनोवृत्ती तयार होते.
   >>>दुसरे असे कि मला जितके मित्र आणि नातेवाईक आहेत ते जर मी नीट सांभाळू शकलो तर FACEBOOK मधील भासमान (virtual) मित्रांची गरज पडत नाही.>>> हे तर अगदी खरं..

 9. Sarika Khot says:

  100% sahamat… facebook he addiction aahe…. tyatlya tyat me svatahala chatting pasun dur theval …. tarihi ratri kitihi vajta jag aali tari mobile var facebook updates check karayche… he praman etak vadhal ki mala ek divas vicharnyat aal ‘ koni mitra vagaire bhetlay ka?’… tevha lakshat aal ki aapan hyat pramanabaher guntlo aahot…. mag kami kela praman…. niyam ghalun ghetle… cell var ajibatch check karaych nahi….. ata in ‘control’ aahe….. account ajun band kela nahi…….

  • सारिका
   प्रत्येकाने स्वतःला किती गुंतवून घ्चायाय्चं याचा सुवर्णमध्य ठरवायचा .बंद करणे हा उपाय नाही, पण दररोजचा ठरावीक वेळच त्याला दिला तर बरे…

 10. ni3more says:

  ek dum sunder post ahe kaka tumchi hi

 11. anuvina says:

  कुलकर्णी साहेब मी देखील तुमच्या सारखाच व्यसनाधीन (पार फुकट गेलेला) झालो होतो. मोबाईल वरून विशेष सक्रीय नसलो तरी पीसी वरून असायचो. मित्रांची संख्या फुगत फुगत ५००च्या घरात गेली. एकेदिवशी करीरोड स्टेशन वर एक तरुण भेटला … भेटला म्हणजे त्याने गाठलाच मला. तो XYZ माझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये होता आणि एक दोन वेळा माझ्याबरोबर ऑनलाईन गप्पा पण मारल्या होत्या म्हणे. म्हणाला मी डोंबिवलीला येत असतो नेहेमी भेटू आपण या शनिवारी. मनात म्हटलं चायला कोण कुठला आणि भेटून काय करणार? मला अशी ओढून ताणून मैत्री करता येत नाही आणि अश्या गळेपडू व्यक्तींबरोबर तर नाहीच नाही. डोळे लख्ख उघडले. घरी जाऊन ५०० ची लिस्ट २०० वर आणली. आता फक्त शाळू सोबत असलेल्या मित्रांबरोबरच फेबू. 😉
  बाकी कुटुंबाबरोबर असताना मोबाईल “स्वीच ऑफ” ……. त्यामुळे प्रश्नच नाही. कारण ज्या व्यक्ती कायम फोनकरून त्रास देत असतात त्याच समक्ष असल्यावर काय गरज फोनची?
  अरे हो ….. बाकी लेख मात्र फक्कड बरे …. तुमची कैफियत त्या झुकरबर्ग पर्यंत पोचवण्यासाठी हा लेख टाका फेसबुक वर आणि दर १० मिनिटांनी बघा किती लाईक मिळतात ते आणि किती कमेंट येतात ते. 😉

  • अनुविना

   >>>बाकी कुटुंबाबरोबर असताना मोबाईल “स्वीच ऑफ” ……. त्यामुळे प्रश्नच नाही. कारण ज्या व्यक्ती कायम फोनकरून त्रास देत असतात त्याच समक्ष असल्यावर काय गरज फोनची?>>>>>
   हसून हसून पुरेवाट झाली ..
   सध्या फेसबुक वर नसल्याने लिंक शेअर केलेली नाही. एखादा वाचक शेअर करेल तरच फेसबुक वर जाईल लिंक.:)

  • वैभव
   खरंच खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा.. उत्तर स्वतःच शोधायचं आणि प्रत्येकाचे उत्तर हे वेगवेगळे असेल हे पण खरं.
   . प्रत्यक्ष आनंद अनुभवण्यापेक्षा आभासी जगाकडे लोक का पळतात हे समजत नाही .. मला पण ..

