भविष्य..

मोडी लिपी मधे पंतांनी दिलेल्या शुभेच्छा

धोंडोपंतांनी दिलेला शुभेच्छा.. मराठी मधे :- श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.येत्या निवडणूकीत नरेंद्रजींना उत्तम यश मिळून ते देशाचे पंतप्रधान होवोत अशी श्री रामरायाच्या चरणी प्रार्थना.

मी  नास्तिक आहे, देवावर माझा विश्वास नाही, तशी एक अज्ञात शक्ती वगैरे असेल, पण देव नाही हे माझे मत पक्के आहे,  माझा भविष्यावर विश्वास नाही. फल जोतिष्य हे थोतांड आहे,   ही अशी वाक्य आपण नेहेमीच ऐकत असतो. माझे  बरेचसे मित्र याच विचाराचे आहेत. मी शक्यतो कुठल्याही गोष्टीवर वितंडवाद करणे टाळतो. तुमचा विश्वास नसेल तर ,ठीक, पण  मी विश्वास ठेऊ नये असा दबाव तुम्ही माझ्यावर का बरं आणता?

एक कन्फेशन म्हणजे , मी पण पूर्वी तसाच होतो. देव वगैरे काही नसतं, असं मानणारा. तसं म्हटलं, तर अगदी बाळबोध घरात जन्म घेतलेला मी. घरचे संस्कार म्हणाल तर दररोज सकाळी रामरक्षा, अथर्वशीर्ष आणि संध्या केल्याशिवाय दुधाचा कप हातात पडायचा नाही. पण एकदा मोठं झालो, आणि घराबाहेर  नोकरी निमित्त पडल्यावर मात्र  एक एक गोष्ट हळू हळू बंद होत गेली. तर काय होतं, की  जो पर्यंत आपण तरुण असतो, लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशी आपली धारणा असते, तो पर्यंत तर हे देव वगैरे सगळं काही थोतांड वाटतं. विचारांची जडणघडण पक्की व्हायला, अमिताभ बच्चन चा तो सिनेमात देवळासमोर बसलेला पण देवळात न जाणारा आदर्श डोळ्यापुढे असतोच.

अशा परिस्थितीत सगळं काही व्यवस्थित सुरु असतं, नोकरी , दर महिन्याला बॅंकेत जमा होणारा पगार, त्यातून बुक केलेला फ्लॅट, त्याचे हप्ते भरणे , लग्नं, मुल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्या कविते प्रमाणे म्हणजे बॉर्न ऑन मनडे, बाप्तिस्ड ऑन ट्युसडे ……… आणि डाईड ऑन सनडे, प्रमाणे होत असतात. या सगळ्यात देव, धर्म , वगैरे गोष्टींचा विचार करायला वेळ असतोच कुठे?

भविष्य म्हणाल, तर अरे मी करीन ते होईल! भविष्य माझ्या स्वतःच्या हातात आहे , जर मी प्रयत्न केला तर एखादी गोष्ट का होणार नाही बरं? माझे भविष्य मी स्वतःच घडवणार आहे. असे विचार अगदी मनात पक्के बसलेले असतात.माझेही विचार तसेच होते.

माझा पण देवावर किंवा भविष्यावर विश्वास नव्हता. चक्क थोतांड वाटायचं ते.. वडील पत्रिका पहायचे, त्यामुळे बरेच लोकं घरी यायचे, त्या लोकांकडे पाहिले की त्यांच्या मानसिकतेची कीव यायची. पण नंतर जसे जसे आयुष्य पुढे सरकत गेले, वय वाढत गेले, तसे हळू हळू विचार परिवर्तन होत गेले ,आणि काही तरी शक्ती आहे , तिला देव म्हणा किंवा इतर काही या विचारापर्यंत पोहोचलो.

आयुष्यात चांगले काय किंवा वाईट दिवस काय , हे नेहेमी साठी नसतात . कधी तरी चांगले दिवस अचानक ब्रेक लागल्याप्रमाणे थांबतात, आणि एकामागोमाग एक संकटांची मालिका सुरु होते. काय करावे तेच समजत नाही.  स्वतःच्या हिमतीवर आपण त्या  अडचणींना सामोरा जाण्याचा प्रयत्न करत असतोच, पण कधी तरी केलेले प्रयत्न कमी पडू लागतात आणि प्रत्येक गोष्ट मनाविरुद्धच व्हायला लागते.

कुठे तरी मनात शंकेची पाल चुकचुकते. वाटायला लागतं, की अरे मी देवाची अमुक अमुक गोष्ट केली नाही म्हणून तर माझ्यावर हे संकट आलेले नाही ना? आणि नकळत  आपला विश्वास जरी नसला, तरीही देवापुढे   नतमस्तक होऊन  माझी काळजी घे रे बाबा आता…. म्हणून  क्षमा मागतो. प्रत्येकाच्या आयुष्यात ( म्हणजे ९९ टक्के लोकं म्हणतोय मी, एक टक्का अपवाद ) असा प्रसंग हमखास आलेला असतो, ९९ टक्के लोकं मान्य करतात, आणि उरलेले १ टक्का  मान्य करीत नाहीत एवढेच!

