
Pic from internet
गाणी ऐकायला कोणाला आवडत नाहित? मला पण काही गाणी मला आवडतात म्हणण्यापेक्षा काही गाणी माझ्याशी कान गोष्टी करतात. एखाद्या प्रसंगाच्या पुनःप्रत्ययाचा आनंद / दुःख देतात. जेंव्हा एखादं गाणं रेडीओवर अनपेक्षित पणे लागतं तेंव्हा इंटर्नली वायर्ड ब्रेन त्या गाण्याशी निगडीत व्यक्तीची आठवण करुन देतं- त्या गाण्याशी जोडल्या गेलेला आयुष्यातला प्रसंग आठवतो- कधी बरा, तर कधी वाईट.
माझी आजी होती , वय अंदाजे ७४ असावे, कधी आई कधी चिडली की बरेचदा ” असा मी काय गुन्हा केला हे गाणं गुणगुणायची, किंवा बरेचदा तर ” जन पळभर म्हणतील हाय हाय.. ” हे गाणं ती म्हणायची, आणि मग आईचा पारा अजुन चढायचा, आणि आजी मात्र गालातल्या गालात हसत रहायची. आम्हाला मजा वाटायची . परवाच एक गाणं लागलं होतं, “हिरव्या साडीला पिवळी किनार गं, आज कडूलिंबाला आला बहार गं”, हे गाणं पण आजीच्या आवडीचे , मुड छान असला की हे गाणं गुणगुणायची, मी मांडीवर डॊकं ठेउन झोपलो, की तिला खुप आवडायचं आणी मग हमखास हे गाणं म्हणायची. गाणं लागलं होतं, भर दुपारी ड्रायव्हिंग करतांना, एकदम आजी आठवली आणि उदास वाटायला लागलं. शेवटी गाडी थांबवुन टपरीवर एक चहा मारला आणि पुढे निघालो.
सांज ये गोकुळी…. हे गाणं लागलं की मला माझ्या मुलीचे लहानपण आठवतं, आणि उगीच मन हळवं होतं. मुलीला झोपवायला सौ. हे गाणं म्हणायची. सौ चा आवाज पण खुप छान आहे, त्यामुळे ऐकायला बरं वाटायचं. मोठ्या मुलीने कधी झोपायला फार त्रास दिला नाही, गाणं म्हणणं सुरु केलं की दोन मिनिटात शांत झोपायची.पण धाकटी मात्र अगदी अर्धा तास गाणं आळवल्यावर पण टक्क जागी असायची. पाळण्याला झोका देऊन तिचे हात दुखुन यायचे , शेवटी अगदी धापा टाकत गाणं म्हणत रहायची. बरं मुलगी पण इतकी हुशार की आई शिवाय दुसऱ्या कोणी झोका दिलेला तिला लगेच समजायचा आणि रडणं सुरु करायची. काही गोड आठवणींचा उजाळा मिळतो काही गाणी लागली की.
माझी एक बाल मैत्रीण आहे माया म्हणुन, आवाज खरंच खुप छान आहे तिचा, गाणं पण शिकली आहे. लहानपणी कोणी तिला गाणं म्हणायला सांगितलं की तिचे एक गाणे ठरलेले होते, ते म्रहणजे “रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली ” हे गाणं म्हणायची. आजही ते गाणं लागलं रेडीओ वर की मायाची आठवण येते. पण बाईसाहेबांनी गाण्यात करीअर न करता चक्क दोन विषयात पिएचडी केली, तिसऱ्या विषयातली सुरु आहे.
तेंव्हा नुकताच हम आपके है कौन सिनेमा लागला होता. सगळी गाणी सारखी वाजत असायची , टीव्ही, रेडीओ, लोकांच्या कार मधे….. माझी मुलगी अगदी दोन तीन वर्षाची असेल, तेंव्हा आमच्याकडे कार नव्हती, दिदी तेरा देवर दिवाना हे गाणं लागलं, की ती म्हणायची, बाबा, आपण पांढरी मारुती कार घेऊ, आणि त्यामधे बसुन हे गाणं लावायचं. २५ वर्षापुर्वी कार म्हणजे लक्झुरी होती, नेसेसिटी नव्हती. पण नंतर पहिली कार घेतल्यावर ह्या गाण्याची कॅसेट आवर्जुन लावायचो, पण तो पर्यंत बाईसाहेबांचा या गाण्यातला इंटरेस्ट संपलेला होता. पण आजही हे गाणं लागलं की ती जुनी लहानशी मुलगी, आणि गळ्यात पडुन , आपण कार घेऊ बाबा म्हंटल्याचा प्रसंग डोळ्यापुढे उभा रहातो.
आम्ही ठाकरं ठाकरं, ….. हे गाणं किंवा डॊंगर काठाडी ठाकर वाडी हे गाणं म्हणजे पण मोठ्या मुलीच्या लहानपणाशी जोडल्या गेलं आहे. दुध पिण्याचा ” कार्यक्रम” असला ( कारण खुप त्रास द्यायची दुध प्यायला – म्हणुन कार्यक्रम) की आधी ह्या गाण्याची कॅसेट लावावी लागायची. गाणं सुरु झालं, की हिचे डोळे शुन्यात, आणि दोन मिटात दुधाची बाटली रिकामी व्हायची. तसेच ती रडायला लागली, आणि हे गाणं लावुन, बघ, ठाकरं ठाकरं लागलंय म्हंटलं की एकदम चुप बसायची.
