ब्लॉगचे आयुष्य

ब्लॉग चे आयुष्य

ब्लॉग चे आयुष्य

दोन दिवसापूर्वी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे  चार वर्षापूर्वी माझ्यासोबत ज्यांनी ब्लॉगिंग सुरु केले होते, त्या पैकी फारच कमी लोकं ऍक्टीव्ह आहेत. बहुतेक ब्लॉग हे निद्रावस्थेत  आहेत.हे असे का  झाले असावे? ब्लॉग चे आयुष्य कसे ठरते? लोकांनी लिहीणे का बंद केले असावे? हा प्रश्न डोक्यात आला , आणि त्यावरून हे पोस्ट.

१)लोकं ब्लॉग का सुरु करतात याची बरीच कारणं आहेत, पण पहिले कारण म्हणजे मिसळपाव, मी मराठी, मायबोली , उपक्रम वगैरे साईट्स वर टोपणनावाने १०-१२  लेख लिहून झाले की आपले हे सगळे लेख एकत्र असावे , म्हणून एखाद्या ब्लॉग ला तयार केले जातो. एकदा मनातले विचार कागदावर उतरवता यायला लागले की मग ब्लॉग वर लेख लिहीणे सुरु होते,

२)ब्लॉग सुरु  करण्याचे दुसरे कारण म्हणजे ,   एकटेपणा!   दिवसभर बोलायला कोणी नसतं,  आपल्या मनात काय आहे ? हे ऐकायला कोणी तयार नाही अशी परिस्थिती असते.  संवाद साधणे ही मानवाची मुलभूत गरज आहे, आणि मग संवाद साधायला कोणी समोर नसेल तर मग ब्लॉग काय वाईट?मग जे काही मनात येईल ते ब्लॉग वर लिहून टाकले जाते.

३) तिसरे कारण म्हणजे इतरांचे ब्लॉग वाचल्यावर ” अरे असं तर मी पण लिहू शकतो, मग का नाही सुरु करायचा ब्लॉग? ”   ह्या विचाराने सुरु केल्या जाणारे ब्लॉग. जसे  – “काय वाटेल ते ”   😀

४)ब्लॉग सुरु करण्याचे कुठलेही कारण जरी असले तरी त्याचे आयुष्य साधारणपणे सारखेच असते.  सुरु झालेल्या ब्लॉग पैकी ७० टक्के हे पहिल्या सहा महिन्यातच बंद पडतात, उरलेले ३० टक्के काही वर्ष ( १-२ वर्ष )सुरु रहातात आणि उरलेले रडत पडत का होईना, पण जिवंत रहातात.

५)सुरुवातीला तुमचा विचार फक्त चांगलं लिहायचं एवढाच असतो, त्यामुळे ब्लॉग प्रमोट वगैरे करण्याच्या भानगडीत तुम्ही पडत नाही. ब्लॉग स्वान्तसुखाय आहे हे विचार मनात पक्के असतात.पण जेंव्हा सारखे स्टॅट पहाणे सुरु होते, तेंव्हा वाचक कसे वाढवायचे या दृष्टीने हालचाल सुरु होते. तुम्ही अगदी “मॅडली इन लव्ह विथ युवर ब्लॉग” होता.   किती लोकं आहे, किती कॉमेंट्स आल्या वगैरे वगैरे यांचा ट्रॅक ठेवणे हेच तुमचे लक्ष असते .

६)तुमचे लक्ष तुमच्या फॉलोअर्स च्या संख्येकडे  जाणे सुरु होते,  जितके जास्त फॉलोअर्स तितकी जास्त पोहोच! 🙂 स्वतःच्या ब्लॉग चे मार्केटींग करण्याचा तुम्ही पद्धतशीर पणे प्रयत्न करता.

-त्या साठी शक्य तितक्या ठिकाणी फेसबुक वर आपल्या ब्लॉग ची लिंक शेअर करता. मेल मधे लिंक लोकांना पाठवता.

-ब्लॉग ला  मराठी ब्लॉग . नेट किंवा मराठी ब्लॉगर्स . नेट शी जोडता.

-तुमच्या ब्लॉग च्या नावाने  फेसबुक पेज, ट्विटर  हॅंडल सुरु करता.

-सगळ्या मित्रांना माझं पेज लाइक करा म्हणून मेसेज करता- ( खरं तर त्यांनी तुमचे पेज लाइक केले काय किंवा नाही, तरी काही फरक पडत नाही, कारण तुम्ही तुमच्या प्रोफाइल वर  टाकलेली ब्लॉग लिंक त्यांना दिसतच असते.)

-तुमच्या मी  मराठी, मिपा, माबो, उपक्रम वगैरे साईट्स च्या सिग्नेचर मधे तुमच्या ब्लॉग लिंक देता, त्या सोशल साईट्स वरून पण तुमच्या ब्लॉग वर व्हिजिटर्स येणे सुरू होते.