 12. pallavi says:

  काका. एकदम महत्वाचा मुद्दा मांडलात आज. खरे तर आज बदलत्या जीवनशैलीसोबत हे खरे-खोटे जग आणि खरे-खोटे आपण यातली रेषा इतकी पुसट होत चालली आहे की आपण या virtual जगालाच खरे मानत चाललोय की काय हे प्रत्येकाने मधून मधून तपासून पहायला हवे आणि वेळीच स्वत:ला सावरायला हवे.
  तुम्ही तुमचा का खरा अनुभव सांगून आम्हाला विचार करायला भाग पाडले आहे. खूपच छान झाला आहे लेख.

  • पल्लवी
   आभासी जग आणि खरे जग यातली रेषा इतकी पुसट होत चालली आहे की दोन्ही मधे फरक जाणवत नाही. याचं कारण म्हणजे तुमचं व्हचर्युअल जग हे जवळपास खऱ्या जगात मिक्स झालं आहे. जसे मला माहिती आहे, तुझे लग्न झाले, आधी तुझे कुठले आडनाव होते.. वगैरे वगैरे.. तुला पण माझ्याबद्दल बरीच माहिती असेल.. आता तूच सांग व्हार्च्युअल आणि खऱ्या जगात काही फरक राहिलाय का?

 13. alka PATIL says:

  फेसबुक बद्दलचा लेख विचार करायला लावणारा नक्कीच आहे.होतेय काय कि मंडळी आपण कोणी सिने-स्टार आहोत असे समजून दर दिवशी आपले फोटो बदलताना दिसतात आणि त्याचे पण व्यासांच होते जाऊन.प्रत्येक फोटोला ‘दाद’ मिळालीच पाहिजे असा अविर्भाव असतो.हे जरा अतीच होतेय.तुम्ही काय खाल्ले, काय कपडे घातलेत, कुठे गेलात, कुठे जाणार आहात, कुठे जायचा विचार करताहात, का विचार करताहात….सगळे असे नोटीस बोर्ड वर कशाला टाकायला हवे ?हि सवंग प्रसिद्धीची हाव वाटते काही वेळा.हे सगळे खोटे, आभसी जग आहे याचा विसर पडू देऊ नये.इथे प्रत्येक जन शाना, गुणू, विचरी आणि सुंदर !!

 14. pratima says:

  bharich

 15. Anagha says:

  “कंटाळा आलाय, तोच तोचपणा जाणवतोय, तर……थोडे दिवस ब्लॉग, फेसबुक यांना सुट्टी देवून पहावी का?” – अनघा २/१०/१२

  अगदी अगदी …
  काय होतं की हे फेसबुकचे आभासी जग तुम्हाला रोज नव्याने स्वत:च्याच प्रेमात पाडत राहते आणि हे फार घातक असतं. मग आपण त्यात असे काही गुंतत जातो की मग इतर गोष्टी फेसबुक समोर दुर्लक्षित होतात. रात्रीच्या जेवणानंतर आमच्या घरी आजकाल हे दृश्य जवळपास रोज दिसते. लेक तिच्या अभ्यासात, नवरा टी.व्ही समोर, त्याला जे बघायला आवडता उदा. Discovery, Animal, star movies, star world किंवा मराठी/हिंदी पैकी सगळ्या हास्य मालिका. ते मला आवडत नाही, म्हणून मी फेसबुकवर. मागच्या वर्षी पर्यंत मी मला कटाक्षाने त्यापासून दूर ठेवत आले….. पण कुठेतरी चुकतंय. एकदा पुस्तक हाती घेतले की संपवल्याशिवाय न थांबणारी मी. गेले १५ दिवसांपूर्वी “हिंदू- जगण्याची एक समृद्ध अडगळ” वाचायचे ठरवले आणि सुरुवात केली पण जेमतेम ८०/९० पाने वाचून माझी गाडी थांबली आहे. हे कुठेतरी खुपतंय मला….म्हणून हे स्टेटस ….

  • अनघा
   हेच विचार माझ्या डॊक्यात ३० तारखेला आले होते. आणि ताबडतोब विचार न करता अकाउंट सस्पेंड केला. ब्लॉग ठिक आहे, कारण ब्लॉग वर फार वेळ जात नाही, दिवसातला अर्धा तास फार तर.. 🙂

 16. Raghu says:

  Khup chhan…

 17. Bhakti says:

  काका,
  तुमच्या ब्लोग पासून सुट्टी घेवू नका, बरं का. मी रेगुलर वाचक आहे तुमच्या ब्लॉगची. व्यसनाधीन म्हणा हवं तर ;).
  भक्ती

  • भक्ती,
   नाही सध्या तरी ब्लॉगिंग बंद करणार नाही. महिन्याला चार पाच पोस्ट तरी नक्कीच असतील.
   🙂 धन्यवाद. 🙂

 18. rajeev says:

  आपण नवीन गावाला गेल्यानंतर जी गोष्ट आधी शोधतो ते आपले व्यसन…!!

