एका लग्नाची गोष्ट

पण मला इतक्यात लग्नच करायचं नाही. सोज्वळ अगदी ठामपणे म्हणत होती. गेले अर्धा तास लग्न या विषयावरच दोघांचाही संवाद/विसंवाद सुरु होता.

अगं पण नाही का म्हणतेस? चांगली २५ वर्षाची झालीस, आता नाही तर कधी करणार मग लग्नं? तुझ्या वयाची असतांना तुझ्या आईला तु झाली होती, चक्क दोन वर्षाची होती तु.

केलं असतं हो बाबा, पण चांगला मुलगाच मिळत नाही नां, मी तरी काय करु? कुठल्याही मुलाशी लग्न करु का?

मी तसं म्हंटलं आहे का? चांगल्या मुलाशीच कर म्हणतोय ना? एखादा पाहुन ठेवला असेल तर सांग, आमची काही हरकत नाही, आम्ही करुन देऊ तुझे लग्नं.

तसे नाही हो बाबा. आता पुन्हा ऑन साईटला बहुतेक लॉंग टर्म जावे लागेल, मग आता लग्न केले तर करीअर ची वाट लागेल.

कशी काय वाट लागेल? आम्ही एक मुलगा बघुन ठेवलाय, आपल्या सुमामावशीच्या नणंदेचा मुलगा आहे, कॅलिफोर्नियाला असतो. सध्या आलाय भारतात, कालच सुमा मावशीचा फोन होता, म्हणत होती, एकदा दोघांना भेटू दे . चांगला दोन महिने आहे भारतात तो. तेंव्हा आता जास्त वाव विवाद नको, येत्या शनीवारी त्याला भेट, घरी नको असेल, तर बाहेर भेट कॉफी हाऊस मधे. भेटल्यावर जर आवडला नाही तर नाही म्हण, आम्ही जबरद्स्ती करणार नाही- पण एकदा भेट, नाही तर  मावशीला वाईट वाटेल बघ. आम्ही पण मुलगा पाहिला आहे, सुमामावशीच्या घरी गेलो होतो ना, तेंव्हाच तिथे हा पण आला होता. अगदी निर्व्यसनी आणि व्हेजीटेरिअन आहे मुलगा. अंडही खात नाही तुझ्या अपेक्षेप्रमाणे. अगदी तुला शोभेल असा आहे. एकदा भेट तरी.

सोज्वळ अगदी नावाप्रमाणेच सोज्वळ होती. शाळा, कॉलेज मधे अभ्यास एके अभ्यास एवढंच काय ते माहिती होतं तिला. कॉलेज संपलं आणि कॅम्पस मधेच एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी लागली आणि पहिल्याच वर्षा अखेरीस ऑन साईट जायचा चान्स मिळाला. आज पर्यंत मुंबई बाहेर कुठेही एकटी न गेलेली, पण अगदी कॉन्फिडन्स ने मी जाईन एकटी, तुम्ही काळजी करु नका म्हणुन आई बाबांना धिर देणारी, जेंव्हा विमान तळावर डिपार्चर गेट वर पोहोचली, आणी आत जायची वेळ आली, तेंव्हा मात्र डोळ्यात पाणी भरून आलं होतं, मागे वळुन आई बाबांच्या कडे तिने पाहिले, तर तिला दिसले की बाबांचे पण डोळे पाण्याने डबडबले आहेत, पण मन हळवं होऊ न देता ते पाणी परतवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसे म्हंटलं तर आज पर्यंत काही मुलं बघुन झाली होती, पण कुठलाच मुलगा आवडला नव्हता, कोणी सिग्रेट ओढतो म्हणुन नको, तर कोणी नॉनव्हेज खातो म्हणुन नको. तर हे असे सुरु होते. पण सुमा मावशीने सुचवलेला मुलगा म्हंटल्यावर तिला पण नाही म्हणवेना, लाडकी मावशी होती ना सुमामावशी. शेवटी एकदाचं कॉम्प्रोमाईज झालं, आणि मुलाला भेटायला तयार झाली एकदाची.