७)पहिले हजार वाचक झाले की मग खूप आनंद होतो, तुम्ही वाचकांचे आभार मानणारी  पोस्ट टाकता. अजून वाचक कसे मिळवायचे हा विचार करू लागता. एखादं खूप कॉंट्रोव्हर्सीअल पोस्ट टाकता आणि मग प्रतिक्रियांचा पाऊस सुरु होतो. ब्लॉग आता बाळसं धरू लागतो.

८)इतर ब्लॉगर्स कोण असतील? कसे असतील? हा विचार मनात येतच असतो, बऱ्याच ब्लॉगर्सशी व्हर्च्युअल मैत्री झालेली असते, तुम्ही मग “ब्लॉगर्स मिट” अरेंज करता- सगळ्या ब्लॉगर्स ला भेटणे हा एक मूळ उद्देश असतो. ओघाओघाने पेपर मधली प्रसिद्धी, टिव्ही वर न्युज येतेच  🙂  त्या नंतर नियमित, बाहेर भेटी गाठी , ट्रेक्स, खादाडी वगैरे सुरू होऊन व्हर्चुअल संबंध वैयक्तिक पातळीवर पोहोचतात.

९)इतर ब्लॉग वर जाउन कॉमेंट टाकणे हा वाचक मिळवण्याचा एक उपाय आहे  हे तुमच्या लक्षात आल्याने तुम्ही बहुतेक सगळ्या ब्लॉग वर कॉमेंट्स करणे  सुरू करता. जेंव्हा तुम्ही कॉमेंट देता, तेंव्हा त्या बरोबरच तुम्ही आपल्या ब्लॉग ची लिंक पण देत असता:)  त्या ब्लॉग  चे  इतर वाचकही तुमची   कॉमेंट पाहून  तुमच्या   ब्लॉग लिंक वर क्लिक करून   वाचक मिळण्याची शक्यता जास्त वाढते.नियमित पोस्ट+ नियमित कॉमेंट्स = जास्त वाचक.:)

१०) म्युच्युअल एनकरेजमेंट सुद्धा ब्लॉग साठी पोषक  आहे. एकाच विचाराचे ब्लॉगर्स , पण वेगवेगळ्या विषयावर लिहणारे चांगले मित्र होऊ शकतात, आणि एकमेकांना एनकरेजही करू शकतात, हे सिक्रेट ऑफ द ट्रेड समजले की तुमचा यशस्वी ब्लॉगर होण्याचा मार्ग मोकळा होतो. एक मेका सहाय्य करू, अवधे धरू सुपंथ  🙂

११)सुरुवातीला विषयांची कमतरता नसते, कोणी वाचेल की नाही ह्याची खात्री नसल्याने, आणि तुम्हाला कोणी वैयक्तिकरीत्या ओळखत नसल्याने तुम्ही अगदी काय वाटेल ते लिहत असता. एखाद्या दिवशी काही विषय सुचत नाही, मग स्वतःचे अनुभव, हा मुख्य विषय होतो लिहीण्याचा. दुसऱ्याच्या आयुष्यात डोकाऊन पहायला सगळ्यांनाच आवडतं, त्या मुळे ही पर्सनल पोस्ट्स नक्कीच हिट होतात.

१२)स्वतःचे काही अनुभव कथांमधे किंवा ललित लेखांमध्ये गुंफून पोस्ट्स लिहिले जाते. नंतर येतो रायटर्स ब्लॉक – म्हणजे काय लिहावं हेच सुचत नाही, तुम्ही लिहीणं बंद करता, तुमच्या ब्लॉग वर लोकं येऊन काहीतरी लिहा म्हणून गळ घालतात, तुम्ही एखादा दुसरा लेख लिहिता सुद्धा, पण लवकरच उत्साह संपतो ( कदाचित नवीन गर्ल फ्रेंड मिळणे, लग्न होणे, मुल होणे ही कारणं असतात )आणि ब्लॉग मृतवत होतो.

१३)या सगळ्या प्रकारातून वाचलेल्या ब्लॉगर्स ची नंतरची स्टेज:- स्वानुभव बहुतेक लिहून झालेले असतात, नवीन अनुभव आणायचा तरी कुठून? मग वाचलेल्या इंग्रजी कथांवर आधारित कथा, प्रवास वर्णने,   सिनेमाची परीक्षणं वगैरे लिहीणं सुरू होतं.काहीही करून एखादं तरी पोस्ट लिहिलं गेलंच पाहिजे हा अट्टाहास असतो. जेवायला गेल्यावर समोरच्या डिश चा आधी फोटॊ काढला जातो , आणि मग नंतरच जेवण सुरू केले जाते. ( काय सांगावं? कधी एखादी पोस्ट लिहावीशी वाटली तर उपयोगी पडेल, हा विचार असतो त्या मागचा 🙂  )

१४)राजकारण, समाजकारण, वगैरे अनेक गोष्टींवर तुम्ही आपली काय वाटेल ती मतं मांडत असता.वाचकांची संख्याही बरीच वाढत असते,  पण आता मात्र तुमचे लक्ष त्या संख्येकडे नसते. तुम्ही लिहिल्यावर किती वाचक आले, किती कॉमेंट्स आल्या ह्या गोष्टी गौण होऊ लागतात, फक्त काय वाटेल ते लिहीणं   एवढाच उद्देश असतो..

