एकांत.

घरा मधे इनमिन तिन माणसं. राजाभाऊ, रमा आणि राहुल. वन बिएच के म्हणजे फार लहान नाही मुंबईच्या मानाने. एक हॉल  , किचन,   एक बेडरुम आणि सोबतच एक ३ बाय ५ चे लॅटबाथ हे हॉल ला लागुन, असे की हॉल मधे झोपणाऱ्याला आणि बेडरुम मधे झोपणाऱ्याला असेस करता यावे!बेडरुम मधे झोपलेल्या व्यक्तीला जर रात्री टॉयलेटला जायचं काम पडलं, तर हॉल मधुनच जावे लागायचे. तसे राहूल एकटाच हॉल मधे झोपायचा, त्यामुळे त्याला कधीच ह्या गोष्टीने आपली प्रायव्हसीएकांत जाते असे वाटले नव्हते.

तसे म्हंटले तर मुंबईच्या मानाने “चांगलाच” मोठा फ्लॅट! ह्याच फ्लॅट मधे गेली ३२ वर्ष राजाभाऊ , बायको रमा आणि मुलगा राहूल राहत होते. तिघांसाठी फ्लॅट पुरेसा वाटायचा त्यांना, त्यामुळे त्यांनी कधी मोठा फ्लॅट घ्यायचा विचारच केला नव्हता.  कशाला  घ्यायचा? खाली उतरलं की बस स्टॉप रस्ता ओलांडला की स्टेशन, भाजी, दुकानं, सगळं काही अगदी हाकेच्या अंतरावर.

बिल्डींग मधले बरेच लोकं आपली रहाती जागा विकुन मोठ्या जागेच्या लोभाने  विकुन आलेल्या पैशातुन  तिकडे डोंबिवली, विरार कडे मोठा फ्लॅट घेऊन रहायला गेले होते, पण राजाभाऊ मात्र गिरगावातच ठाण मांडून बसले होते, काहीही झालं तरी हा भाग सोडायचा नाही हे अगदी मनावर पक्के ठसले होते.

हॉल मधे एका कोपऱ्यात कपाट, त्याच कपाटात एक दार उघडले की त्याचे टेबल व्हायचे, आणि ह्याच टेबल वर बसुन राहुल ने आपले इंजिनिअरींगचा अभ्यास पुर्ण केला होता. हॉल मधे असलेला सोफा कम बेड चा बेड करुन त्यावर रात्री झोपायचं . लहानपणापासुन इथे राहिल्याने राहूलला पण ह्या जागेबद्दल एक आत्मियता होती. प्रत्येक सण गाजायचा या भागात. गणपती , शिवजयंती, दिवाळी, इद, क्रिसमस सगळे सण धुमधडाक्यात साजरे व्हायचे.  आता चांगला इंजिनिअर झाला, मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला लागला, पण त्यालाही कधी ही जागा सोडून दुसरीकडे जायची इच्छा होत नव्हती. तसेही म्हणे ही बिल्डींग आता रिडेव्हलपमेंटला जाणार, तेंव्हा मोठा म्हणजे दोन बिएचके चा फ्लॅट देण्याचे बिल्डरने कबुल केले होते. पण काही लोकं अजुनही रिडेव्हलपमेंट्ला तयार नव्हते.

तर होता होता राहूलची नोकरी पण झाली चार पाच वर्षांची आणि आता लग्नासाठी पण मुली सांगुन येऊ लागल्या. समोरच्याच बिल्डींगमधे रहाणारी सुबक ठेंगणी मेघा त्याला आवडायची, तिलाच एक दिवस विचारले, की लग्न करतेस का ? आणि ती हो म्हणाली, अन झाले लग्न! राहूल मेघा चा संसार त्याच राजाभाऊ, – रमाच्याच वन बिएचके मधे सुरु झाला.

