अस्थी..

अस्थी..अण्णासाहेब पलंगावर झोपले होते, शेजारी हार्ट रेट मॉनिटर वरचा ग्राफ एका लयीत खाली वर होत होता. शेजारी असलेल्या तीन पेशंटस पैकी आपण एक पेशंट नंबर २, डॉ. राठींचा पेशंट! अण्णासाहेबांचे वय ९४, आज पर्यंत अगदी ठणठणीत तब्येत होती, पण परवा नेमकं बाथरुम मधे पाय घसरुन पडायचे निमित्त झाले, आणि इथे  दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ आली. आज पर्यंत कधी मला साधी सर्दी पण झाली नाही म्हणून ब्रॅगिंग करणारे अण्णासाहेब  आज पलंगावर पडून कसला तरी गहन विचार करत होते.

तेवढ्यात नर्स आली, आणि व्हायटल पॅरॅमिटर्स चेक करुन पलंगाच्या शेजारी लावलेल्या चार्ट वर नोट करू लागली. अण्णासाहेबांची चार मुलं, आणि दोन मुली. त्या पैकी तीन मुलं आणि एक मुलगी अमेरिकेत, एक मुलगा जो सध्या कामानिमित्त बंगलोर ला गेला होता तो एक आणि शेजारी बसलेली मुलगी श्वेता एवढेच काय ते भारतातले कुटुंब. हातावर जोडलेल्या सलाइनच्या ट्युब  ला मॅनिप्युलेट करुन अण्णासाहेबांनी तोंडावरचा ऑक्सीजन मास्क बाजूला करण्याचा आणि काही तरी बोलण्याचा प्रयत्न करू लागले. श्वेता एकदम सजग पणे तोंडावरचा मास्क निट करायला गेली, पण त्या सलाईनची ट्यूब जोडलेल्या हातात असली नसली सगळी शक्ती एकवटून त्यांनी तिच्याकडे पाहिले. न बोलता, पण डोळ्यांनी बरंच काही सांगितलं श्वेताला, तिने हळूवार पणे मास्क बाजूला करुन त्यांच्या ओठाजवळ कान नेले, ते म्हणाले, ” रघुवीर ला बोलाव लवकर, मला त्याला काही महत्वाचे सांगायचे आहे, मी आता काही फार जगणार नाही’

रघुवीर म्हणजे भारतात असलेला मुलगा. श्वेताने त्याला ताबडतोब फोन केला, आणि अण्णासाहेबांचा निरोप सांगितला. रघु थोडा विचारात पडला, नेमकं काय सांगायचं असेल बरं अण्णासाहेबांना? त्यांची असलेली सगळी प्रॉपर्टी त्यांनी स्वतःच्याच मर्जीने आपल्या मुलांमधे वाटली होती. आता फक्त बॅंकेत असणारे ६ लाख रुपयेच शिल्लक होते, ते जरी आपल्या नातवांना वाटले, तरीही प्रत्येकी फार तर ६०-७० हजार मिळतील. त्याबद्दलच बोलायचं असेल का अण्णांना? अण्णासाहेबांचं आयुष्य जसे एखाद्या मध्यमवर्गीय माणसाचे जावे तसे गेले होते. विशेष घडामोडी ह्या फक्त सिनेमातल्या नटांच्याच आयुष्यात घडत असतात, ह्याचा पुरावा म्हणजे अण्णासाहेबांचे आयुष्य!  मुलांना शिकवणे, मोठे करणे, आणि वेळेवर लग्न करुन देणे हे सगळं काही व्यवस्थित पणे पार पाडले. सध्या पण मिळणारी पूर्ण पेन्शन ते तर एका अनाथालयाला दान देत आहेत गेल्या १५ वर्षापासुन. मग त्यांना नेमकं काय सांगायचं असेल?

रघु सरळ दवाखान्यात पोहोचला. अण्णासाहेबांच्या शेजारी जाऊन उभा राहिला. श्वेता पण काळजीयुक्त नजरेने पहात होती. दादू, अरे अण्णांना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. तु बस इथे, मी जरा फ्रेश होऊन येते. रघु अण्णांना म्हणाला, मी आलोय. अण्णांनी डोळे उघडले आणि धडपडत उठुन बसले. रघुने नर्स ला बोलाउन कॉट सरळ पोझिशन मधे म्हणजे बसण्याच्या पोझिशन मधे करायला सांगितली. नर्स गेली आणि अण्णा रघुला म्हणाले, बेटा मला तुला जे काही सांगायचं आहे ते सध्या जगात जिवंत असलेल्या व्यक्तींपैकी फक्त एकाला ठाउक आहे, आणि ती व्यक्ती म्हणजे मी. आणि ही गोष्ट तु कोणालाही सांगणार नाहीस ह्याचे वचन दे. रघुने हळूवार पणे त्यांच्या सुरुकुतलेल्या हातांवर हात ठेवला, आणि हलकेच हात दाबला, एक अश्युअरन्स न बोलताच कन्व्हे केले.