१५)पेपर मधे  तुमचा एखादा लेख छापून येतो, पुस्तक छापून येतं, आणि मग उगीच आपण काहीतरी मिळवलंय असा समज होतो, अत्यानंदाने मग त्या विषयावरची एखादी पोस्ट लिहीतो. या नंतर तुमचे बरेच लेख वेगवेगळ्या पेपर मधे  प्रसिद्ध होतात, पण पहिल्या लेखाच्या प्रसिद्धीचा जो आनंद असतो, तो पुन्हा अनुभवता येत नाही.

१६)तुमच्या लेखन विषयात वैविध्य आपोआपच येतं, आणि लिखाणाचा पोतं ही सवयीमुळे सुधारतो. तुमच्या ब्लॉग ला एखादं रेकग्निशन, एखादं बक्षीस , मिळतं. खूप काही तरी मिळाल्याचा आनंद होतो. आता पुढे अजून काय मिळवायचं म्हणून लिखाणातला उत्साह काही लोकांचा संपतो आणि  ब्लॉगिंग बंद होतं.

१७)या तडाख्यातून सुटलेले ब्लॉगर्स,ज्यांनी ब्लॉग बंद केलेला नाही, ते   एकप्रकारे समाधानी असतात. आपण लिहिलेले अगदीच टाकाऊ नाही ही गोष्टच त्यांना सुखावून जात असते, केवळ हेच कारण असतं की  ते  लिहीणे बंद करत नाहीत. त्यांची लिखाणाची फ्रिक्वेन्सी  आणि  लेख कमी झाले असले तरी नियमित पणा असतो, आणि त्यामुळेच वाचक वर्ग टिकून रहातो. हे समाधानी ब्लॉगर्स पुढे ब्लॉगिंग कंटीन्यु करतात  🙂 हे जरी खरे असले तरी त्यांच्याही मनात कधी तरी आता आपण बंद करायचं का ब्लॉगिंग हा विचार येतच असतो 🙂 पण ….

तर ही आहे ब्लॉगर्सच्या / त्याच्या ब्लॉग च्या आयुष्याची कथा 🙂  त्या बंद झालेल्या ब्लॉग चे काय होते? काही लोकं बंद केल्यावर तिकडे ढुंकूनही पहात नाहीत, तर काही लोकं चक्क ब्लॉगच डिलीट करून टाकतात. तुम्ही सध्या कुठल्या स्टेजला आहात?

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in अनुभव and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

73 Responses to ब्लॉगचे आयुष्य

 1. आल्हाद alias Alhad म्हणतो आहे:

  “१७)या तडाख्यातून सुटलेले ब्लॉगर्स,ज्यांनी ब्लॉग बंद केलेला नाही, ते एकप्रकारे समाधानी असतात. आपण लिहिलेले अगदीच टाकाऊ नाही ही गोष्टच त्यांना सुखावून जात असते, केवळ हेच कारण असतं की ते लिहीणे बंद करत नाहीत. त्यांची लिखाणाची फ्रिक्वेन्सी आणि लेख कमी झाले असले तरी नियमित पणा असतो, आणि त्यामुळेच वाचक वर्ग टिकून रहातो. हे समाधानी ब्लॉगर्स पुढे ब्लॉगिंग कंटीन्यु करतात हे जरी खरे असले तरी त्यांच्याही मनात कधी तरी आता आपण बंद करायचं का ब्लॉगिंग हा विचार येतच असतो पण ….”

  मी तूर्तास ह्या स्टेजला आहे. माझ्या लिखाणाची फ्रिक्वेन्सी कमी झालेली नाही. ती पूर्वी ही कमीच होती आताही तशीच आहे. आणि ब्लॉग/ब्लॉगिंग बंद करावं असा विचार अजूनतरी मनात आलेला नाही. 🙂

 2. आल्हाद alias Alhad म्हणतो आहे:

  आता ब्लॉगची मार्केटिंग करतो… 😉 😉
  ब्लॉगलिंक: http://www.alhadmahabal.wordpress.com

 3. anandghare म्हणतो आहे:

  माझ्या ब्लॉगची जन्मकथाच वेगळी आहे. मी ब्लॉग सुरू केला तेंव्हा मिसळपाव, उपक्रम वगैरेंचा जन्म झाला नव्हता. नंदन, ट्यूलिप्स, मृदुला वगैरेंचे मराठी ब्लॉग होते. त्यांनी माझे स्वागत केले. त्यांच्या शिफारशीवरून मनोगतावर नाव नोंदवले आणि नंतर सुरू झालेल्या इतर संकेतस्थळांवर एक एक जागा अडवून ठेवली आहे. अधून मधून तिकडे एकादी चक्कर मारून येतो. मधले बरेचसे टप्पे बायपास करून मी १७ व्या स्टेजवर आलो आहे आणि पुढे १८, १९,२० वगैरे टप्पे गाठायचा सध्या तरी माझा विचार आहे.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   काका, तुम्ही जेंव्हा ब्लॉग सुरु केला तेंव्हा मराठी टायपींग पण कठीण होतं, ते सोपं झाल्यावरच ब्लॉग विश्वाने बाळसे धरले असे म्हणावे लागेल.