फरक फक्त एकच पडला, राजाभाऊ, आणि रमा ची रवानगी बेडरुम मधुन हॉल मधे झाली, आणि राहुल – मेघा  ला बेडरुम मिळाली. सोफा कम बेड वर दोघांना एकत्र झोपणे अवघडल्यासारखे व्हायचे, म्हणून भैय्यासाहेब खाली चटई वर झोपायचे.तसाही मुंबईकर हा स्वभावतःच कुठल्याही परिस्थितीशी जुळवुन घेणारा. त्यामुळे ही परिस्थिती पण फारशी कठीण वाटली नाही त्यांना जुळवुन घ्यायला. रात्री कधी तरी रोहन, मेघा ला पण टॉयलेट वापरायला बाहेरच्या खोलितुन जावे लागायचे, तिकडे राजाभाऊ,- रमा झोपलेले असायचे, पण कोणाचाच त्याला आक्षेप नव्हता.

राहुलचा फाईव्ह डेज विक- म्हणजे शनिवार रवीवार सुटीचा दिवस. ह्या दोन दिवसात मात्र थोडं अनिझी वाटायचं. दिवसा बेडरुम मधे जाणे बरे वाटायचे नाही, बरेचदा राहुल बाहेर टिव्ही पहात बसला की राजाभाऊ, बेडरुम मधे पलंगावर जाऊन पडायचे, कधी तरी गाढ झोप लागली मग सरळ चार पाच तासांची निचंती! आणि नंतर मग राहुल, मेघा रमा वगैरे हॉल मधे बसुन टिव्ही पहात बसायचे. एवढा चांगला सुटीचा दिवस असा वाया गेला की राहूल ची चिडचिड व्हायची. पण…

आज शनीवार होता. राजाभाऊ, सकाळीच कुठे तरी गेले होते, आणि दुपारी ११ वाजता घरी परत आले ते हातात दोन तिकिटॆ फडकवत. राहूल- मेघा ही घ्या दोन तिकिटे आजच्या रात्रीच्या नाटकाची. ८ ते ११ चा शो आहे आज, खूप गाजलेले नाटक आहे म्हणतात. सगळी पुण्याची मंडळी आहेत कामं करणारी. राहूल ने तिकिटे हातात घेतली, आणि मेघाचा आनंदी चेहेरा पाहिला, आणि त्याला बरं वाटलं, की बाबांना पण आपली होणारी कुचंबणा समजते आहे तर, त्यांनाही समजतंय की आपल्याला एकांत हवाय – अगदी दिवसा सुद्धा. नुसता मेघाचा हात हातात धरून बसायला, एकत्र बसुन कार्टून्स ची पुस्तकं बघायला, कविता वाचायला, आणि बरंच काही करायला. शेवटी सेक्स शिवाय इतरही गोष्टी असतातच की.

म्हणता म्हणता दिवस संपला आणि रात्रीचे ७ वाजले. राहुल – मेघा दोघेही तयार होऊन निघाले बाहेर. राजाभाऊ,टीव्ही वरच्या बातम्या पहात बसले होते. राजाभाऊंनी पण टीव्ही बंद करुन त्यांना बाय करायला बाल्कनीत उभे राहिले. रोहन – मेघाचे ते ठिपके लहान लहान होऊन दूर जाईपर्यंत त्याकडे पहात बसले होते. राहुल समोरच्या वळणावरुन वळला, आणि दिसेनासा झाल्यावर मात्र ते घरात शिरले. रमा चा किंचित थकलेला चेहेरा समोर दिसला, केस थोडे कानावर पांढरे झालेले, पण सौंदर्यात मात्र अगदी काडीचाही फरक पडला नव्हता. रमा लग्नानंतर जशी दिसायची, तशीच अजुनही दिसत होती, उलट वयोमानामुळे एक मॅच्युअरिटी आली होती तिच्या चेहेऱ्यावर. वयोमानामुळे पडलेल्या किंचित सुरकुत्या सौंदर्यात भरच घालत होत्या रमाच्या. ५४ वर्षांची झाली, पण अजुनही ४०शीत असल्यासारखी दिसते, मनातल्या मनात कौतुकाने पुटपुटले भैय्यासाहेब.