आपल्यावर संकटं आली, आणि  आपण त्यांना फेस करण्याचे केलेले सगळे प्रयत्न संपले की मग   देव आठवतो. देवापुढे बसून केलेला जप, किंवा  लहानपणी शिकलेले रामरक्षा, अथर्वशीर्ष , विष्णू सहस्त्रनाम ,आणि दोन चार सुक्तं वगैरे जेवढं काही आठवत असतं ते सगळं म्हणून झाले की तासा दिडतासानंतर थोडं फार का होईना, पण मनःशांती लाभते.

अशा प्रसंगात देवा नंतर, आई वडिलांच्या नंतर   आठवणारे दुसरी व्यक्ति  म्हणजे धोंडोपंत आपटे. आजपर्यंतचा माझा स्वतःच्या वडिलांनी सांगितलेल्या  भविष्या नंतर इतर कोणी सांगितलेल्या भविष्यावर विश्वास असेल तर  तो म्हणजे केवळ धोंडोपंतांवर. (माझे वडील  गेले   ६० एक वर्ष तरी पत्रिका पहातात, पण हल्ली वयोमानामुळे ( ८६ वर्ष ) बंद केलेले आहे, आणि त्यांना या वयात  पत्रिका पहायला सांगणे म्हणजे…….)   तेंव्हा कुठलाही प्रसंग ओढवला, किंवा एखादा निर्णय घ्यायची वेळ आली की धोंडॊपंत आठवतात, आणि वेळी अवेळी त्यांना फोन करून मी त्रास देत असतो. अगदी केंव्हाही जरी फोन केला तरी, पंत तेवढ्याच आत्मियतेने फोन उचलतात आणि बोलतात.

ज्योतिष्याकडे आपण जातो, ते केवळ आपण स्वतः येणाऱ्या प्रसंगाला तोंड देतांना  जेंव्हा काही मार्ग सुचत नाही तेंव्हा.काही चुकले तर नाही ना हे कन्फर्म करण्यासाठी! अशा परिस्थितीत जर मग ज्योतिष सांगणारे सगळे काही निगेटिव्ह सांगणे सुरु केले तर मात्र अजूनच मनःस्ताप वाढणार हे नक्कीच.

भविष्य सांगणं ही पण एक कला आहे.  पत्रिका पहातांना   कितीही वाईट गोष्ट लक्षात आली, तरी पण ती कशा पद्धतीने त्याला न दुखवता सांगायची ही गोष्ट प्रत्येकालाच समजते असे नाही – तो समज मात्र पंतांच्याकडे आहे.  परंतु  पंतांचे भविष्य सांगणे पण रोख ठोक आणि दुसऱ्याला ना उमेद न होऊ देणारे. आजपर्यंत पंतांनी जे काही सांगितले आहे ते माझ्या बाबतीत तरी १०० टक्के खरे ठरले आहे, आणि  कदाचित म्हणूनच पंतांचे हजारो जातक जगभर विखुरलेले आहेत.  त्यांचा ज्योतिषविषयक ब्लॉग पण  आहे. ब्लॉग ची वाचक संख्या पाहिली की ह्या विषयावर इंटरेस्ट असणारे लोकं इतके लोकं आहेत हे पाहून खरंच आश्चर्य वाटते, आणि एक गोष्ट लक्षात येते, की भविष्यावर विश्वास ठेवणारा बहुसंख्य वर्ग आहे, फक्त तो लपून छपून.. उघडपणे नाही.

आमचे पंत म्हणजे पण एक भन्नाट व्यक्तिमत्त्व आहे. जर आज पुलंच्या संपर्कात आले  असते, तर व्यक्ती आणि वल्ली मध्ये पंतांचा नक्कीच समावेश केला गेला असता. तुम्ही कधी  मराठी वृत्तांवर विकिपिडीयावर केले गेलेले लिखाण वाचले आहे का? तिथे  लिहिणारे पण आमचे पंतच बरं का! ज्योतिष हा व्यवसाय असला, तरीही   वृत्तबद्ध कविता,  गझल, लिहिणे म्हणजे पंतांचा विरंगुळा.  कविता लिहितांना मात्र अगस्ती ह्या  टोपण नावाने लिहितात, अर्थात त्यांच्या संपर्कात असणाऱ्यांना अगस्ती म्हणजे कोण हे माहिती आहेच. मोडी ही एक जूनी लिपी. हल्ली फार कमी लोकांना ती लिपी येते,  तिचे संवर्धन व्हावे म्हणून पण पंत बरेच काम करतात.