   • anandghare म्हणतो आहे:

    बघा, काका असून मी ते जमवलं होतं,:) त्या काळात माझी अनेक समवयस्क मित्रमंडळी इंग्रजीत ई मेलसुध्दा करत नव्हती. माझा ब्लॉग लिहून झाल्यावर माझ्या मेल लिस्टमधल्या सर्व (सुमारे २५) मराठी लोकांना त्याची लिंक पाठवली, त्यातल्या एकालाही तो उघडून वाचतासुध्दा आला नाही. त्या काळात मराठी लिहिणे कठीण होतेच, वाचणे देखील सहज नव्हते. पहिले शंभर (सारे अनोळखी) वाचक मिळेपर्यंत मी निराशाग्रस्त होण्याच्या वाटेवर होतो. त्यानंतर गाडी चालत राहिली.

 4. gouri0512 म्हणतो आहे:

  आहे, अजून धुगधुगी आहे!
  आमची कासवाची चाल आहे असं मी सरुवातीपासूनच ठरवून टाकलंय 😉
  आणि लोकांनी वाचण्याच्या लायकीचं लिहिल्याशिवाय प्रसिद्ध करायचं नाही असा प्रयत्न ठेवलाय असं याचं गोंडस स्पष्टीकरण माझ्याजवळ आहे 😉

 5. स्वप्नील म्हणतो आहे:

  खूपच मस्त पोस्ट ..
  मी सध्या तरी १७ व्या स्टेप वर आहे.. सध्या तशी फ्रिक्वेन्सी थोडी कमी आहे.. पण ब्लॉग बंद करायचा अजिबात विचार नाही..
  खरे तर माझी या इंटरनेट च्या मायाजाळवरील सुरुवात ही ब्लॉग नि नाही तर मराठी पुस्तकांच्या (marathiboli.com) संकेतस्थळानी झाली. त्यानंतर ब्लॉग सुरू केला.. आणि नुकतेच मराठी ब्लोगर्स नि त्यांच्या लिंक प्रसिद्ध कराव्यात म्हणून अजून एक संकेतस्थळ..(marathiblogs.in)

  • महेंद्र म्हणतो आहे:

   स्वप्निल,
   मस्त अनुभव असतो हा. एकदा तरी घ्यायलाच हवा. आता स्वतःची मराठी बोली साईट आहे तेंव्हा ब्लॉग सेकंडरी होतो नाही का?

   • स्वप्नील म्हणतो आहे:

    खरे सांगायचे तर लिखाण वागेरेशी माझा खूपच दूरचा संबंध.. पण कधी एखाद्या मुद्यावर लिहावेसे वाटले तर हेच एक स्वताचे ठिकाण.. इथे मी माझ्या मनातले काहीही लिहू शकतो..
    आणि तसे पहाल तर माझा ब्लॉग म्हणजे एक प्रकारे मार्केटिंग बोलू शकता .. याच ब्लॉग वरुन मला जास्तीत जास्त पुस्तके मराठी वाचकांपर्यंत पोचवता आली.. फ्लिपकार्ट सारख्या अनेक मोठ्या वेब साईट असून देखील आज अभिमान वाटतो की मी मराठी पुस्तके नोयडा, तमिळनाडू, मणीपुर, पासून ते अमेरिका, ऑस्ट्रेलिया मध्ये पाठवलेली आहेत… 🙂

    • महेंद्र म्हणतो आहे:

     स्वप्निल,
     ब्लॉग चा उपयोग मार्केटींग साठी पण केला जाऊ शकतो हे आज समजले. खरंच खूप व्यवस्थित वापर करून घेतलाय तुम्ही. अभिनंदन!

 6. शांतीसुधा म्हणतो आहे:

  मी २००४ सालीच माझा इंग्रजी ब्लॉग ” ” लिहायला सुरुवात केली. त्यावेळी मी एम फिल करत होते. कालांतराने अभ्यास वाढल्यावर लिहिणे बंद पडले. नंतर ब्लोगेर्सला गुगलने विकत घेतले आणि माझा ब्लॉग उघडणं बंद झाला. मग २०१० साली बझ वरून देव काकाशी संपर्क आला आणि शतपावली चालू केला. त्यावेळी माझा पी एच डी चालू झाले होते. त्यामुळे कालांतराने पुन्हा वेळेचा मुद्दा उपस्थित झाला आणि लेखनाचा वेग मंदावला. खरंतर माझ्याकडे लिहिण्यास (स्वतः विषयी न लिहीता) लेखनास भरपूर विषय आहेत. तसं पाहिलं तर माझ्या ब्लॉगला वाचकही होते/आहेत. मी टोपण नावाने लेखन करत असल्याने माझ्या वाचकांमध्ये मला व्यक्तीश ओळखत असलेल्यांची संख्या नगण्याच. जे वाचक आहेत ते सगळे आधीचे लेख वाचून नियमित ब्लॉगला भेट देणारे. लिहायला वेळ नाही तर इतरांनी लिहिलेलं वाचायला कुठुन असणार? त्यामुळे इतरांच्या लेखनावरील प्रतिक्रॆयांचा प्रश्न नाहॆ. लेखनाची वारंवारिता कमी झाल्यावर अनेकांनी मला विचारलं देखील पण वेळेचा मुद्दा अजूनही आहेच. त्यामुळे किमान माझ्या बाबतीत तरी वेळ नाही हेच मुख्य कारण आहे. त्याचबरोबर फेसबुकचा देखील त्यात थोडा वाटा आहेच. पण त्यात देखील आता वेळ हा मुद्दा येतोच. बाकी मी मिपा वर कधीच नव्हते. याहू ग्रुपची मेंबर होते. पण तिथे जाणं बझ मुळे बंद झाले. त्यामुळे वेळ मिळायला लागला की पुन्हा आपोआप लेखन चालू होईलच. यात शंका नाहीच. वेळ नसण्याचा मुद्दां तुम्ही वरील मुद्द्यांत घेतलेला दिसलेला नाही म्हणून इतकं लिहीलं.

 7. Sonali Kelkar म्हणतो आहे:

  Perfect analysis.
  Agadi asech hote Blog ani Bloggerche.

 8. Krishnakumar Pradhan म्हणतो आहे:

  महेंद्रजि,ब्लोगवर लिहिणे अधिक गुंतागुंतिचे झाले आहे.गुगल इनबोक्स वरुन सरळ ब्लोगवर जाता येत नाहि,ब्लोगर आता ङशबोर्ङने घेतले आहे,त्याला वेगळा पासवर्ङ लागतो.पासवर्ङ विसरणे तर नित्याचे झाले आहे

 9. Pankaj Z म्हणतो आहे:

  आम्ही थोडेबहुत १७ नंबरवाले. 🙂
  लेख आवडला. पण बरेच चांगले ब्लॉग निद्रिस्त झाल्यामुळे वाईटही तेवढेच वाटते.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   पंकज
   बरेच चांगले ब्लॉग बंद झाले. खरं सांगायचं तर माझंही मन भरले आहे, कधी कधी बंद करायचा विचार येतच असतो मनात.

 10. जयश्री म्हणतो आहे:

  महेंद्र, काही काही मुद्दे पटलेच 🙂
  पण सुदैवाने माझं कासवाच्या गतीने का होईना…. पण स्वान्तसुखाय लिखाण सुरु आहे.
  त्यावर मिळालेल्या प्रतिक्रिया म्हणजे बोनस 😉
  आणि काहीही म्हण, मला तरी ब्लॉगवर काही पोस्टलं की खूप छान समाधानाचं फ़िलिंग येतं दिवसभर 🙂

 11. मुद्दा नंबर २ आणि १७ मी या दोन्ही ही मध्ये बसतो. नावाप्रमाणे हौशी लेखक आहे. काही सुचले/जमलं की लिहितो. 🙂

 12. सागर कोकणे म्हणतो आहे:

  छे ! बंद वगैरे काय ?
  मी फक्त संधीची वाट पाहत असतो कधी काय सुचेल आणि ते लिहायला वेळ मिळेल.
  १२ व १३ जास्त पटले. निदान असे लेख वाचून ते ब्लॉग जिवंत झाले तरी आनंद आहे.

 13. bhagyashree म्हणतो आहे:

  mi bahutek 17. pan frequency kami mhanje changlich kami zaliy. 3 varshat 2 posts vagere, too much! 🙂 pan blog ani band? mulich nahi!! 🙂
  mast post kaka!

  – bhagyashreee.blogspot.com 😛

  • महेंद्र म्हणतो आहे:

   गेल्या वर्षात दोन तिन पोस्ट टाकले ते पण खूप झालेत, पण आता मात्र नियमित टाकायला हरक्त नाही, कमित कमी महिन्याभरात एक तरी?

 14. rohini gore म्हणतो आहे:

  ब्लॉग आयुष्याचा चांगला आढावा घेतला आहे. लेख आवडला.