राजाभाऊंना चहा आवडतो, म्हणून रमा चहा करायला उठली आणि किचन मधे जायला निघाली. राजाभाऊनी तिला थांबवले, म्हणाले, असु दे.. आपण सुद्धा आज बाहेरच जेवायला जाऊ या, तु बस इथे शेजारी. समोर टिव्ही वर काही तरी कार्यक्रम सुरु होता दोघेही निःशब्द बसले होते, भैय्यासाहेबांच्या खांद्यावर रमाची मान टेकवलेली, डोळ्यात किंचीत अश्रू , तर बरीच साफल्याची छटा! त्यांचा हात रमाच्या खांद्यावर होता.  टिव्हीचा आवाज बंद होता. समोर चित्रं दिसत होती, आणि त्याकडे दोघांचेही लक्ष नव्हते. हलकेच रमाचे डोके बाजुला करुन राजाभाऊ, उठले, आणि सकाळी आणून फ्रिज मधे ठेवलेला सायलीचा गजरा घेऊन रमा कडे आले. पळसाच्या पानात बांधलेला गजरा रमाच्या समोर केला. रमा ने ओंजळीत तो गजरा धरला आणि मोठा श्वास घेऊन त्याचा सुगंध आपल्या छातित भरुन ठेवण्याचा असफल प्रयत्न केला. राजाभाऊनी गजरा माळून दिल्यावर पुन्हा दोघेही सोफ्यावर बसले. दोघांनाही एकही शब्द बोलत नव्हते, पण संवाद साधल्याजात होता. शब्दाविण संवाद – दोघांनाही एकमेकांच्या मनातले विचार समजत होते. हलकेच खांदा दाबला , वेळेचं भान दोघांनाही नव्हतं. राजाभाऊंचे लक्ष घड्याळाकडे गेले. ९ वाजले होते, म्हणजे राहुल आणि मेघाला घरी यायला दोन तास शिल्लक आहेत तर अजुन.. समोरचा दरवाजा फक्त टेकवुन ठेवलेला होता.

राहुल – मेघा दोघेही थिएटर वर पोहोचले होते पण अजून  पुण्याहुन येणारी नाटक मंडळीची बस   आलेली नव्हती . दोन तास लोकं वाट पहात बसले होते. शेवटी समजले की बस घाटात बंद पडल्याने कलाकार आज येऊन शकत नाहीत, आणि त्यामुळे आजचे नाटक रद्द करण्यात येत आहे. सगळ्यांचे पैसे परत देण्यात येत होते. त्यांनी पैसे परत घेतले आणि समोरच्या हॉटेल मधुन जेवण पॅक करुन घरी निघाले, विचार केला की  घरी जाऊन आता सगळे बरोबरच जेऊ.

राहुल घरी पोहोचला. दाराच्या फटीतुन राजाभाऊ, आणि रमा सोफ्यावर बसलेले दिसले, रमा राजाभाऊंच्या हाताची उशी करुन त्यांच्या छातीवर कान लावुन बसली होती. मेघाचा हात त्याने हलकेच दाबला, मेघा पण शांतपणे आत काय आहे ते पाहुन बाजुला सरकली, आणि राहुल ला घेऊन पुन्हा पायऱ्यांकडे वळली. राहुलला एकदम काय करावं हेच समजलं नाही, भैय्यासाहेब – रमाची ती भाव समाधी पाहून हलकेच दार बंद करून मागे वळला, डोळे किंचित ओलावले होते, आणि त्याच्या मनात विचार आला,

” एकांत फक्त आपणच मिस करतोय का?”

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

15 Responses to एकांत.

 1. Vinayak Paranjpe says:

  खूप सुंदर!

 2. Aparna says:

  Mast post kaka.

 3. Anagha says:

  काका पुन्हा तुमचे लिखाण वाचायला मजा येते आहे. प्लीज लिहिते राहा !

  • लिखाणाची लय बिघडली की काय असे वाटत होते पोस्ट करतांना. शक्य होईल तेंव्हा पोस्ट करतोच. फक्त सारखे इकडे येऊन कॉमेंट्स वगैरे बघणे जमत नाही .

 4. Vabs says:

  speechless…. Khup Khup Khup Chan

 5. komal s. says:

  chan ahe lekh kaka

 6. Satish says:

  हृदयाला हात घालणारी कथा …. धन्यवाद

 7. pritikulk says:

  Waaah.mast….Wk fun manala bhidli…Madhye barech divas time post nahi….Miss kele …..

 8. pritikulk says:

  waah mastach…. madhye barech divas kahich post nahi.. khup miss kele.. pls post karat raha…

 9. Umesh says:

  MASTACH

Leave a Reply to Anagha Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s