प्रत्येकाच्या भावंडांमधे एक तरी चांगला आवाज असुन गाणं म्हणणारा असतोच. माझ्या एका मामेबहिणीला , नदी नाले ना जाओ शाम , पैंया पडू हे गाणं आणि मै जो होती राजा, बेला सवेरिया हे गाणं आवडायचं ( तेंव्हा माझं वय फार तर १०-१२ असेल). सारखी गुणगुणत असायची.आजही हे गाणं लागलं की तिची आठवण येते. तिचा पण आवाज खरंच खुप छान आहे. गाणं शिकल्याने गाणं म्हणतांना सुद्धा ताला सुरात म्हंटले जाते.
काही गाणी चक्क एखाद्या जागेशी जोडली जातात. आम्ही महाबळॆश्वर ला गेलो होतो, महाबळॆश्वर ला रात्रं दिवस सारखी महम्मद रफी ची गाणी सगळीकडे सुरु असायची. एक रोमॅंटीक वातावरण तयार झालेलं असायची सगळी कडे. बहारो फुल बरसाओ, पासुन तर हुस्नवाले तेरा जवाब नही पर्यंत सगळी गाणी सुरु असायची. आजही रोमॅंटीक मुड साठी बेस्ट गाणी म्हणजे महम्मद रफी हे समीकरण पक्कं डोक्यात बसलेलं आहे. कधी एखाद्या बेसावधपणी रफी ची गाणी लागली जीव उगिच हळवा होतो, आणि ती महाबळॆश्वरची ट्रिप आठवते.महम्मद रफी ची गाणी ऐकल्यावर आपला हनीमुन आठवणार नाही असा कोणी असेल असे मला तरी वाटत नाही. काही सुखद आठवणीची आठवण करुन देणारी गाणी म्हणजे म्हणजे महंमद रफी ची गाणी !
माझा अविनाश जोशी नावाचा एक लहानपणचा मित्र आहे . अगदी हुबेहुब आवाज काढायचा मुलीचा. त्या काळी ऑर्केस्ट्रा चे फॅड होतं. गणपती, देवी सगळ्या उत्सवांमधे ऑर्केस्ट्रा चे गाण्याचे कार्यक्रम व्हायचे. स्पेशली, ते माळ्याच्या मळ्य़ामंदी कोण गं उभी हे गाणं, तर अगदी अप्रतीम म्हणायचा, प्रत्येक वेळी त्या गाण्याला वन्स मोअर ठरलेला. डोळॆ बंद करुन त्याचं गाणं ऐकलं तर अजिबात लक्षात यायचं नाही की तो अव्या गाणं म्हणतोय म्हणुन. परवाच हे गाणं रेडीओवर लागलं होतं, आणि अव्या आठवला. 🙂 गेली कित्त्येक वर्ष जरी संवाद नसला तरी पण आपण आपल्या बाल मित्रांशी कायम जोडलेले असतो.
पाऊस म्हंटलं की कांदा भजी आठवायला हवी पण माझं तसं नाही. एकदा कंपनीच्या कामानिमित्य खुप वर्षांपुर्वी आसाम मधे गेलो होतो,तिनसुखिय जवळच्या एका प्लायवुड फॅक्टरीत जायचं म्हणुन कार ने निघालो होतो. धो धो पाऊस सुरु होता, समोरचे अगदी दहा फुटावरचे पण दिसत नव्हते. पण समोरचे काही दिसत नाही म्हंटल्यावर मात्र आम्हाला एका रोडसाईड हॉटेल मधे थांबावे लागले. धो धो पाऊस पडत होता, संध्याकाळची ७ ची वेळ असेल, त्या हॉटेल वाल्याने बिटल्स ची कॅसेट लावली होती. धुंद वातावरण, पावसाची रिपरिप, आम्ही बसलो होतो व्हरांड्या मधे , ओल्ड मॉंक , पोर्क रोस्ट आणि बिटल्स! क्या कहने! अजुनही बिटल्स ची गाणी लागली की तो दिवस आठवतो.
ह्या अशा गाण्य़ांच्या आठवणींबद्दल लिहित बसलो, तर बरंच काही आहे लिहीण्य़ासारखे, पण आता थांबतो इथे. इती लेखन सीमा.
आपला आजचा लेख माझ्या अशा अनेक आठवणींना उजाळा देणारा आहे. लग्नाच्या तसेच इतर अनेक शुभ प्रसंगी अशी दुःखद गाणी लावून रंगाचा बेरंग करण्याचा ‘प्रयास’ बरेच अज्ञानी लोक करतात.
गाण्यांशिवाय एक आठवले. आपल्या बहुतेक लग्नात रुखवतात अनेक गोष्टी सजवून ठेवल्या जातात. मी एका लग्नाला गेलो असताना रुखवतात नवरदेवाच्या नावाची पाटी तेथे खास बनवून ठेवलेल्या कागदी बंगल्याला लावलेली दिसली. – ” विष्णू स्मृती “. मी पटकन कुणाच्या तरी कानात सांगितलं आणि ती पाटी क्षणार्धात काढून टाकली गेली.
मंगेश नाबर
सप्रेम नमस्कार
आजची आपली पोस्ट वाचनीय आहे तसेच माझ्याही असंख्य आठवणी त्यामुळे उचंबळून आणणारी आहे. माझी ज्येष्ठ बहीण जे जे गाणे म्हणत असे आणि त्याची साथ मी पेटीवर करत असे ते कुठल्याही प्रसंगाला साजेसे असे निवडलेले असायचे. त्यामुळे असा प्रसंग आला नाही.
आज काय कालही वाचनसंस्कृतीची वाट लागलेली असताना समयसूचकता हा गुण लुप्त पावलेला आहे की काय ?
निखिल शाळिग्राम
किती छान लिहिलंय, वाचून अनेक आठवणी जाग्या झाल्या.