 15. anandghare म्हणतो आहे:

  चांगल्या निरीक्षणावरून आणि विश्लेषणाच्या आधारे लिहिलेला उत्कृष्ट लेख. (हे लिहायचे राहूनच गेले होते). बारा लाखावर वाचक तुमचे लेखन उगाच नाही वाचतात. त्यावरच्या प्रतिक्रिया किंवा प्रतिसादसुध्दा खूप सांगून जातात. त्यामुळे जोपर्यंत ब्लॉगर आणि वर्डप्रेस वगैरेंची मेहेरबानगी आहे तोवर ब्लॉगिंग चालूच राहील. याहू ३६० या माझ्या मूळ संस्थळाने मात्र दगा दिल्यामुळे तो बंद पडला आणि तिथल्या मजकुराचे ब्लॉगस्पॉटवर ट्रान्स्प्लांटेशन करावे लागले. ब्लॉगस्पॉटसुध्दा वर्षभर कोमात गेला होता हे लक्षात घेऊन वर्डप्रेसवर तिसरी खोली घेऊन ठेवली. हे सगळे करतांना वेळ आणि श्रम खर्ची पडतातच, निराशाही येत असल्यामुळे कधी कधी तो नाद सोडून द्यावासा वाटतो. स्वतःचे डोमेन विकत किंवा भाड्याने घेऊन त्यावर ब्लॉग चालवायचा असेल तर त्यासाठी बरीच माहिती, तंत्रज्ञान, अनुभव वगैरे लागत असावा.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   वर्डप्रेस वर डॉट कॉम करणं सोपं आहे. फक्त दर वर्षी ठ्रराविक रक्कम भरावी लागते ( ७०० ते १००० रुपये) त्यात आपल्याला काहीच करावे लागत नाही, सगळे बदल वर्डप्रेस वालेच करतात. पण डॉट कॉम करूनही काही विशेष फायदा होत नाही हे माझे मत आहे, तेंव्हा आहे तसेच चालू द्या. 🙂

 16. Rajendra Bhandari म्हणतो आहे:

  महेंद्रजी अतिशय समर्पक लेख …मीही तोडकंमोडकं लिहीण्याचा प्रयत्न केला पण इतरांच लेखन जास्त वाचावसं वाटतं म्हणुन माझं लेखनही कमी होतं ..पण चालु आहे..

 17. Rahul Kaware म्हणतो आहे:

  mi ata kuthe 6 vya stage la ahe… (ani ajunhi mala abhiptay marathit kasa lihava he kalat nahi….)

 18. Nandini म्हणतो आहे:

  आम्ही आता कुठे सुरुवात करतोय ब्लॉगवर लिहायला. बरंच लिहायचं असतं पण वेळ मिळत नाही. आणि वेळ मिळाला की तो बहुतेकदा फेसबुक वगैरेवरच टीपी करण्यात जातो. 🙂

  • महेंद्र म्हणतो आहे:

   नंदिनी,
   ब्लॉग वर स्वागत. हळू हळू जमेल सगळं . 🙂 आमच्या वेळेस फेसबुक फारसं पॉप्युलर नव्हतं 🙂
   दुसरी गोष्ट कॉमेंट देतांना आपल्या ब्लॉग ची लिंक पण दिली तर जास्त बरं .. लोकं क्लिक करून तुमच्या ब्लॉग वर येऊ शकतात.

 19. मुकेश वावरे म्हणतो आहे:

  एकंदरीत हे सर्व मुददे राजकारण, अथवा सिनेक्षेत्रात येणा-यांचे अथवा पब्ली॑सिटीमध्ये येणा-या प्रत्येक क्षेत्रात लागू होतात ना?

  • महेंद्र म्हणतो आहे:

   मुकेश
   ब्लॉग वर स्वागत.
   मला वाटतं होय.. फक्त थोडा फार फरक पडत असेल. तिथेअगदी पहिल्या दिवसापासून मार्केटींग सुरुकरावे लागत असावे . प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.

 20. raajmat म्हणतो आहे:

  खूप चांगले निरीक्षण…
  ज्या विषयांना वृत्तपत्रे न्याय देऊ शकत नाहीत, त्या विषयांना मांडण्यासाठी म्हणून सुरू केलेला माझा ब्लॉग आता ई-पेपर म्हणून सुरू करावा, या विचारप्रत आलो आहे. त्याशिवाय त्याची प्रिंट कॉपीही काढावी, असा विचार आहे. सध्यातरी साप्ताहिक डोक्यात आहे. ब्लॉगचा निश्चितच फायदा झाला. कोणत्याही नेत्याला वा कार्यकर्त्याला न भेटता, आज मी प्रमुख राजकीय पक्षांच्या मेलिंग लिस्टवर आहे, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.
  त्यासाठी अर्थात तीन वर्षांचा कालावधी द्यावा लागला आहे.