प्रथमेश ! गणेश चतुर्थीला जन्म झाला म्हणुन प्रथमेश नाव ठेवले आजी ने मोठ्या आनंदाने. नाही तर इतक्या वर्षानंतर घरात आनंद घेऊन आला म्हणुन आनंद नाव ठेवायचे ठरले होते आधी, पण आजीपुढे कोणाचे चालते का? तसेही हे नाव पण छानच आहे म्हणा, पण प्रथमेशची आई मात्र अजुनही आनंद म्हणते त्याला. सर्वसाधारण मुला प्रमाणेच , इंजिनिअर झाल्यावर एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीवर लागला. दोन वर्ष भारतात काम केल्यावर नोकरी सोडली आणि एम एस करायला कॅलिफोर्नियाला गेला. एम एस केल्यावर तिकडेच नोकरी मिळाली, आणि आता गेली पाच वर्ष तिकडेच रहातो. शिक्षण सुरु असताना सारखे भारतात येणे परवडत नव्हते म्हणुन आला नाही, नंतर नोकरी नवीन म्हणुन सुटी मिळत नव्हती. पण आता मात्र चांगली दोन महिन्यांची सुटी घेऊन भारतात आला होता तो.

अमेरिकेत एकटे रहाणे म्हणजे खरंच कंटाळवाणे वाटायचे प्रथमेशला. सगळ्यात मोठे कारण म्हणजे खाण्याचे होणारे हाल. फ्रेंच फ्राईज आणि वेजेस किती खायच्या ? केक ला सुद्धा अंड्याचा वास येतो म्हणुन ती पण खात नसे. क्रॉसेंट्स, डॅनिश, वगैरे सगळ्या ब्रेडच्या प्रकारांमधे अंडे असल्याने ते पण खातांना त्रासच व्हायचा, पण बरेचदा नाईलाज म्हणुन काही तरी खायचं आणि दिवस काढायचे सुरु होते. जवळच एक इंडीयन स्टॊअर होतं, आणि जातांना घरुन प्रेशर कुकर नेल्याने, घरीच स्वयंपाक करणे सुरु केले. सकाळी भाजी पोळी, चा डबा सोबत करून घ्यायचा आणि संध्याकाळी घरी आल्यावर पुन्हा भात वगैरे काही तरी.. पण आता लग्नाला तयार होण्यामागचा सगळ्यात मोठा इन्सेंटीव्ह- जेवायला तरी व्यवस्थित मिळेल हाच .सोज्वळ चा फोटॊ पाहिला होता, आणि त्याला पण आवडला होता. आता भेटण्याची उत्सुकता पण होतीच.

तर शेवटी सुमामावशी बरोबर बोलणं झालं बाबांचं आणि भेटायची वेळ ठरली. सी सी डी मधे! एकतर खुर्च्या कम्फर्टेबल असतात , त्यामुळे एखादा तास अगदी आरामात गप्पा मारता येतात. सोज्वळ केवळ बाबांच्या आग्रहामुळे जायला तयार झाली होती. लवकर त्याला कटवुन परत येऊ घरी आणि मस्त पैकी विकएंड एंजॉय करु असं प्लानिंग करुनच ती घरातुन निघाली.

कॉफी हाऊस ला ठरलेल्या वेळेवर पोहोचली आणि आणि तिला तिथे समोरच एका कोपऱ्यात प्रथमेश बसलेला दिसला. फोटो आधीच पाहिलेला असल्याने पटकन ओळखता आले. एक वार्म हास्य चेहेऱ्यावर होते त्याच्या. त्याने हात दाखवला, आणि सोज्वळ त्याच्या दिशेने चालु लागली आणि समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली. लवकर कटवायचा प्लान तयार होताच. तिने आजुबाजुला नजर टाकली.

कधी नव्हे ती आज कॉफी हाऊस मधे खूप गर्दी होती. उजवी कडल्या टेबलवर तीघं बसले होते, त्यांचे काही तरी नविन बिझिनेसच्या बद्दल बोलणे मोठ्या आवाजात सुरु होते, मधेच टाळी देणे, आणि आजुबाजुला लोकं बसले आहेत त्यांनाही काही बोलायचे असेल ह्याची अजिबात जाणिव दिसत नव्हती. तिकडे दुर्लक्ष करुन प्रथमेश बरोबर बोलणे सुरु केले.

शेजारच्या टेबलवरच्या लोकांमुळे अजिबात बोलता येत नव्हते, त्यांचे मोठमोठयाने हसणे, ओरडणे , डीस्कशन्स सुरु होते. विषय बहुतेक नवीन कंपनी सुरु करणार तिचे नाव काय असावे हा होता.