अण्णा सांगु लागले, ही गोष्ट आहे साधारण ६० वर्षा पुर्वीची. १९४६ साल असावे.  आमच्या आबांचा शेतात साप चावुन मृत्यु झाला. तसे म्हंटले तर आबांचे काही हे मृत्युचे वय नव्हते. आबा म्हणजे अण्णासाहेबांचे वडील. एक  नावाजलेले शेतकरी, गावचे वतनदार. सहा फुट उंचीचे धिप्पाड आबा म्हणजे मालगुजार. भरपूर माय जमवलेली. पण शेवटी दैवापुढे कोणाचे काय चालते? अण्णा सांगत होते, आणि रघु कुठेही त्यांना न टोकता ऐकत होता.

तर झाले असे, की आबांच्या मृत्यु नंतर त्यांच्या अस्थी घेऊन मी आणि तुझा नरु काका , गेला बिचारा तो पण ! बनारसला निघालो. आधी नागपूर स्टेशनल पोहोचलो आणि बनारसचे तिकीट काढले. प्रवासात जायचे म्हणजे एक वळकटी त्या मधे अंथरायची पांघरायची चादर, आणि एक धोतरजोडी – कुर्ता.  अस्थी एका पितळेच्या कडीच्या डब्यात घेतल्या होत्या. तर हा सगळा लवाजमा घेऊन आम्ही थर्डक्लास च्या डब्यात कसे बसे शिरलो. त्या काळी फारशी गर्दी नसायची ट्रेन मधे आम्ही दोघेही खिडकी जवळची जागा धरून बसलो.  ट्रेन निघाली, पाच सहा तास झाले, अजुनही जबलपूर आले नव्हते, पण आमचे मात्र डोळे लागायला लागले. वळकटी उघडुन सतरंजी अंथरली आणि दोन बर्थ च्या मधल्या जागेत आडवे झालो. पितळेचा चकचकीत अस्थींचा डबा शेजारीच ठेवला होता. आमचा डॊळा लागला आणि जाग आली तर सतना स्टेशन आले होते. आम्ही धडपडून उठलो आणि आपल्या अंथरुण पांघरुणांच्या घड्या करून पुन्हा वळकटी बांधुन तयार झालो. थोड्याच वेळात अलाहबाद आले आम्ही आपले सामान आवरुन उतरण्याची तयारी करु लागलो, तर पितळेचा डबा कुठेच दिसेना? आता काय करायचे? इकडे तिकडे शोधला, पण काही कुठे सापडला नाही. बहूतेक चोराला वाटले असावे की सोन्याचे दागिने वगैरे असतील डब्यात म्हणुन इतके सांभाळत होतो आम्ही, आणि म्हणुनच तो डबा चोरला असावा.

काय करावे काही सुचत नव्हते, शेवटी तुझ्या नरु काकाला म्हंटले, नऱ्या कोणाला सांगशिल तर खबरदार, तंगडं मोडीन तुझं. आपली दोघांचीही चूक आहे, तेंव्हा आपणच निस्तरायची. तसेच घाटावर गेलो, आणि पंडीतजींना झालेली घटना सांगीतली. पंडीतजी म्हणाले, आपण दर्भाच्या अस्थी करून करु या विसर्जन, थोडा जास्त खर्च होईल, पण  तुम्ही काळजी करु नका. तर शेवटी एकदाच्या नसलेल्या अस्थींचे विसर्जन करुन आम्ही परत गावी आलो.

तर तुला आज हेच सांगायला बोलावले की माझ्या अस्थी जपून घेऊन जा, रस्त्यात हरवु नकोस, आणि व्यवस्थित विसर्जन कर. सांग्रसंगीत पूजा करून मग नंतरच विसर्जन कर अस्थींचे. आणि अण्णासाहेबांनी डोळे मिटले. रघुच्या चेहेऱ्यावर किंचीत हसु आले, पण डोळे मात्र पाण्याने डबडबले होते, तो तसाच  अण्णांचा निर्जिव हात हातात धरुन  बसुन राहिला. ..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

4 Responses to अस्थी..

  1. Mahesh Gauri says:

    Sundar goshta aahe hi

  2. Hemant says:

    “……….. कोणाला सांगशिल तर खबरदार, तंगडं मोडीन तुझं.!!” best……. at last breath…. kaka best!

  3. Nachiket Mehendale says:

    Tumache sarvv blogPosts ateeShay apraTim ahet..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s