 21. tivtiv म्हणतो आहे:

  चांगलं अ‍ॅनालिसिस…
  आणि अनुभवाचे बोल .. हो ना 🙂

 22. sanjivani म्हणतो आहे:

  ब्लॉग विषयी विचार करायला लावणारा लेख

  http://jemanalabhidelte.blogspot.com

 23. anuvina म्हणतो आहे:

  नेहेमी प्रमाणेच अप्रतिम विश्लेषण …. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे मी या सगळ्या टप्प्यातून जाऊन आता जरा स्थिरावलो आहे. ;). पण सुरुवातीचे दिवस मजेचे होते …”तू लिहायला केंव्हा पासून लागलास?” ते “हे तुझंच आहे ना?” इथ पर्यंत विचारणा किंवा “तू हे पण करतोस?” अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया बघून मजा वाटायची. आणि आता ओघ कमी झाल्यामुळे “काय रे लिहिलं नाहीस बरेच दिवसात” अशी विचारणा झाल्यावर बर वाटतं. लोकं आपण लिहिलेलं आवर्जून वाचतात ही भावनाच सुखावह आहे.
  सध्या वेळ कमी आहे … लिहायला भरपूर विषय आहेत पण दर्जा राखण्यासाठी वेग मंदावला आहे इतकंच. बाकी अनुविना काही बंद होणार नाही हे निश्चीत. पण अजूनही स्वानुभव आणि भूतकाळ यावरच जोर आहे …. कल्पना आणि विलास यांचे सूर अजून तरी जुळले नाहीयेत ….. जुळतील कधी तरी … घाई कुणाला आहे. 😉

  • महेंद्र म्हणतो आहे:

   आनंद,
   वेग मंदावणे सहाजिक आहे. काही तरी लिहायलाच हवे अशी भावना सुरुवातीला असतेच. पण नतर मात्र आपले आपल्यालाच समजते की कधी आणि किती लिहायचे ते. मनासारखे लिहून झाले नाही तर ती पोस्ट ड्राफ्ट मधेच रहाते. माझ्या ड्राफ्ट मधे पण अशा बऱ्याच पोस्ट्स आहेत 🙂

 24. sanjivani म्हणतो आहे:

  नेहमी प्रमाणेच उत्तम लेख
  मी पण यात कुठे तरी येते.

  http://jemanalabhidelte.blogspot.com

 25. sanjivani म्हणतो आहे:

  नेहमी प्रमाणेच उत्तम लेख

  http://jemanalabhidelte.blogspot.com

 26. Gangadhar Mute म्हणतो आहे:

  महेंद्रजी अतिशय समर्पक लेख.
  मी स्वत:च एवढे लिहितो की इतरांचं लेखन जास्त वाचायला वेळच मिळत नाही. अन्य ब्लॊगवर जाणे होत नाही.

  सध्या मी कुठल्या स्टेजला आहे, हे सांगणे कठीण आहे पण असे वाटते की अजूनही भरती सुरूच आहे. ओहोटीला लागलेला नाही. 🙂

  • महेंद्र म्हणतो आहे:

   गंगाधरजी
   बरेच आपल्यावेळेस चे ब्लॉग बंद झालेले दिसले, म्हणून हा लेख सुचला.माझेही तसे सुरु आहेच, पण फ्रिक्वेन्सी मात्र कमी झालेली आहे .

 27. vinayak Pandit म्हणतो आहे:

  अ प्र ति म विश्लेषण महेंद्रजी! अगदी अचूक! मी आपल्या भेटीत सांगितल्याप्रमाणे मुद्रित माध्यमातून फिरून इथे ब्लॉग माध्यमावर येऊन निवांत झालो आहे… इथे लिहायला खूप आनंद होतो… आणि असं वाचायलाही! 😀

 28. मधूकर म्हणतो आहे:

  कुलकर्णी साहेब,
  लेख पटला नाही. चळवळ म्हणून लिहणारे अनेक ब्लोग आहेत, ते तुम्ही विसरलात.
  नुसता टाईमपास किंवा डायरी टाईप लिखाणाच्या पलिकडॆ ब्लोगींगच्या व्याप्ती गेली असून बहुजन समाजातील ब्लोग तपासल्यास दर महिन्याला पडणारे पोस्ट कमी होत नसून वाढत आहेत हे दिसेल.
  तुम्ही एखादा लेख बहुजनांच्या ब्लोगिंवरही लिहावं अशी ईच्छा आहे.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   मधूकर
   होय, एखाद्या विचाराला वाहिलेले ब्लॉग मी यात कन्सिडर करायचे विसरलो. त्यात मात्र नियमीत पणे भर पडत असतेच. बहुजनांच्या ब्लॉग बद्दल नक्कीच लिहायला आवडेल. :० धन्यवाद.

 29. Mohana म्हणतो आहे:

  छान विश्लेषण आहे. मला आठवतं आहे, लोकसत्तेत माझी ’ओ ड्युड’ लेखमालिका प्रसिद्ध होत होती तेव्हा काही वाचकांनी आंतरजालावर प्रसिद्ध करा अशी गळ घातली, तेव्हापासून मी इथेही ’टाकायला’ लागले लेख वगैरे. त्या आधी मासिकं, वर्तमानपत्रातून लिहित होते.काही काही विचार ’वर्तमानपत्रीय’ नसतात त्यामुळे अरे छान माध्यम आहे ’ब्लॉग’ असं वाटून हे सुरु झालं. माझ्या दृष्टीने तोटा असा झाला की ब्लॉग लेखन चालू राहिलं आहे पण वर्तमानपत्र, मासिकं याच्यांसाठी कमी लिहलं जायला लागलं आहे.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   मोहना,
   ब्लॉग वर लिहीण्यात वेगळाच आनंद असतो, म्हणून ते सुरु रहातं, एक वेगाळी ओळख तयार होते ब्लॉग मुळे. वर्तमान पत्रात लेखन मी कधी मुद्दाम केले नाही. पण या ब्लॉग वरचे बरेच लेख लोकमत मध्ये येऊन गेले आहेत. . हॉबी चे काम व्हायला नको नाहीतर मजा शिल्लक रहात नाही.

