संजय पाटील नुकत्याच घेतलेल्या बंगल्याच्या लॉन मधे खुर्ची टाकुन सकाळचे कोवळ उन खात पेपर वाचत बसले होते. आयुष्यभर मुंबईला नोकरी मधे घालवल्यावर त्यांनी सातारला हा बंगला विकत घेतला होता. रिटायर्ड झाल्यावर गावाकडे जाउन रहायचे हे आधीपासुनच नक्की केलेले होते. जेंव्हा त्यांनी हा चार बेडरुम्स चार बाथरुम भरपूर पार्किंग असलेला , आणि वेल मेंटेंड बगीचा असलेला बंगला, चारही बाजुला असलेले मेंदींच्या झाडाचे सहा फुटी कुंपण, असलेला हा बंगला पाहिला, तेंव्हा त्याच्या प्रेमातच पडले संजय देशमुख, आणि लगेच विकत घेऊन टाकला.
तर सकाळचं कोवळं उन्हात, चहाचा कप हातात घेउन, एफ एम रेडीओ वर जुनी गाणी ऐकत पेपर वाचण्याचा आनंद काही औरच! आता हा बंगला घेऊन त्यांना चार महिने झाले होते.रिटायर्ड आयुष्य एकदम मजेत सुरु जात होतं. साताऱ्याला बंगला घेतल्यावर खरं तर मुंबईच्या मित्रांनी वेड्यातच काढले होते, म्हणे आयुष्य मुंबईला गेल्यावर तिकडे गावाकडे कसा काय राहु शकणार आहेस तू? पण संजय मात्र एंजॉय करत होता, गावाकडचं आयुष्य!
शेजारच्य बंगला विक्रम पवारांचा. म्हणे, महाराजांच्या सैन्यात ह्यांचे पुर्वज सेनापती होते. अजूनही मानसीक दृष्ट्या ते त्याच काळात वावरत होते. दोन मुलं आणि ४ नातवंडं असल्याने बंगल्यात कायम खेळण्याचे , ओरडण्याचे आवाज सुरु असायचे. सगळे नातु चार ते ७ वर्ष वयातले. शेजारी म्हणून एकदा संजय त्यांना भेटायला गेला होता, गतवैभवाच्या पुसट खुणा अंगावर बाळगत त्यांचा बंगला दिमाखात उभा होता. हॉल मधे भिंतीवर लटकवलेले वाघाचे , रानडूकराचे मुंडके, तलवारी, ढाल भाले वगैरे डेकोरेशनसाठी वापरलेले होते. सगळ्या तलवारी बहूतेक रोज स्वच्छ करत असावे, कारण अजिबात गंजलेल्या दिसत नव्हत्या. एका कपाटात रिव्हॉल्वर्स, बंदुका वगैरे लावुन ठेवलेल्या काचे आड दिसत होत्या. विक्रम पवार आपलं घराणं कसं सरदारांचं आहे, आणि आम्ही कसे ग्रेट आहोत हे सांगतांना अजिबात थकत नव्हते. जुजबी ओळख करुन घेऊन संजय घरी परत आला, पण पुन्हा काही संबंध आला नाही. विक्रम चा आढ्यताखोर स्वभाव एकाच भेटीत लक्षात आला संजय च्या.
विक्रम च्या घरी चार नातू खेळत होते. खेळणे पण लाकडी तलवारी ढाली , आणि बंदुकांशी! शेवटी महाराजांच्या सैन्यात सेनापती होते ना पूर्वज, मुलांना पण तेच बाळकडू अगदी लहानपणापासुन. आता मुलांना लढवय्या बनवायचं होतं का ? ते त्यांनाच ठाऊक ! पण सगळे खेळ कसे मर्दानी! चार – ते सात वर्ष वयोगटातली ती पवारांची मुलं तलवार युद्ध खेळत होती. अरे एखाद्याला लागलं तर? उगीच काळजी वाटली देशमुखांना! पण पवार मात्र आपल्या जागेवर निर्विकार पणे बसले होते. सगळेच नातू, एकही नात नसल्याने, जनरली सगळी मुलं असलेल्या घरात असतो तसा गोंधळ सुरु होता.