प्रथमेश काउंटरवर गेला आणि ह्या लोकांना आवाज कमी करण्याची विनंती करा म्हणुन मॅनेजरला म्हणाला, म्हणाला गेले तीन तास हे लोकं इथे बसुन डिस्कशन करताहेत, तुम्ही म्हणता म्हणुन मी त्यांना विनंती करायला जातो, पण ते ऐकतिल की नाही ह्याची खात्री देता येत नाही.

त्या लोकांच्याही लक्षात आले होते की प्रथमेशनेच कम्प्लेंट केली आहे म्हणुन मॅनेजर आलाय ते. पण आवाज कमी न करता, त्यांचे नवीन कंपनी सुरु करायची आहे, वेब साईट तयार आहे, फक्त कंपनीचे नाव काय ठेवावे, या विषयावर अजुन मोठ्याने बोलणे सुरु झाले. प्रथमेश पुन्हा स्वतः त्या टेबलवर जाउन आवाज कमी करा म्हणुन विनंती करायला गेला, पण तिघांनीही त्याची खिल्ली उडवणे सुरु केले, प्रथमेश आपल्या टेबलवर परत आला, कपाळावर आठ्या, डॊळ्यात राग, अरे लोकांना सिव्हिक सेन्स का नसतॊ? दुसरा टेबल पण रिकामा नसल्याने प्रथमेश- सोज्वळला त्याच टेबलवर बसुन गप्पा माराव्या लागत होत्या.

प्रथमेश तसा एक्स्ट्रोव्हर्ट असल्याने विषयाला काही कमतरता नव्हती, शेजारच्या लोकांच्या आवाजाने दुर्लक्ष करुन दोघेही संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. अगदी कॉलेज च्या दिवसापासुन ते आजच्या दिवसापर्यंत म्हणजे कंपनी, कामाचे स्वरुप , सिनेमा, खाण्यापिण्याच्या सवयी, घरचे लोकं, घरी कोण कोण आहे? वगैरे अशा असंख्य गोष्टींबद्दल बोलायचं होतं प्रथमेशला. घरच्या टिव्ही वर कुठले चॅनेल लावायचे या बद्दल उगीच रोजचा वाद नको 🙂 पण शेजारच्या टेबलवरुन दोघांवर केल्याजाणाऱ्या कॉमेंट्स कडे दुर्लक्ष करुन गप्पा सुरु थेवणे अवघड होत होते.

शेवटी जवळपास तासाभराने शेजारच्या टेबलवरच्या तिघांचेही त्यांच्या नवीन कंपनीचे नाव काय ठेवायचे या बद्दल एकमत झाले. प्रथमेश ने मोबाइल उचलला, आणि सोज्वळला म्हणाला, मला पाच मिनिटं दे, आणि त्याने मोबाईल उचलला आणि काही तरी करु लागला. सोज्वळला खुप राग आला, अरे मी इथे भेटायला बोलायला आली आहे, आणि तु इथे मोबाईल घेऊन बसला आहेस? तिच्या चेहेऱ्यावर राग दिसत होता. पण तिकडे दुर्लक्ष करुन प्रथमेशने आपले काम सुरु ठेवले. साधारण पाच मिनिटानंतर मोबाईल खाली ठेवला . सोज्वळ चिडली होती, म्हणाली, एवढं काय महत्वाचं काम होतं? तर त्याने मोबाईल समोर ठेवला. आणि सोज्वळ एकदम हसायला लागली, आणि तिच्याबरोबर प्रथमेश पण, एवढ्या मोठ्याने की ते तिघे पण एकदम शांत झाले आणि ह्यांच्याकडे बघु लागले. प्रथमेश ने त्या लोकांनी जे कंपनीचे नाव चार तास डिस्कस करुन ठरवले होते ते डोमेन नेम डॉटकॉम, डॉट्नेट बुक केले होते , म्हणजे त्यांना आता पुन्हा मिटींग करुन नवीन नाव शोधावे लागेल, किंवा प्रथमेश कडुन विकत घ्यावे लागेल. स्मार्ट बॉय.

सोज्वळ ने हात समोर केला, प्रथमेशने हात हातात धरला, आणि दोघेही कॉफी हाउस च्या बाहेर पडले, घरी सांगायला की आम्ही लग्नाला तयार आहोत म्हणुन….

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

1 Response to एका लग्नाची गोष्ट

  1. I am extremely impressed along with your writing abilities, Thanks for this great share.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s