   • Mohana म्हणतो आहे:

    खरं आहे, तरीही वर्तमानपत्र, मासिकं यातून लेखन येणं आणि मिळणारं ’मानधन’ याचीही नशा औरच 🙂

 30. KattaOnline Marathi Blog म्हणतो आहे:

  तसा मी ब्लॉगच्या जगातील नवीन रहिवासी आहे. पण हा लेख वाचून “मंझील अभी दूर है” किंवा “पिक्चर अभी बाकी है” असा काहीतरी फील येतोय. एकूण ह्या जगातल्या आयुष्याचा अंदाज आलाय तसा हा लेख आणि वरील इतर कोमेंट्स वाचून 🙂

 31. padmashree म्हणतो आहे:

  मला वाटत की मी तिसऱ्या कारणाने ब्लॉग सुरु केला आणि चौथ्या कारणा त बहुतेक कारभार आटपेल. मुख्य कारण वेळ . पण तरी पुढचे टप्पे पहायला हवेत असं वाटतं

 32. Dinesh म्हणतो आहे:

  Kaka Tumhi Far Chaan lihita …pan july madhye ekhi post nahi…. Me tumacha pratyek post vachato …Tumhi Guhagar Ratnagiri La kadhi ala hotat kay? Khupach Sundar Samudra Kinara aahe…me Sadhya ENRON MAdhye Job Karto.

 33. ninad kulkarni म्हणतो आहे:

  ह्या लेखाच्या व प्रतिसादाच्या निमित्ताने मराठी ब्लॉगर त्यांची उत्क्रांती ते अस्त असा कालखंड व त्यातील अनेक टप्पे
  क्रमाक्रमाने वाचायला मिळाले . आपण सध्या कोणत्या टप्प्यावर आहोत ह्याचे आत्मभान आले.
  माझ्या पुरता बोलायचे तर लिखाणाला विषय व लिखाणाची उर्जा कधीच कमी होत नाही. पंचतारांकित विश्वात मुशाफिरी करत असल्याने नित्य नवीन अनुभव येत असतात. वाचनाचे व्यसन असल्याने कोणत्याही बातमीवर आपली अक्कल पाजळणे नैसर्गिकरीत्या होते.
  मध्यंतरी आम्हाला कन्यारत्न झाले , ती प्रियांका व राहुल च्या
  कॅटेगरी मधले असल्याने नातेवाईक , आप्त परिवार ह्यांच्या सह मला आमच्या कुटुंबासह दोन भिन्न संस्कृतीत आपापले अनुभवाचे प्रयोग आमच्या कन्यारत्नाच्या संगोपनावर करण्यात आले. तेव्हा लिहायला फुरसत नव्हती ,
  आता लिहायला सुरुवात केली, तेव्हा ब्लॉगर विश्वात डोकावायला आलो तर ,काकांची हि पोस्ट वाचली.
  काका

 34. samidha म्हणतो आहे:

  Thumi khup chhan vishleshan kele aahe…! Majha blog phakt vay varsh 9 mahine….! thoda thoda balasa dharat aahe…! tumachya va itar changalya blogg varil vishayanche vaividhya pahun , lekhan vachun mi majhya bloggvarhi asech chhan sanskar karnyacha prayatna karit aahe…! tyala changale sahitik aarogya ,samrudha vicharani yukt ase udand aayushya labhude asa aapala aashirvad milava…..!!!!

 35. Suyog म्हणतो आहे:

  मी माझा ब्लॉग गम्मत म्हणून सुरू केला त्याचे कारण म्हणजे मला मराठी ब्लॉग आणि साइट सापडत नसत म्हणून मी त्याच्या लिंक माझ्या ब्लॉग वर टाकत गेलो आणि मी आजपर्यंत जवळपास 120 पोस्ट टाकल्या आहेत तेही गम्मत म्हणून पण नंतरच्या काळात कामात व्यस्त असल्यामुळे ब्लॉगवर काम करू शकलो नाही. पण माझ्या ब्लॉगवर आतापर्यंत जवळपास 100000 पेक्षा जास्त लोकांना विजिट केल्या आहेत आणि ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. तुमचं हा लेख वाच्यावर कदाचित मला प्रेरणा मिळाली असे वाटते.

  माझा ब्लॉग :- http://marathiplace.blogspot.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s