इरसाल कोंकणी पणा भरलाय पंतांच्या मधे. विनोद बुद्धी , एकदम अप्रतिम. राजकारणावरचे भाष्य तर नेहेमीच मर्मभेदक असते. फेसबुक वरच्या पंतांच्या पोस्ट्स म्हणजे निर्भेळ करमणूक. जर तुम्हाला काही खास कोंकणी शिव्यांची ऍलर्जी असेल तर पंतांना फॉलो करण्याच्या भानगडीत पडू नका, नाही तर पंतांना फेसबुक वर अवश्य फॉलो करा..
तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना श्री रामनवमी च्या शुभेच्छा देऊन हा लेख संपवतो.  श्री राम!

 

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in व्यक्ती आणि वल्ली and tagged , . Bookmark the permalink.

21 Responses to भविष्य..

 1. kanchankarai म्हणतो आहे:

  तासारखा हरहुन्नरी माणूस सापडणं विरळाच. असं एखादंच क्षेत्र असेल, ज्या मध्ये पंताना रस नाही किंवा त्यांचा अभ्यास नाही. त्यांचं वाचन, लेखन पाहून थक्क व्हायला होतं. मित्र आणि माणूसकी कशी जपावी, हे पंतांकडून शिकावं.

 2. Prasad Salunkhe म्हणतो आहे:

  मस्त काका, पंतांचा एकेक स्टेट्स अफलातूनच असतो. या सम हाच

 3. Champra Deshpande. म्हणतो आहे:

  पंत आपले मित्र आहेत ! वा !

 4. Vinayak Belapure म्हणतो आहे:

  धोंडोपंताच्या कडून भविष्य जाणून घ्यायचा प्रसंग अजून आला नाही पण धोंडोपंत या व्यक्ती विशेषावर लोभ मात्र जडला आहे गेल्या काही वर्षात.
  त्यांचे पोस्ट , त्यांची शायरी , त्यांचा रोखठोकपणा, त्यांची एक ब्लॉग लिहून किंवा जनहितार्थ काही सल्ला देण्याची कळकळ सगळे कसे भिडते मनाला .

  त्यांची आत्मीयता आणि काहीही न लपवण्याची वृत्ती हाच त्यांचा कणा आहे .

 5. ruchira2702 म्हणतो आहे:

  पंतांची ओळख हि इथलीच फेसबुकवरची.. भेटीचा योग बघू कधी येतोय..

 6. Rajendra Bhandari म्हणतो आहे:

  महेंद्रजी तुमचा लेख वाचून पंतांबद्दलचा आदर द्विगुणीत झाला आहे.मी त्यांच्याकडुन मार्गदर्शन घेतले आहे.त्यांची ओळख फेसबूकच्या माध्यमातुन झाली आहे. कोणत्याही अडचणीप्रसंगी आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळणे ही मोठी सुखद बाब आहे ..या साठी पंतांना व आपणासही खुप खुप धन्यवाद.

  • महेंद्र म्हणतो आहे:

   राजेंद्रजी
   पंत म्हण्जे एकदम फणसासारखा माणूस.. त्याला ओळखणे थोडे अवघड, पण एकदा ते कसे आहेत हे समजले की मग मात्र त्यांचा सहवास खूप आवडतो..

 7. aruna म्हणतो आहे:

  आजकालच्या काळात अशी व्यक्ती भेटणे, त्यांचा सहवास लाभणे दुर्मिळच आहे. महेन्द्र तुम्ही लल्य आहात्च पण तुमच्या अश पत्रमैत्रीद्वारे जो लाभ मला मिळतेओ तो हॊ बहुमूल्य आहे.

 8. creativemau म्हणतो आहे:

  as usual सुंदर लेख ! मी तसं फक्त ऐकले आहे पंतांबद्दल ! आता फाॅलो करायलाच पाहिजे!

 9. anuvina म्हणतो आहे:

  पंत आमचे जुने मित्र. ठाण्याला तात्या अभ्यंकर यांच्या घरी ओळख झाली ….. नंतर विशेष संपर्क राहिला नाही पण एकमेकांच्या स्मरणात मात्र कायम आहोत. बरेच जणांना कदाचित माहित देखील नसेल काही वर्षांपूर्वी पंत कट्टर ज्योतिष विरोधक होते. माझ्या अगदी बोटावर मोजण्या इतक्या प्रचंड प्रतिभावान मित्रांमध्ये धोंडोपंतांचा क्रमांक फार वरचा आहे. हाताचे राखून बोलणे वागणे त्याला कधीच जमले नाही …. जे काही असेल ते रोखठोक.

 10. sachin म्हणतो आहे:

  please provide contact number of Dhondopant apte sir

 11. RAMESH GURUNATH KURTKOTI म्हणतो आहे:

  झाले बहु होतील बहु परी या सुम हाच

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s