 19. Rohit Desai says:

  U must watch the dark comedy “God Bless America (http://www.imdb.com/title/tt1912398/)”.
  Classic take on these so called online socialization, reality shows & everything which seems wrong but highly addictive.

 20. Guru says:

  यु शोड मी द मिरर काका!!!!…… पण मी आत्ताच फ़ेबु अकाऊंट डिलिट नाही करणार….. का?? ते मला नाही सांगता येत ,असं का होत असेल??

 21. vilas laxmanrav kondvilkar says:

  माझं चुकतंय की काय ? नुकतच फेसबुक सुरु केलय ! सुंदर सुंदर वाक्य असलेली पोस्टर फेसबुकवर वाचतो. आवडते म्हणून कॉमेंट्सही देतो. मला स्वत:ला सुविचारासारखी वाक्य बनविण्याचा छंद असल्यामुळे अशी वाक्य बनवून फेसबुकवर टाकतो. त्याच्या कॉमेंट्सही आवडल्या सारख्या येतात. पण दिवसातून तीन चारदा पी सी उघडावा लागतो. तुमच्यासारख्या अनुभवसंपन्न व्यक्तीच्या अनुभवावरून मीसुद्धा व्यसनाकडे चाललोय का असे मनात आले.

  • विलास
   ब्लॉग वर स्वागत. जो पर्यंत फोन वर इंटरनेट सुरु करून फेस बुक सुरु करावे असे वाटत नाही, तो पर्यंत व्यसन लागले आहे असे म्हणता येत नाही. 🙂

 22. महेश कुलकर्णी says:

  लेख सुंदर आहे .आवडला व्यसनाची वाक्या करून आपल्या क्षणभर का होईंना समाधान मिळाले धन्यवाद

 23. अहो काका…फेबू, गुगल प्लस वर.. बरीचशी नवी-जुनी, जवळची-लांबची मंडळी भेटली खरी…. पण या व्हर्चुअल – ऍक्चुअल जगात काही नाती आता फक्त.. पोस्ट्स-लाईकस & कॉमेंट्स पुरतीच उरली आहेत याची ही कुठेतरी खंत वाटते…खरंच..आधीचा एकांत खूप मिस करतोय हल्ली… डोक्यात सतत काही ना काही चालू असतं.. बरं तुम्ही विसरायचं म्हटलंत तरी सेलफोन सारखी आठवण करून देतो… भलतंच.. व्यसनाधीन करून ठेवलंय या SNSs ने & स्मार्ट फोनने…. सारखा मोबाईल हातात हवा.. झोपेतून उठल्यावर जो हातात घेतो तो अगदी.. रात्री झोपताना उश्याला ठेऊन झोपतो… तुमचा Blog वाचल्यावर तरी आता मोबाईल use वर काही Restrictions घालेन…. नक्की… 🙂
  बाकी… “…ज्या गोष्टी शिवाय तुमचे रहाणे सहज शक्य व्हायला हवे, पण ते होत नसेल , तर तुम्हाला त्या गोष्टीचे व्यसन आहे असे समजा…” +1

  • प्रसाद
   वेळीच सावरलेलं बरं. मोबाईल वरून फेसबुक काढून टाकले तरी बराच आराम मिळेल. पहा प्रयत्न करून. मी आधी मोबाईल वरचा फेसबुक डिलिट केलं, आणि नंतर मग चार दिवसांनी कम्प्युटर वरचं.

 24. amol kelkar says:

  विचार करायला लावणारा लेख. चला या निमित्याने आमचे ही फेबु चे व्यसन सुटते का पाहू या

  • अमोल
   सुटणॆ न सुटणॆ दूरची गोष्ट आहे, पण जर इच्छा असेल तर प्रयत्न करून पहायला काही हरकत नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s