आता पेपर जवळपास पूर्ण वाचून झाला होता. तेवढ्यात शेजारच्या बंगल्यातून एक बॉल येऊन पडला , पाठोपाठ एक क्रिकेटची बॅट, एक तलवार, मिसाइल प्रमाणे येऊन डोक्यावर आदळली. लहान मुलंच ती! खेळणारच! पण कंपाउंड वरुन खेळणी देशमुखांच्या लॉन वर फेकणे हा एक खेळच झाला होता मुलांसाठी. संजयला मुलांच्या खेळण्याबद्दल ऑब्जेक्शन नव्हते, पण घरातल्या मोठ्या माणसांनी मुलांना खेळणी फेकू नका , किंवा विक्रमने खेळणी परत मागतांना, थोडं पोलाईटली सांगावे एवढीच माफक अपेक्षा होती. पण तसे होणे नव्हते. रोज सकाळी ओरडून खेळणी परत फेका हे सांगण्या व्यतिरिक्त विक्रमशी कधी संबंधच येत नव्हता. कधी समोरासन्मोर आला, तरीही बोलणं नव्हतं. सरदारकीचा गर्व अजून चार पिढ्यांच्या नंतर पण कायम होता.
काही वेळाने कंपाउंड च्या पलिकडून विक्रम पवार ओरडले, ” ओ, खेळणी फेका इकडे मुलांची” – अरे प्ल्रिज वगैरे काही आहे की नाही? मी काय नोकर आहे का तुझा? पण सरदारांनी सामान्यांशी बोलतांना कशाला रिस्पेक्ट द्यायचा? गेली चार महिने हा दररोजचाच कार्यक्रम झाला होता. संजय जाम वैतागला होता. इतकं इन्सल्टींग वागणं डोक्यात जायचं ! पण काय करणार!
दर शनीवारी संजयची पुण्याला चक्कर असायची.मित्रांना भेटणे, थोडंफार काही असेल तर शॉपिंग आणि परत. आज संजय एका मॉल मधे गेला होता. एके ठिकाणी मुलींच्या मेकपच्या सामानाचा ढीग लागलेला दिसत होता. नेलपेंट, रुज, लिप्स्टीक्स वगैरे… कुठलीही वस्तू १० रुपये. संजयने १० -१५ नेलपेंटच्या बाटल्या,८-१० लिप्स्टीक्स, रुज , काजळ वगैरे विकत घेतले .
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नेहेमी प्रमाणे आधी एक बॉल लॉन मधे येऊन पडला. संजय काल विकत घेतलेले लिप्स्टीक नेलपेंट्स घेउन बसला होता, त्याने त्यातलं एक नेलपेंट मेंदीच्या पलिकडे फेकले. पुन्ह्या मुलांनी एक खेळणं येऊन पडलं, त्याच्या बदल्या अजुन एक लिप्स्टीक, नेलपेंट संजय ने कंपाउंड च्या पलिकडे फेकले. मुलांना पण मजा वाटत असावी. हा असाच खेळ आणलेली लिप्स्टीक, नेलपेंट संपेपर्यंत सुरु होता.
दुसऱ्या दिवशी पवारांची मुलं, हाताला रंगीबेरंगी नेलपेंट्स , लिप्स्टीक लाउन खेळत बसली होती. सगळ्या भिंतींवर उरलेल्या लिप्स्टीक ने चित्र काढली होती. सरदार घराण्याची मुलं लिप्स्टीक, नेलपेंट?
दुसऱ्या दिवशी संजय नेहेमी प्रमाणे लॉन मधे बसुन पेपर वाचत होता, पण एकही खेळणं येऊन पडले नाही..
( kalpana parakiya)
हा हा हा! बरी जिरवली 🙂
kitti mast idea…